चंद्रमोहन कुलकर्णी
शांत आवाजात पुलं मला म्हणाले,
‘काय झालं, कोण तू?’
मग मी पुन्हा सगळी रेकॉर्ड वाजवायला सुरुवात केली. माङया बोलण्यात बेळगावच्या त्या गृहस्थांचा संदर्भ आल्यावर लगेच म्हणाले,
‘हो, हो! आला होता फोन त्यांचा रात्री !’
बोलता बोलता दरवाजातून मला आत घरात येण्याची खूण करून, जागा करून देत झट्कन बाजूला सरकले आणि मला पुढे घालून माङया मागून दार लावून घेऊन घरात आले.
आतमध्ये सुनीताबाई कोचावर बसल्या होत्या. माङयाकडे पाहून गोड हसल्या.
पुलंनी माङया हातातलं ते बाड घेण्यासाठी हात पुढे केला आणि मला बसायलाही सांगितलं.
खरं तर माझं काम झालेलं होतं. मी निघायला हरकत नव्हती. पण पुलं अगदीच प्रेमानं आणि आपुलकीनं वागले होते. सुनीताबाईही आता निवळल्या होत्या.
मला आता अचानक कोरडेपणानं निघून जाणं योग्य वाटेना. मी सोफ्याचा एक कोपरा पकडून बसलो.
बाड एका कोप:यात ठेवून पुलं चक्क माङया शेजारीच येऊन जवळ बसले.
मला म्हणाले, ‘काय नाव सांगितलंस तुझं?’
मी परत नाव सांगितलं. चित्र काढतो; हेही न विसरता सांगितलं.
‘व्वा!’ म्हणाले.
म्हणाले, ‘कुठंतरी पाहिलंय रे नुकतंच तुझं काम. नावही वाचलंय.’
ह्या त्यांच्या वाक्यावर मी लगेच काही उत्तर देणार, इतक्यात हातानं माझं बोलणं थांबवत मला म्हणाले,
‘आनंद यादवच्या पुस्तकाचं चित्र काढलंयस ना एवढय़ातच तू?’
पाठोपाठ पुस्तकाचं नाव आठवत म्हणाले, ‘‘उखडलेली झाडं’? बरोबर, नं?’
खुशीत येऊन मी मान डोलावली.
आनंद यादवांच्या त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठासाठी मी चित्र काढलं होतं. नुकतंच ते पुस्तक प्रकाशित झालं होतं. पुलंनी त्या पुस्तकाची प्रशंसा केली आणि ह्या चित्रकाराला एकदा माङयाकडे घेऊन ये असंही ते आनंद यादवांना म्हणाल्याचं यादव सरांनी मला सांगितलं होतं. ही घटना तशी ताजीच होती. मला तर आनंद झालाच होता, आणि ते साहजिकही होतं. पण त्यांनाही आनंद झाला होता. मग सुनीताबाईंकडे वळून त्या चित्रबद्दल ते त्यांच्याशी थोडं बोलले.
पुन्हा मग माङयाकडे वळून म्हणाले,
‘बरं झालं तू आलास ते.’ हळूच सुनीताबाईंकडे तिरक्या नजरेनं मिश्कीलपणानं पाहत आणि तेवढय़ाच मिश्कीलपणानं हसत म्हणाले, ‘मघाशी बाहेर काय झालं ते विसर!’
थोडं थांबून पुढे म्हणाले, ‘काय देऊ तुला? .चहा तर देईनच, पण आणखी काय देऊ तुला?’
.मला काय बोलावं ते सुचेना. खरं तर मी थोडा भांबावलो होतो. मी ह्याआधी पुलंना प्रत्यक्ष कधी पाहिलंही नव्हतं. भेटणं वगैरे तर दूरचीच गोष्ट.
खरं तर यादव सर म्हणाले होते त्याप्रमाणो आम्ही ठरवून पुलंकडे गेलो असतो तर त्यांना अगदी सहज भेटता आलंही असतं, पण काही कारणानं ते काही झालं नव्हतं.
आणि आत्ता भेट होत होती ती अशी, वेगळ्याच संदर्भात.
तर पुलंच्या त्या प्रश्नावर मी काय उत्तर देणार होतो? आपल्यापैकी कुणीही जे उत्तर दिलं असतं, तेच उत्तर मीही दिलं,
‘काही नको मला!’
आपण काय मागणार असतो अशा माणसाकडे? त्यांची भेट झाली, ते दोन शब्द प्रेमानं बोलले, हे खूप असतं आपल्याला! अजून काय पाहिजे असतं!
मी माझी भावना त्यांना बोलूनही दाखवली.
तर मला म्हणाले, ‘असं नाही. तू इतकी चांगली चित्रं वगैरे काढतोस, तर चल, तुला मी एक महत्त्वाची कलाकृती दाखवतो. ती तू पाहिलीस, की तुला पुष्कळ काही मिळाल्यासारखं वाटेल आणि मलाही तुला काही दिल्यासारखं!’ असं म्हणून उठून उभे राहिले आणि अगदी संथ लयीत चालत आतल्या एका खोलीत मला घेऊन गेले.
हातानं भिंतीच्या एका कोप:याकडे थोडा वर निर्देश करीत मला म्हणाले,
‘बघ.’
.आणि मी खरंच बघतच राहिलो.
कोप:यात एका पेडेस्टलवर भल्या मोठय़ा मिश्या असलेल्या एका माणसाच्या चेह:याचं शिल्प होतं, ब्रॉँझमधलं असावं.
मी बघतच राहिलो.
भारी शिल्प होतं.
अक्षरश: भारी होतं!
कुणाचंय ते झटक्यात ओळखू येत होतं.
एकदा माङयाकडे, एकदा शिल्पाकडे पाहत पुलं मला म्हणाले, ‘कुणाचं आहे? माहिती आहे का?’
मी लगेच उत्तरलो,
‘.हो.. म्हणजे. कुणाचंय ते कळतंय, पण कुणाचं आहे, ते नाही मला सांगता येणार!’
जरासं गोंधळल्यासारखं करून माङयाकडे जरा बारकाईनं पाहत म्हणाले,
‘म्हणजे?’
मी म्हटलं,
‘म्हणजे हे शिल्प कुणाचं आहे, म्हणजे कुणी केलंय ते दिसतंच आहे स्पष्ट. पण शिल्पातला माणूस कोण, ते नाही माहीत!’
म्हणाले,
‘अच्छा! असं, होय! छान !’
पुढे म्हणाले, ‘सांग बरं कुणी केलंय ते!’
शंकेला जागाच नव्हती. शर्वरी राय चौधरींचं काम होतं ते. मी झटक्यात नाव घेतलं. अर्थात, गुळगुळीतपणाचा आणि मुळमुळीतपणाचा अंशही नसलेलं इतकं बोल्ड काम त्या माणसाव्यतिरिक्त कोण करणार?
खडबडीत, जिवंत धातू!
शिल्पातला मनुष्यसुद्धा साधासुधा नसणार, ह्याची खात्री होती, पण ओळख लागत नव्हती.
कशी लागणार? आम्ही गाण्यातले औरंगजेब!
काही काळ माझं देहभान हरपलं होतं. मी कुठं उभा आहे, कुणाच्या शेजारी उभा आहे, ह्याबद्दलचं मला काही काळभानच राहिलं नव्हतं. बराच वेळ मी गंडलो होतो.
‘व्वा!’
- पुलंच्या त्या उद्गारांनी मी भानावर आलो. मला म्हणाले, ‘शिल्पकार आणि शिल्पातला माणूस दोघंही फार मोठे!’
‘तू गाणं ऐकतोस का?’
मी म्हटलं, ‘नाही.’
‘बरं. आता ऐकत जा इथून पुढे. हे आहेत बडे गुलाम अली खाँ! ह्यांच्या पुतळ्याची ओळख झाली तुला आज, पण गाण्याचीही ओळख करून घे लवकर. मोठा माणूस होता फार. शर्वरीसुद्धा मोठा कलावंत. तुला त्यांचं काम माहितीये, हे ऐकून बरं वाटलं.’
किंचित हसून पुढे म्हणाले,
‘दोघांपैकी निदान एकाचं तरी नाव तुला माहिती आहे हेही काही कमी नाही!’
थोडय़ा वेळानं थोडं काही खाणं आणि ठरल्याप्रमाणो चहा झाला. दोघांना नमस्कार करून मी परतलो.
बेळगावच्या त्या गृहस्थांचं जे बाड मी पुलंकडे नेऊन दिलं होतं त्याचं पुढे काय झालं हे मला माहीत नाही;
पण बेळगावचं नाव निघालं, की वारा वाहतो तो ‘मालतीमाधव’च्या दिशेनं आणि बडे गुलाम अली खॉँचे सूर शर्वरी रायच्या शिल्पात मिसळून पुलंची याद ताजी करतो..
(लेखक ख्यातनाम चित्रकार आहेत.)