- प्रा. डॉ. द. ता. भोसले
आयुष्यभर मातीत राबून आयुष्याची माती झालेल्या उपेक्षित गोरगरिबांच्या शिक्षणासाठी म. फुल्यांनी आपले आयुष्य पणाला लावले. सावित्रीबाईंनी विद्याविभूषित असलेल्या संस्कारशून्य समाजाकडून दगड आणि शेण खाल्ले. म. कर्वेंना जहरी वाक्बाण आणि जीवघेणी उपेक्षा सोसावी लागली. महर्षी वि. रा. शिंदे आणि श्री. म. माटे यांचा समाजाने पदोपदी अवमान केला. राजर्षी शाहू आणि महाराज सयाजीराव यांनी शिक्षणासाठी आपली तिजोरी मोकळी केली. डॉ. आंबेडकरांनी आयुष्य वेचले. कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख, स्वामी रामानंद तीर्थ, बापूजी साळुंखे, मामासाहेब जगदाळे, धनाजी चौधरी, काकासाहेब वाघ, बाबूराव जगताप आणि मुंबईनगरीतील अनेक विभूतींनी उपेक्षितांच्या शिक्षणासाठी तन-मन-धन आणि सारे जीवन अर्पण केले. या सर्व थोर विभूतींनी जगण्याचा आदर्शच उभा केला. त्यागाचा आदर्शच उभा केला. अथक प्रयत्नांचा आदर्श उभा केला. संकटांना पराभूत करण्याचा आदर्श उभा केला आणि सामान्य गरीब माणसांची सेवा हीच ईश्वरी पूजा असते, याचा आदर्श उभा केला. या थोरांच्या नामावळीत इतर वंदनीय मंडळी असू शकतात, याची मला कल्पना आहे. त्यांचा मी नामोल्लेख केला नाही इतकेच! त्यामुळे या महाराष्ट्रात सामाजिक सुधारणा, विद्येचा विस्तार, स्वातंत्र्याची ओढ, वैचारिक प्रबोधन यांची पहाट उदयाला आली. समाजजीवनाच्या अनेक क्षेत्रांत क्रांतिकारक परिवर्तन झाले. नेत्रदीपक प्रगती झाली.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर स्वराज्याचे सुराज्य होईल आणि सामान्य माणसाला स्वकर्तृत्व सिद्ध करण्यासाठी दाही दिशा मोकळ्या होतील, आणि शतकानुशतकांपासून कुलुपबंद असलेली विद्येची दारे खुली होतील, असे स्वप्न सामान्य माणसाने पाहिले. संधीवाचून मातीमोल होणार्या त्यांच्या बुद्धिमत्तेला प्रकाशाचे पंख लाभतील, असेही त्यांना वाटले; पण त्यात म्हणावा असा फरक पडला नाही. पण एकेकाळी विद्येचा शब्दोच्चार ऐकणार्याच्या कानात शिसाचा रस ओतला जात होता; आज ज्ञानासाठी आसुसलेल्या सामान्य व गरीब माणसापुढे हात पाठीमागे बांधून आणि तोंडाला चिकटपट्टय़ा चिटकवून जेवणाचे ताट ठेवावे, असे विद्येचे ताट ठेवले जाते. तेही सहजपणे खाता येऊ नये इतक्या अंतरावर! त्यापूर्वी बंदी असल्याने तो शिकू शकत नव्हता; आता विद्या महाग झाल्याने तो शिकू शकत नाही. साध्या पूर्वप्राथमिक शाळेच्या प्रवेशासाठीच लाख-दोन लाखांची फी! देणगी मागितली जात असेल तर अध्र्या भाकरीवर दिवस काढणार्या बापाच्या हुशार पोरांना त्या शाळेचा दरवाजा कसा उघडला जाईल? त्या शाळेच्या दिशेकडे पाहण्याचेसुद्धा त्याला धाडस होणार नाही. कारण त्याला ठाऊक आहे, की त्याने स्वत:ला विकले तरी एवढी रक्कम त्याला येणार नाही.
हे सगळे खिन्न करणारे विचार मनात आले; नुकत्याच घेतलेल्या एका दाहक अनुभवामुळे. प्राथमिक शाळेत शिक्षक असलेल्या माझ्या एका मित्राच्या मुलासाठी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी बरोबर गेलो होतो. पगार बेताचा, परिस्थिती बेताची आणि कौटुंबिक जबाबदारी मात्र दमछाक करणारी, असा माझा हा मित्र त्यातच बारावीला लावलेल्या खासगी शिकवण्यांची फी होती डोळ्यांतून पाणी काढायला लावणारी. हे खासगी क्लासवाले म्हणजे असहाय असलेल्या शेळीच्या माना कापणारे धनलंपट म्हणजे कसाईच दुसरे! या कसायांनी या माझ्या मित्राची आधीच अर्धवट मान कापलेली होती. त्यातून स्वत:ला सावरत पोरांच्या कल्याणासाठी तो प्रवेशाविषयी माहिती घेण्यासाठी गेला होता. आणखी एक सांगण्यासारखी गोष्ट अशी की, महाराष्ट्रातल्या प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेशपरीक्षा स्वतंत्र असते. त्यामुळे अशा नऊ-दहा वेळा या परीक्षा द्याव्या लागतात आणि त्यासाठी दहा ठिकाणी पोराला घेऊन पालकाला नाचावे लागते. वाढलेले वय आणि दिसायला साधारण असलेल्या लग्नाळू मुलीला जसे त्याचा नाडलेला बाप ‘दाखवायला’ घेऊन जातो, तसला हा प्रकार असतो. या परीक्षा देऊन देऊन मित्राचा मुलगा आधीच वैद्यकीय उपचाराचा शिकार झाला. आणि त्याची निवड होईलच याची खात्री नसते. ती खात्री हवी असेल तर, प्रत्येक महाविद्यालयाचे जे एजंट असतात, त्यांचे तुम्हाला मोबाईलवरून संदेश येतात. काही जण समक्ष भेटायलाही येतात. हे एजंट इतके प्रामाणिक असतात, की ते दोघांकडूनही भरगच्च कमिशन खातात. माझ्या या मित्राचा मुलगा तसा अगदीच ‘ढ’ नव्हता. त्याला दहावीला ऐंशीच्या पुढेच गुण पडले होते. बारावीची तयारीही त्याची बरी होती. त्याने केलेला अभ्यास, परीक्षा पेपरचे स्वरूप, बसणारे विद्यार्थी आणि उपलब्ध असलेल्या प्रवेशाची संख्या इतकी विचित्र आणि बेभरवशाची असते, की तुम्हाला खात्रीने प्रवेश मिळेल असे सांगताच येत नाही. एक विलक्षण दडपण आणि अनिश्चितता आपणाला पार घेरून टाकते. नेमक्या अशाच भयकंपित झालेल्या स्थितीत असतानाच एजंट नावाचा यमदूत एखाद्या देवदूतासारखा आपल्यासमोर उभा ठाकतो आणि एका बाजूला प्रवेशाचे अवघडपण सांगत सांगत दुसर्या बाजूला तो आपल्याला त्याच्या जाळ्यात गुंतवत असतो. त्याला मी म्हटले, ‘‘अहो, दीड महिन्यात बारा वेळा एखाद्या पोराला परीक्षेला बसविले तर तो वेडा झाल्याशिवाय राहणार नाही. त्यापेक्षा तुम्ही अगदी शासनासह सर्वांनी एकच प्रवेशपरीक्षा का ठेवू नये?’’ त्यावर तो नुसता हसला. ‘‘कुणीही त्याला तयार होणार नाही,’’ एवढेच तो म्हणाला. तदनंतर आम्हाला माहिती देताना तो एजंट म्हणाला, ‘‘प्रवेशपरीक्षेपूर्वी तुम्ही तुमची सीट नक्की केली तर देणगी म्हणून तुम्हाला वीसपासून पंचवीस लाखांपर्यंत ती द्यावी लागेल. त्यांपैकी १२ लाख रुपये आता द्यायचे आणि आमच्या कॉलेजच्या परीक्षेला जाताना उरलेली रक्कम द्यायची. तुमच्या मुलाला पडणार्या गुणांवर एखादा लाख कमी-जास्त होऊ शकते. संपूर्ण पैसे मिळाले की, मुलाला परीक्षेला बसू दिले जाते आणि आमचेच परीक्षक असल्याने आम्ही तुमच्या मुलास मेरिटमध्ये आणण्याचे नियोजन करतो. त्यासाठी सगळीकडे उत्तरपत्रिका पेन्सिलने लिहायला सांगितले जाते. त्याला चाळीस गुण मुळात मिळाले, तरी आम्ही त्याचे दोनशे चाळीस करून त्याची निवड करतो आणि परीक्षेनंतर तुम्हाला ‘सीट’ हवी असेल तर त्याचा दर वेगळा असतो. तो मागणीवर अवलंबून असतो. पण पाच तरी जादा द्यावे लागतात. शिवाय एका वर्षाची फी सहा लाख रुपये. फीमध्ये दर वर्षी पंधरा टक्के वाढ असते. तुम्ही आमच्या वसतिगृहात राहा वा राहू नका. त्याचे भाडे वर्षाला तीस हजार आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी आजचा दर दीड कोटी आहे. उद्याचे मी सांगू शकत नाही.’’ त्याचे हे निवेदन थंड शब्दांत असले तरी आम्हा सर्वांनाच घाम आला. क्षणभराने मित्राचा मुलगा चिडून म्हणाला, ‘‘बाबा, काल बंदी होती म्हणून शिकता आले नाही. आज बंदा रुपया नसल्याने शिकता येत नाही. सामान्य गरीब पोरांनी शिकू नये अशीच व्यवस्था केलेली दिसते. आपणाला पदवीपर्यंत पंचावन्न लाख रुपये खर्च करावे लागतील, कुठून आणायचे आपण? आपले एकरभर शेत विकले, तीन खणाचे घर विकले अन् म्हातार्या आजी-आजोबांसह सार्यांना विकले तरी एवढा पैसा येणार नाही. मला मेडिकलला जायचेच नाही. मी साधा पदवीधर होतो व नशिबाने व प्रयत्नाने मिळेल ती नोकरी पत्करतो. एवढा पैसा खर्च करून चालणार नाही. उद्या दवाखान्यासाठी तेवढाच खर्च येणार. अन् शेवटी माझा दवाखाना चालेल की नाही, याची खात्री नाही. मी विद्यादेवीचा उपासक होतो. विद्यादेवीचा मारेकरी व्हायचे नाही.’’ आणि तो खुर्चीवर डोके ठेवून हमसून रडू लागला. डोळ्यांतून पाझरणारे ते अश्रू नव्हते. जखमी झालेल्या काळजाचे शुभ्र रक्त होते!
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक असून, मराठी भाषा, लोकसंस्कृती यांचे ज्येष्ठ अभ्यासक व नवृत्त प्राचार्य आहेत.)