दिलीप प्रभावळकर
(लेखक जेष्ठ अभिनेते आहेत) -
मुखवटे अन् चेहरा हे समीकरण कायम मला स्तिमित करतं. अभिनेता म्हणून प्रत्येक भूमिका.. त्यामधल्या जगण्याला एक नवी दिशा देणारी आहे. त्या सगळ्याला एक वेगळा सूर असतो.. तो सूर सापडण्यासाठी प्रत्येक कलावंताला प्रयत्न करावे लागतात.. त्यामध्ये ज्या क्षणाला त्या व्यक्तिरेखेचा नूर सापडतो, त्या क्षणाला होणार्या आनंदाची तुलना कशाशीच करता येत नाही. त्यानंतर ते साकारणं, त्या व्यक्तिरेखेशी आपली नाळ जोडली जाणं अन् त्यामधला असणारा एक वेगळा प्रवास अभिनेत्यातील माणसाला अधिक समृद्ध करत असतो, असं मला प्रामाणिकपणे वाटतं.
मला तरुण, तडफदार, वेगळं काही मांडू पाहणार्या दिग्दर्शकांसोबत काम करायला खूप आवडतं.. का याला कारण नाही.. पण हे सारे नवीन ऊर्जा घेऊन येतात.. एवढं मात्र खरं.. मला कायम वाटतं.. त्यांना काहीतरी सिद्ध करायचं असतं.. आपल्यातलं वेगळेपण जगासमोर आणायचं असतं. त्यांच्यामधल्या प्रामाणिक प्रयत्नांना एका वेगळ्या कॅनव्हासवर चितारताना कायम निराळी गंमत येत असते. म्हणजे अगदी सई परांजपे आणि विजया मेहता यांच्यासोबतही मी काम केलेलं आहे. प्राजक्ताच्या बहरलेल्या फुलांसोबत काम करण्यातला गंध वेगळा असतो.. अन् कळ्या उमलताना पाहण्यातही न्यारीच गंमत असते.. तशातलं काहीसं आहे हे सारं..
पण नव्या दिग्दर्शकांसोबत काम करण्यात कवितेचं गाणं होण्याची जी प्रक्रिया आहे, ती आपल्याला जवळून अनुभवता येते. गेल्या काही वर्षांत शंतनू रोडे (जयजयकार), समीर पाटील (पोस्टर बॉईज), सुजय डहाके (शाळा), आदित्य सरपोतदार (नारबाची वाडी) अन् आता गणेश कदम (विटीदांडू) यांच्यासोबत काम करताना प्रचंड ऊज्रेने भारलेला असतो.. त्यामधलं गांभीर्य अन् अभ्यासूवृत्ती अधिक चौकस झालेली असते, हे देखील तितकंच खरं आहे. या सार्या दिग्दर्शकांसोबत काम करताना त्यांची असणारी पद्धत अन् मांडणी या सार्या गोष्टींमधून मलाही बर्याच गोष्टी शिकता आल्या.. हे मी आवर्जून सांगेन.. पण ते तितकेच मोकळ्या मनाचे आहेत अन् ते सारे आपण जर सूचना केली तर ते त्यांची दखल गांभीर्याने घेतात..सूचना स्वीकारतात.. ही मला गोष्ट अत्यंत महत्त्वपूर्ण वाटते.
या सार्याचा परिणाम हा कायम व्यक्तिरेखेवर सकारात्मक होत असतो. कारण अभिनेता हा तुकड्या-तुकड्यांमध्ये काम करत असतो. दिग्दर्शकाच्या मनात अख्खा सिनेमा असतो. त्याला संपूर्ण चित्र साकारल्याने दिसत असतो. ते सारं चित्र पूर्ण करणं.. ते तुकडे सांधण्यामध्ये असणारं कसब हे त्या दिग्दर्शकामधल्या खुबीला वेगळ्या अर्थाने अधोरेखित करत असते. त्यांच्या संकल्पनांना न्याय देण्यात.. ती पूर्णत्वाला नेण्याच्या त्या प्रयत्नांमध्ये एक निराळं समाधान आपल्याला मिळत असतं.
‘विटीदांडूच्या वेळेसही या समाधानाची पुनरावृत्ती झाली, हे आवर्जून सांगायला आवडेल.. विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांमध्ये ज्या व्यक्तिरेखा साकारल्या, त्यामध्ये वयोवृद्ध.. म्हातारे साकारायला मिळाले.. पण त्या प्रत्येकामध्ये निराळी छटा शोधण्याचा प्रयत्न केला.. त्यांना एक वेगळा चेहरा देण्यासाठी खरंच मेहनत घेतली.. त्या सगळ्या प्रयत्नांना प्रेक्षकांकडून दाद मिळते, त्या वेळी त्या सगळ्याचं चीज झालंय असं वाटतं.
‘नारबाच्या वाडीमधला नारबा.. कोकणात त्या निमित्ताने केलेलं शूटिंग.. तिथल्या नारळी-पोफळीच्या बागांमधली गंमत.. त्यामध्ये टिपरेच्या वेळी भेटलेल्या अन् त्या निमित्ताने आयुष्यात आलेल्या विकास कदम अन् गुरू ठाकूरची भेट या सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा झाली. त्या नारबाच्या ओठी असलेले अभंग असतील वा त्याचा आशावाद या सार्यामध्ये वयोवृद्ध थकलेला ते कालांतराने सुदृढ होत गेलेला अत्यंत आनंदी असा नारबा साकारणं ही खरंच कसोटी होती.. कारण त्या एका व्यक्तिरेखेमध्ये असलेली जी वैविध्यता होती ती कमालीची ताकदीची होती. ती त्या व्यक्तिरेखेची मागणी होती अन् त्याच्या देहबोलीपासून ते त्याच्या संवादफेकीमध्ये असणार्या शब्दांची एक निराळी रंगत होती.. ती प्रक्रिया एका वेगळ्या आनंदाने ओंजळ भरून गेली, एवढं मात्र आवर्जून सांगेन.
तसंच समीर पाटीलने संहिता ऐकल्यावर ‘पोस्टर बॉईजच्या वाचनात मला वेगळेपण जाणवलं होतं. त्यामध्ये असलेला विनोदाचा एक वेगळा फॅक्टर निराळी रंजकता आणणारा.. इतकं तारतम्य बाळगणारा.. कमरेखालचा एकही विनोद करायचा नाही, असा विनोद करण्यासाठी जी ताकद लागते.. त्याचा कस लावणारा असा हा सिनेमा आपल्याला सिनेमाच्या निमित्ताने अनुभवायला मिळालेला. त्यामध्ये साकारलेला जगन आबा हा कोकणी इरसाल नारबापेक्षा वेगळा आहे. कारस्थानी खोताला पुरून उरणारा ते इथला सधन शेतकरी.. ज्याला गावात समाजात एक स्थान आहे. बिनटाका नसबंदीच्या जाहिरातीत न विचारता फोटो छापल्यावर त्याच्यावर आभाळ कसं कोसळतं, घरात अन् गावात काय शोभा घडते अन् ती रोखण्यासाठी काय काय उपद्वय़ाप करावे लागतात, यामध्ये साकारलेल्या जगन आबाने वेगळ्या जातकुळीतला एक वृद्ध साकारायला मिळाला.
‘पोस्टकार्ड’च्या निमित्ताने त्या लाकडाच्या वखारीत काम करणारा जो वृद्ध साकारला.. तो निरक्षर आहे.. घरापासून दूर.. राबतोय.. त्याला आपल्या नातवंडांचं तोंड पाहायचंय.. त्याला घरी पैसे पाठवायचेत.. पण त्याचा मालक त्याची फसवणूक करतोय.. हे उमजत नाहीए.. एकीकडे त्याची गात्रं थकली आहेत.. त्याला सातशे रुपये जमवून घरी पाठवायचे आहेत; पण त्याच्या खात्यावर जमा नाहीत म्हणून तो देवाला एक पोस्टकार्ड लिहितो.. आयुष्यभर जिवाचं रान करून कष्ट करणार्या या माणसाचं कार्ड ते पोस्टमनला मिळतं अन् त्याने आपल्या जन्माला येणार्या बाळासाठी जमा केलेली पुंजी तो त्या वृद्धाच्या खात्यावर पाठवतो.. पण ती रक्कम सातशे रुपये इतकी नसते.. त्यामुळे देवाने आपल्याला ती रक्कम पाठवली, असं त्या वृद्धाला वाटतं.. पण देव आपल्याला सातशेपेक्षा कमी रक्कम कशी पाठवेल.. त्यामुळे त्या पोस्टमनने देवाने पाठवलेल्या रुपयांमधली काही रक्कम काढली असावी, असा संशय मनात असलेलं एक दुसरं पोस्टकार्ड लिहितो..अन् ते कार्डही त्या पोस्टमनच्या हाती पडतं.. त्या वेळी त्या पोस्टमन अन् पै पै जोडून एका क्षणात त्या वृद्धाला दिलेल्या त्या पोस्टमनच्या पत्नीच्या डोळ्यांत दाटणार्या अश्रूंमध्ये अन् त्या भाबड्या विश्वावरची ती गोष्ट मनाला स्पशरून गेली. ते साकारताना गजेंद्रने मला दिलेला जो चष्मा होता.. तो चक्क जाड भिंगाचा होता.. त्या लाकडाच्या वखारीत ते चाललेलं शूटिंग.. त्या चष्म्यातून काही दिसत नाही.. पण तरीही तिथून तसंच अंदाज घेत चालणं.. थकलेली गात्रं ती डोळ्यांमध्ये असलेलं स्वप्न.. नातवंडांसाठी एक मुखवटा करणं, या सार्या गोष्टी वेगळ्या अर्थाने माझ्यामधल्या कलाकाराला समाधान देऊन गेल्या.
‘जयजयकारमध्ये साकारलेला तिरसट वृद्ध.. त्याची तळमळ.. तृतीयपंथीयांना समाजात मिळणारी वागणूक.. त्या सगळ्या प्रयत्नांमध्ये एक सच्चाई होती. संजय कुलकर्णीसारख्या कलावंताने या भूमिकेला दिलेला न्याय कमालीचा होता. तृतीयपंथीयांसोबत काम करणं अन् त्याला अपेक्षेइतकी दाद मिळाली नाही, ही खंत माझ्या मनात आहे.
अशा या भावविश्वात आता गणेश अन् विकास कदम यांच्या ‘विटीदांडूमधला दाजी साकारतोय.. अर्थात आजोबा अन् नातवाची ही गोष्ट आहे. स्वातंत्र्यसंग्रामाची पार्श्वभूमी.. आजोबा-नातवाच्या नात्याला एक वेगळा कोपरा.. स्वातंत्र्यसंग्रामाची धग असली तरी त्याला मायेचा ओलावा आहे.. यामधला दाजी हा मला बरंच काही देऊन गेला आहे. कारण स्वातंत्र्यपूर्व काळ ते आजचा २0१४ यांना जोडणारा एक दुवा आहे. तो अन्वय सांधण्यामधला खेळ असेल वा स्वातंत्र्याकडे पाहणारे दाजी.. त्यांच्या स्वभावातील काही वेगळे गुण वा त्या गोष्टीमधील अनेक शक्तिस्थानं मला भावलेली आहेत.
गेल्या काही महिन्यांमध्ये साकारलेल्या या वृद्ध व्यक्तिरेखांमध्ये मी माझा चेहरा शोधतोय. जगण्यातल्या मुखवट्यांना आपलं मानलं.. मेकअपच्या पुटांमध्ये तो मुखवटा मी चढवला.. आनंदाने मी ते सारं स्वीकारलं.. काही क्षणांसाठी मी जगलो.. माझ्या आयुष्याचा हिस्सा झालेल्या या मुखवट्यांनी माझ्या चेहर्याचा माझ्या जगण्याचा भाग व्यापलाय.. मी मात्र माझा चेहरा अजूनही शोधतोय..