दिलीप वि. चित्रे
मला अमेरिकेत येऊन अर्धं शतक उलटायला आलं. आलो तेव्हा डोक्यावर देव आनंदसारखा केसांचा फुगा, ओठावर तलवारकट मिशी.. मोठा रुबाब होता! - बघता बघता दिवस सरले. माथ्यावरचं ऊन उतरलं आणि रंग बदलायला लागले, तसं म्हटलं, चला आता! .. दुसरा मजेचा प्रवास सुरू करू!!
---------
मी अमेरिकन सरकारच्या कार्यालयात एकूण पंचवीस वर्षं नोकरी केली. त्यातली शेवटची काही वर्षं जॉन नावाचा माझा अमेरिकन बॉस होता.एकदा वैतागून मी जॉनच्या ऑफिसात शिरलो.
खुर्चीवर बसता बसता टेबलावर मूठ आपटून विचारलं, ‘‘जॉन, या सर्गे रॉझनॉव्हचं काय करायचं ठरवलं आहेस तू?’’
‘‘मी? मी काय करणार? तू त्याचा बॉस आहेस!’’ - जॉननं हात झटकले.
‘‘पण तू माझा बॉस आहेस. मला आता हे हॅण्डल करणं कठीण आहे! अरे, सर्गे आता पुढच्या महिन्यात ८९ वर्षांचा होईल. त्याच्यानं काम काही होत नाही. नुसता खुर्ची अडवून बसून असतो. त्याच्या सुट्या, सीक लिव्ह्ज सगळं संपलंय. बिनपगारी रजा तरी किती देणार?’’
हा सर्गे मोठा भारी होता. वयाच्या ८0 वर्षानंतर तो काठी घेऊन ऑफिसला यायचा. ८३ उलटल्यानंतर वॉकर घेऊन यायला लागला. स्वत:ची साठी उलटलेला सर्गेचा मुलगा जवळच डिपार्टमेण्ट ऑफ अँग्रिकल्चरमधे नोकरी करत असे. तो सर्गेला ऑफिसच्या खाली घेऊन यायचा. त्याची व्हीलचेअर गाडीच्या बाहेर काढायचा. मग माझ्या ब्रॅन्चमधला कोरिअन सिव्हिल इंजिनिअर चिंगलूला फोन करायचा. मग चिंग खाली जाऊन सर्गेची व्हीलचेअर ढकलत वर घेऊन येणार.
मी हे सगळं तावातावानं बोलत होतो आणि जॉन माझा आवेश पाहून मिस्किलपणे हसत होता.
तसा मी आणखीच चिडलो. ‘‘अरे, चिंग सर्गेची व्हीलचेअर ढकलत त्याला दिवसातून तीन वेळा बाथरूममधे घेऊन जातो. हे काय नर्सिंग होम आहे?’’
जॉन मस्तीत हसत सुटला.
‘‘साला, हा सर्गे रिटायर होत नाही म्हणजे काय?’’
‘‘काढून टाक ना त्याला. जाऊन सांग पर्सोनेल ऑफिसमधे की, हे असं असं आहे, त्याची टर्मिनेशन ऑर्डर काढा. तू बॉस आहेस त्याचा’’ - जॉनला सोपा उपाय सुचला होता.
अमेरिकेतल्या सरकारी ऑफिसातून असं कोणाला काढता येत नाही, हे याला माहिती नाही का? - मी आणखीच वैतागलो.
ब्रॅन्चमधल्या बाकीच्यांसाठी सर्गे हा मजेचा, चेष्टेचा विषय होता. ते म्हणत, सर्गे बुधवारीच ऑफिसला का येतो माहीत आहे? - तो सोमवारी सकाळीच ऑफिसला यायला निघतो, तो बुधवारी ऑफिसला येऊन पोचतो आणि बुधवारी संध्याकाळी घरी जायला निघतो तो शुक्रवारी संध्याकाळी घरी पोचतो. मग शनिवार-रविवारी आराम करून पुन्हा सोमवारी सकाळी निघतो.
सर्गे एक विनोदच होऊन बसला होता. त्याचा बॉस म्हणून हसताही येत नाही अन् रडताही येत नाही, अशी माझी हतबल अवस्था होती. सर्गेला बघितलं, की मला नेहमी मनोहर रणपिसेच्या ओळी आठवत-
मी पान वाळलेले
पाण्यात वाहणारे
उडताही येत नाही,
बुडताही येत नाही
- ही हतबलता फारच विचित्र. वय वाढलं, नाक जमिनीला लागायची वेळ आली, तरी कामाला चिकटून राहणारी सर्गेसारखी अमेरिकन माणसं पाहताना मला नेहमी प्रश्न पडत.
- माणसं का अशी विकलांग झाली तरी खुच्र्यांना चिकटून बसतात? यांना दुसरे काहीच उद्योग नसतील का? काही छंद नसतील? कुठे प्रवास करावासा वाटत नसेल? दुसरे देश-माणसं बघावीत अशी इच्छा होत नसेल? की रिटायर होऊन घरी बसले तर बायकोशी भांडत बसावं लागेल, ही भीती वाटत असेल? काय असेल?
एकदा सर्गेचा मुलगा भेटला. तो वैतागून म्हणत होता, त्याचीच पासष्टी होऊन गेलीय. तो आता नोकरीला कंटाळलाय. पण बापच अजून रिटायर व्हायचं नाव काढत नाही, तर तो कसा रिटायर होणार? लोक काय म्हणतील याची त्याला भीती!
अमेरिकन सरकार आंधळंच म्हणायचं! काम न करणार्यांना फुकट पगार द्यायचे, त्यांच्या पगारातील काही टक्के ‘४0१ के’ मध्ये इन्व्हेस्ट करायचे - त्यांच्या रिटायरमेन्ट फंडासाठी ! कशाला हे विनाकारण लाड?
- कधी असा संताप संताप झाला, की मला माझ्या वडिलांची आठवण येई.
माझ्या वडिलांनीही बडोद्याला सरकारी नोकरीच केली. त्यांच्यावेळी नवृत्तीचं नियमानुसार वय होतं ५८. आता ५८ हे काय नवृत्तीचं वय आहे? इथे अमेरिकेत आमच्या गावातल्या ९0 वर्षांच्या म्हातार्यानं ९१ वर्षांच्या तरुणीशी लग्न केलं त्याचे फोटो वर्तमानपत्रात छापून आलेल पाहिलेले आम्हीे! माझे वडील बिचारे ५८ वर्षांच्या आतच आयुष्यभराच्या कष्टानं पिचून गेलेले. ते नवृत्त झाले तेव्हा मी लंडनला निघून गेलो होतो. त्यावेळी मी त्यांना लिहिलं होतं, आता तुम्ही काही म्हणजे काही काम करू नका. नुसता आराम करा. आरामखुर्चीत किंवा बेडवर पडून सिलिंगमधल्या भेगा मोजत बसत जा.
- माझे वडील तिकडे पूर्वेकडले, हा सर्गे पश्चिमेचा.
आणि मी?
मूळचा तिकडचा. नंतर नशीब काढायला म्हणून इकडे आलेला. इकडचा होऊन राहिलेला.
आता मला अमेरिकेत येऊन अर्धं शतक उलटायला आलं. आलो तेव्हा डोक्यावर देव आनंदसारखा केसांचा फुगा, ओठावर तलवारकट मिशी. काय रुबाब होता म्हणून सांगू!
- बघता बघता दिवस सरले. माथ्यावरचं ऊन उतरलं आणि सावल्या पायाशी घुटमळू लागल्या.
दिवसाचा प्रवास संपल्याची जाणीव देणारी आणि संध्याकाळच्या खांद्यावरून रात्रीच्या कुशीत अलगद घेऊन जाणारी ही आयुष्याची गोरजवेळ!
- ती आली, तसे रंग बदलायला लागले.
म्हटलं, चला आता.
सर्गेच्या रिटायरमेण्टची वाट पाहता पाहता मीसुद्धा नकळत चाललोच आहे की त्या मार्गावरून!
- आणि सर्गेला निरोप देण्याची लगबग ऑफिसात सुरू होण्याआधी मीच माझं टेबल आवरायला घेतलं. रिटायरमेण्टच्या तयारीला लागलो.
अमेरिकेतलं अख्खं आयुष्य़ वॉशिंग्टनची थंडी सोसण्यात आणि बर्फाची वादळं झेलण्यात गेलेलं.
प्लोरिडाची ऊब खुणावू लागली. म्हटलं, तिथेच बांधावं आता आपलं नवं घरटं.
पूर्वेचा भारत ‘तरुण’ होत असताना, पश्चिमेकडल्या महासत्ता मात्र पांढरे केस आणि थकल्या गात्रांनी ‘रिटायरमेण्ट होम’च्या दिशेने चालू लागल्याच्या बातम्या आज नवल-कौतुकाच्या वाटतात, हे खरं! पण आजचा हा ‘तरुण’ चढणीचा रस्ता उद्या-परवा उताराला लागेल, तेव्हा काय? - हा प्रश्न आत्ता कुठे आपल्या विचारविश्वात येतो आहे. या प्रश्नाच्या संभाव्य उत्तरांचा अंदाज यावा म्हणून अमेरिकेत ‘ज्येष्ठ नागरिकांसाठी’ आखलेल्या देखण्या, टुमदार गावांची-व्यवस्थांची सफर घडवून आणणारी ही नवी पाक्षिक लेखमाला : गोरजवेळा! म्हणजे उतरत्या संध्याकाळचा प्रहर!
.. निसर्गनियमाने येणारं वृद्धत्व केवळ सुसह्यच नव्हे, तर आनंदी आणि उत्फुल्ल करण्याच्या या प्रयत्नांची, वृत्तीची लागण आता आपल्याही घरा-गावांना व्हायला हवी, म्हणून!
(दीर्घकाळ अमेरिकेत वास्तव्याला असणारे ज्येष्ठ मराठी लेखक. ‘कुंपणापलीकडले शेत’ हा कथासंग्रह, ‘अलिबाबाची हीच गुहा’ या संगितिकेसह विदेशातील अनेक मराठी उपक्रम/संस्थांचे संपादक,
संयोजक, संघटक)