सायकलवर अमेरिकेच्या एका टोकाकडून दुस:या टोकाला जायचं! अंतर तब्बल 4800 किलोमीटर आणि मुदत फक्त नऊ दिवस. वाट भलती बिकट. कधी पर्वतरांगा, कधी पठार, कधी वाळवंट, कधी जंगल, कधी चामडी जाळणारं ऊन, कधी हाडं गोठवणारी थंडी. एव्हरेस्ट चढाईपेक्षाही ही रेस पूर्ण करणं कठीण आहे असं का म्हणतात, ते पुरेपूर अनुभवलं आम्ही!
‘रेस अक्रॉस अमेरिका’ हे
सायकलस्वारांच्या दुनियेतलं
सर्वोच्च आव्हान मानलं जातं.
‘रेस अक्रॉस अमेरिका’ यशस्वीपणो
पूर्ण करणारे पहिले भारतीय
सायकलस्वार म्हणून डॉ. हितेंद्र
आणि डॉ. महेंद्र महाजन यांनी
गेल्याच आठवडय़ात
रोमहर्षक इतिहास रचला.
त्यांच्या शर्यतीची ही कहाणी!.
धाय मोकलून, ढसाढसा रडलो होतो त्या दिवशी.
रस्त्यावर बसून.
‘डेथ रेस’ (टूर ऑफ द ड्रॅगन) म्हणून ओळखली जाणारी भूतानमधली ती सायकल स्पर्धा मी (हितेंद्र) ‘जवळजवळ’ पूर्ण केली होती. शरीराच्या सगळ्या जाणिवाच जणू बधिर करतील अशा त्या जीवघेण्या थंडीत आणि हिमालयीन पर्वतरांगांत पायात प्राण आणून मी सायकल दामटत होतो. शरीरातलं सगळंच त्राण संपलं होतं. पण केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर पॅडल मारत मी पुढे जात होतो. आता तर ज्या ठिकाणी पोहोचायचं, तो शेवटचा स्तूपही दिसायला लागला होता. शेवटची काही मिनिटं आणि शेवटचे काही किलोमीटर.
शक्य तितक्या जोरात मी पुन्हा सायकल चालवायला लागलो. अंगात त्राण उरलं नव्हतं, पण वेग वाढावा म्हणून मध्येच उभा राहूनही सायकल चालवत होतो. पाय आता आपोआपच गोल गोल फिरायला लागले होते. वेळ अगदी थोडा होता आणि अंतरही. आव्हान तसं कठीण होतं, पण अगदी अशक्य कोटीतलंही नव्हतं.
खराब हवामानामुळे स्पर्धा संयोजकांनी पाच-दहा मिनिटं वाढवून दिली तर आपण स्पर्धा पूर्ण करू शकू असाही विचार डोक्यात येऊन गेला. पण ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती. सगळ्यांना नियम सारखेच हेही माहीत होतं. अखेरचा पर्याय म्हणून मी पाठीवरची सॅकही खाली रस्त्यावर फेकून दिली. तेवढंच दोन-तीन किलो वजन कमी! भूतान ऑलिम्पिक कमिटीची बॅक-अप व्हॅनही आता सरसावली होती. जे स्पर्धक वेळेत स्पर्धा पूर्ण करू शकले नव्हते त्यांना त्यांच्या सायकलसह गाडीत टाकून ही व्हॅन परत फिरणार होती.
हृदयाचे ठोके वाढायला लागले आणि पॅडलवरचा स्पीडही. आता फक्त दोन-तीन किलोमीटर अंतर. दहा-पंधरा मिनिटांत सारा खेळ संपणार होता.
संध्याकाळचे सहा वाजले आणि रेस मार्शल माझ्याजवळ येऊन म्हणाला, ‘इट्स टाइम अप डॉक्टर’! तोवर आवरून ठेवलेल्या सहनशक्तीचा, शारीरिक, मानसिक क्षमतेचा. माझा साराच बांध फुटला आणि सायकल सोडून रस्त्यातच बसून मी माङया अश्रूंना वाट मोकळी करून दिली. (महेंद्रनं मात्र ही ‘डेथ रेस’ वेळेत पूर्ण केली. ही रेस पूर्ण करणारा आजही तो भारतातला एकमेव स्पर्धक आहे.)
..तीन वर्षापूर्वीची भूतानमधली ही घटना ! त्यावेळची परिस्थिती, भावना आणि ‘रेस अक्रॉस अमेरिका’ (रॅम) ही स्पर्धा पूर्ण केल्या केल्या आज अमेरिकेतून ‘लोकमत’च्या प्रतिनिधीशी बोलत असतानाची परिस्थिती, भावना. दोघांत महद्अंतर आहे! किती मोठा प्रवास!!
भूतानमधली ती ‘डेथ रेस’! नावासारखीच भयंकर. जगातील सर्वाधिक कठीण एकदिवसीय सोलो सायकल स्पर्धा. निसर्गाला आव्हान देत हिमालयातल्या उंचच उंच पर्वतरांगांतून चार खिंडी ओलांडत एकाच दिवसांत 268 किलोमीटर अंतर पार करायचं आव्हान.
आणि आताची ‘रेस अक्रॉस अमेरिका’! - इथे तर जणू रोजच ‘डेथ रेस’! कधी पर्वतरांगा, कधी पठार, कधी वाळवंट, कधी जंगल, कधी चामडी जाळणारं ऊन, कधी थंडी. नऊ दिवसांची मुदत. या मुदतीत अमेरिकेच्या या टोकापासून त्या टोकार्पयत तब्बल 48क्क् किलोमीटर अंतर पार करायचं. केवळ सायकलिंगच्याच नव्हे, तर जगातल्या सर्वच साहसी स्पर्धामधली ‘टफेस्ट’ स्पर्धा म्हणून ती ओळखली जाते. अगदी एव्हरेस्टच्या चढाईपेक्षाही कठीण!दरवर्षी अनेक देशांचे खेळाडू या स्पर्धेत भाग घेतात आणि निम्म्यापेक्षाही जास्त जण ही स्पर्धा मधेच सोडून देतात. आजवर भारतातल्या केवळ दोघांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे. मात्र एकालाही स्पर्धा पूर्ण करता आली नाही. यंदाही आमच्या गटांत फक्त आम्हीच ही स्पर्धा पूर्ण करू शकलो. दोन्ही स्पर्धक संघांनी तर प्रतिकूल हवामानामुळे पहिल्या 800 किलोमीटरमध्येच स्पर्धा सोडून दिली.
शरीर-मनाची सर्वोच्च कसोटी पाहणा:या या स्पर्धेनं आम्हाला काय दिलं? ही स्पर्धा पूर्ण करणा:याला कुठलं ‘बक्षीस’ दिलं जातं? म्हटलं तर ‘बक्षीस’ म्हणून एका सन्मानचिन्हाशिवाय काहीही नाही. पण या ‘सन्माना’त काय नसतं? तो एक अत्युच्च सन्मान असतो. एव्हरेस्ट सर करणा:यांना तरी कुठे काय मिळतं? पण जगातल्या ज्या थोडय़ा लोकांनी ही कामगिरी केलेली असते, त्यांची नोंद ‘सुवर्णाक्षरांनी’ होते. यापेक्षा दुसरं कुठलं मोठं ‘बक्षीस’ हवं? आज अमेरिकेत भारताचा तिरंगा फडकवताना वाटणारा अभिमान कशात तोलणार?. अमेरिकेत आम्हाला जे ‘स्टॅण्डिंग ओव्हेशन’ मिळालं त्याची ‘किंमत’ कशात करणार?.