डॉ. संप्रसाद विनोद
पुण्यातल्या एका विख्यात कंपनीचे आर्थिक सल्लागार आनंदराव यांच्या सांगण्यावरून त्या कंपनीचे अध्यक्ष, कार्यकारी संचालक सोहराब योगोपचारांसाठी माझ्याकडे आले. माझी काही पुस्तकं आनंदरावांच्या वाचनात आली होती. त्यांनी काही भाषणंही ऐकली होती. सोहराब यांच्या हृदयावर इंग्लंडमधल्या एका विश्वविख्यात हॉस्पिटलमध्ये बायपास सर्जरी झाली होती. शल्यक्रिया यशस्वी झाली असली तरी पाठोपाठ झालेल्या अर्धांगवायूमुळे त्यांच्या शरीराची उजवी बाजू पूर्णपणे लुळी पडली होती.
त्यांचे सगळे रिपोर्ट्स नीट पाहिल्यानंतर त्यांच्यावरील उपचारांना सुरुवात झाली. रोज सकाळी ८ ते १0 या वेळेत सोहराब शांतिमंदिरमध्ये योगोपचारासाठी येऊ लागले. योगोपचार सुरळीत सुरू झाल्यावर त्यांची दिनचर्या नीट समजून घेण्यासाठी मी दोन-चार वेळा त्यांच्या कार्यालयात गेलो. त्यांच्या सहकार्यांशी बोललो. घरातल्या सदस्यांशीही बोललो. त्यातून समजलं, की सोहराब कामाच्या बाबतीत खूप काटेकोर आहेत. त्यांचा कामाचा व्यापदेखील खूप मोठा आहे. (१९८४ मधली वार्षिक उलाढाल सुमारे शंभर कोटी) आणि तो सतत वाढतही चाललाय (सध्याची उलाढाल काही हजार कोटी). या सगळ्याचा त्यांच्यावर खूप ताण येत असेल अशी माझी धारणा झाली. म्हणून मी त्यांना विचारलं, ‘‘तुम्हाला कामाचा ताण येत नाही का?’’ ते म्हणाले, ‘‘येतो ना, व्यवसाय असल्यामुळे समस्या येतात आणि त्या सोडवण्याचा ताणही येतो.’’ त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं. ‘‘पण, मी अशा ताणांकडे आत्मबल वाढवण्याचं एक साधन, एक आव्हान म्हणून पाहतो. त्यामुळे तो आपोआप कमी होतो.’’ ताणाकडे पाहण्याची किती छान सकारात्मक विचारसरणी आहे या माणसाची- मला वाटून गेलं! समस्यांकडे पाहण्याचा योग्य दृष्टिकोन असेल तर ताण कमी करता येतात याबाबतचं त्यांचं हे अनुभवकथन मला फार मोलाचं वाटलं.
पण, त्यांना जो काही ताण येत होता तो दूर करणं तर आवश्यकच होतं. मग, याबाबत त्यांच्याशी वेळोवेळी सविस्तर बोलणं झालं. चर्चा झाल्या. त्यातून त्यांच्या ताणाचं स्वरूप अधिक चांगल्या प्रकारे लक्षात आलं. मग, योगाद्वारे तो दूर करण्याची प्रक्रिया सुरू झाली. हे सगळं चालू असताना एक गोष्ट ठळकपणे लक्षात आली, की सोहराब जेवढे मोठे उद्योगपती आहेत तेवढेच ते माणूस म्हणून मनानेही खूप मोठे आहेत. त्यांच्या वागण्या-बोलण्यात कुठे आढय़ता, गर्विष्ठपणा नाही. आत्मविश्वास तर पराकोटीचा आहे. ऐश्वर्याचा माज नाही. नवीन गोष्टी शिकण्याची तळमळ आहे. आपल्या सहकार्यांविषयी, कामगारांविषयी ‘अंतरीचा कळवळा.’ आणि हा साधेपणा, पारदश्रीपणा हीच त्यांची खरी ताकद होती. ऊर्जा होती. म्हणूनच, नवनवीन प्रकल्प उभारून ते कंपनीला एवढं नावारूपाला आणू शकले. आज ते हयात नसले तरी त्यांच्या घरचे आप्त आणि त्यांनी तयार केलेली माणसं सोहराबनी स्थापन केलेली कंपनी उत्तम प्रकारे चालवत आहेत. दर वर्षी ही कंपनी यशाचे नवे मानदंड प्रस्थापित करीत प्रगती करत आहे.
ज्या काळात मारुती ८00 वाहने भारतीय रस्त्यांवरून नुकतीच धावू लागली होती, त्या काळात सोहराब मोठय़ा हौसेने त्यांची लाडकी टोयोटा गाडी स्वत: चालवत शांतिमंदिरमध्ये यायचे. तेव्हा ही वाहने फार दुर्मिळ होती. पण, अशा उंची गाडीचं दार बंद करताना-उघडताना किंवा गाडीत बसताना-उतरताना त्यांच्या देहबोलीतून मला कधी अहंकार, अभिमान दिसला नाही. मला या साध्या-साध्या गोष्टीच खूप महत्त्वाच्या वाटतात. कारण, त्यातूनच खरं अध्यात्म प्रकट होतं. ‘औपचारिकता’ म्हणून तोंडदेखलं चांगलं वागणं वेगळं आणि अध्यात्माचा ‘नैसर्गिक’ परिणाम म्हणून सहजपणे चांगलं वागणं वेगळं. सोहराबचं वागणं दुसर्या प्रकारात मोडणारं होतं. जन्माने पारशी असले तरी त्यांनी धर्माचं कधी स्तोम माजवलं नाही. एकदा त्यांच्या टोयोटातून त्यांच्या बंगल्याच्या आवारात शिरताना फाटकापाशी काही कामगार कंपाउंडचं काम करताना दिसले. सोहराबनी जोरात गाडीचा हॉर्न वाजवून त्यांना आपल्या येण्याची वर्दी दिली नाही, तर शांतपणे गाडीतून उतरून फाटक उघडण्यासाठी आपणच पुढे झाले. तेही अत्यंत मनापासून. त्यात कुठे दिखाऊपणा, नाटकीपणा नव्हता. सोहराबना येताना पाहून कामगारांची गडबड उडाली. पण सोहराब शांत होते. कामगारांनी फाटक उघडलं. ते पाहून सोहराबनी त्यांना मनापासून धन्यवाद दिले. तोडक्या मोडक्या आणि गोड मराठीत कामगारांची आपुलकीने विचारपूस केली आणि पुन्हा शांतपणे गाडी घराच्या आवारात नेली. मग, आम्ही त्यांच्या घरात गेलो. घरही त्यांच्यासारखंच साधंसुधं. कुठे भडकपणा नाही. अतिभपकेबाज फर्निचर नाही. घरात गेल्यावर घरच्यासारखं वाटलं. शोरूममध्ये गेल्यासारखं नाही. सोहराबजींचं हे शालीन वागणं मला मनापासून फार भावलं.
अभिजात योगसाधनेमुळे सोहराबचा ताण हळूहळू कमी होत गेला. इतकी मोठी कंपनी यशस्वीपणे चालवण्यात अतिशय व्यग्र असलेले सोहराब योगासाठी मात्र वर्षभर नियमित वेळ देत राहिले. योग शिकताना त्यांनी कधी घाई केली नाही. योगविद्येचा कायम यथोचित सन्मान ठेवला. वेळ नसल्याचा बहाणा केला नाही. मला कधी ताटकळत ठेवलं नाही. वाट पाहायला लावलं नाही. मला या सगळ्याचं खूप आश्चर्य वाटायचं. योगाचे परिणाम मिळू लागल्यावर सोहराब यांची योगनिष्ठा वाढत गेली. मग, योगविद्येचा लाभ कंपनीतल्या सगळ्या मॅनेर्जसना आणि कामगारांना मिळावा यासाठी मोठय़ा आस्थेने त्यांनी कंपनीत माझे काही कार्यक्रमही आयोजित केले.
त्यांच्या कामाचं स्वरूप आणि व्याप्ती समजून घेण्यासाठी मी जेव्हा त्यांच्या कंपनीत जायचो तेव्हा कर्मचार्यांच्या मनातलं त्यांच्याविषयीचं प्रेम आणि आदरभावना दिसून यायची. त्यामागचं कारण एका प्रश्नाला त्यांनी दिलेल्या उत्तरातूनच मला मिळून गेलं. प्रश्न होता- ‘तुम्ही तुमच्या कंपनीचा एवढा मोठा व्याप कसा काय सांभाळता?’ त्यावर त्याचं विनम्रपणे दिलेलं उत्तर होतं, ‘‘मी कुठे सांभाळतो? कंपनीतली माझी सगळी जिवाभावाची माणसं हा सगळा व्याप सांभाळतात.’’ हे सांगताना कर्मचारी व सहकार्यांविषयी त्यांच्या चेहर्यावर उमटलेली आपुलकीची भावना बरंच काही सांगून गेली. त्यांच्या या विशुद्ध आपुलकीच्या भावनेतच त्यांच्या उत्तुंग यशाचं रहस्य दडलं होतं!
(लेखक महर्षी न्यायरत्न विनोद यांचा विशुद्ध अध्यात्माचा आणि अभिजात योगसाधनेचा वारसा चालविणारे योगगुरू आहेत.)