- संजय पाठक
18 जून.
वेळ दुपारी चार.
स्थळ काठमांडू एअरपोर्ट. एरवी पर्यटकांच्या रेटय़ामुळे विमानांची व प्रवाशांची गर्दी असलेल्या या विमानतळावर तसा शुकशुकाटच होता. नावापुरते प्रवासी आणि दोन-चार विमानं उभी असल्यामुळे त्याला विमानतळ म्हणायचं, एवढचं!
इमीग्रेशनची प्रक्रिया पूर्ण करून एअरपोर्टवरून बाहेर पडलो. पाहुण्यांना घेण्यासाठी आलेले टॅक्सीचालक आणि अन्य खासगी आस्थापनांचे लोक बोर्ड हातात धरून उभे होते. एका मोठय़ा फलकावर ‘तान’ (ट्रॅव्हल्स एजंट्स असोसिएशन ऑफ नाशिक) असलेला फलक दिसला. तसे माङयासह ‘तान’चे तेरा सहकारी तेथे पोहोचलो. पारंपरिक पद्धतीनं स्वागत झालं आणि यजमानांनी आमच्या ‘नेपाळ दर्शना’चा कार्यक्रम सुरू केला.
देवभूमी असलेल्या या देशाकडून आलेलं हे ‘निमंत्रण’ अर्थातच सहेतुक होतं. गेल्या 25 एप्रिलच्या भूकंपानंतर हा देश अजूनही जमीनदोस्त अवस्थेत असल्याच्या बातम्या माध्यमांनी जगभरात पोचवल्या आणि या मरणप्राय अवस्थेत देशाची रसदच थांबली : पर्यटक! घरंदारं आणि माणसांसकट सगळ्या व्यवस्थाच उन्मळून पडलेल्या देशात पर्यटक म्हणून मजेत चार दिवसांची सुट्टी घालवायला कोण जाईल?
नेपाळ हे सर्वार्थाने टुरिझम स्टेट. या देशाची अर्थव्यवस्थाच पर्यटनावर अवलंबून! त्यात भूकंपाचा प्रकोप. त्यामागोमाग जगभरात पोचलेल्या उद्ध्वस्ततेच्या प्रतिमेचा अडसर! देवदर्शनाला येणारे भाविक असोत वा हिमालयाच्या डोंगरकुशीत साहसी खेळांच्या ओढीने येणारे पश्चिमी पर्यटक, सर्वानीच पाठ फिरवलेली.
- यातून उठून उभं राहण्याचे प्रयत्न नेपाळने निकराने सुरू केले आहेत. पर्यटकांच्या मनातली भीती दूर करून त्यांना दिलासा द्यावा आणि या देवभूमीकडे पुन्हा त्यांची पावलं वळावीत म्हणून माध्यमांच्या मदतीने ‘प्रतिमाबदला’चा प्रयत्न हा त्यातलाच एक भाग!
नेपाळ टुरिझम बोर्डाच्या आमंत्रणावरून काठमांडूमध्ये उतरलो होतो. सोबत त्यांचा वाटाडय़ा. तो सांगत होता, की इतकं काही संपलेलं नाही सगळं. पाहा आजूबाजूला. आमच्या व्यवस्था उभ्या आहेत. आम्ही आमच्या पाहुण्यांची काळजी घेऊ शकतो.
ते खोटं नव्हतं अर्थात, पण पूर्णाशाने खरंही नव्हतं. पर्यटकांना दिलासा देऊ पाहणारी ‘भावना’ आणि त्यासाठीचे प्रयत्न मात्र सच्चे होते.
25 एप्रिलच्या भूकंपाने देश जणू गिळलाच. अक्षरश: होत्याचं नव्हतं झालं. आता हलकेहलके परिस्थिती पालटताना दिसते. भूकंपाच्या खुणा मात्र जागोजागी. सर्वत्र बांधकामाची लगबग. रस्ते, रस्त्यांचं रुंदीकरण. ढिगारे उपसणं, धोकादायक इमारती उतरवणं, शक्य तिथे डागडुजी.
कुठल्याही रस्त्यानं निघा, अनेक ठिकाणी पडकी घरं, निर्वासितांसाठी भल्या मोठय़ा मैदानावर उभारलेले तंबू, सर्वस्व गमावून त्या तंबूत राहणारी माणसं.
पशुपतिनाथाच्या मंदिरात गेलो तेव्हा नेपाळ टुरिझम बोर्डाचे सूर्या पाठक म्हणाले, ‘‘पाहा. चार चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे या मंदिराचं. किरकोळ पडझड झाली. पण मूळ मंदिर सुरक्षित आहे. हा दरबार स्क्वेअर. ही परिसरातली इतरं मंदिरं.’’ - खरंच होतं ते. मंदिर परिसरातली काही मंदिरं भूकंपामुळे पडली, राजप्रासादाच्या मुख्य द्वाराच्या संरक्षक भिंतीचं नुकसान झालं, पण पशुपतिनाथाचं स्थान जराही ढळलेलं नाही.
पाठक कळवळून सांगत होते, ‘‘भूकंपामुळे राजधानी काठमांडू, भक्तपूर, पाटण, सिंधुपाल चौक अशा अनेक ठिकाणी नुकसान झालं हे खरं; पण पोखरा, चितवन आणि अन्य भागाला धक्काही लागलेला नाही. माध्यमांनी हा तपशील लक्षात न घेताच बातम्या दिल्या. नेपाळ पूर्णपणो उद्ध्वस्त झाला, हे खरं नाही. भूकंपानं बरंच काही नेलं, पण पर्यटकांनी पाठ फिरवल्याने जे उरलं होतं, त्याच्याही अस्तित्वाचा प्रश्न उभा आहे आता. हजारोंचं पोट चालतं पर्यटनावर. त्यांनी काय करावं?’’
‘नेपाळ इज सेफ’ असा संदेश जगभरच्या पर्यटकांना देण्यासाठी नेपाळ टुरिझम बोर्डाने विविध उपक्रम आखले आहेत. माध्यम प्रतिनिधी आणि टुरिस्ट कंपन्यांना निमंत्रित करून वस्तुस्थिती दाखविण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुनर्उभारणीचं कामही सुरू आहे. भूकंपाच्या वेदना सोसत शहरं पुन्हा उभी राहण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांच्या जगण्याच्या धडपडीला जगभरातून साथ मिळत असली तरी ही तात्पुरती मदत आहे. पुन्हा दीर्घकाळ जगण्यासाठी त्यांना ‘पर्यटन’ याच मुख्य साधनावर अवलंबून राहावं लागणार आहे. भूंकपाचे झटके आता सौम्य झाले असले, तरी नागरिकांचं जगणं सहजसोपं झालेलं नाही. भूकंपानंतर 1 जूनला मोठय़ा परिश्रमाने शाळा सुरू झाल्या. मल्टीप्लेक्समध्ये अलीकडेच चित्रपटांचे खेळ सुरू झाले. लोक कामधंद्यावर जाऊ लागले आहेत.
दु:खाचं आणि नुकसानीचं रडगाणं किती दिवस गाणार? डोळे कोरडे करत पोटापाण्यासाठी पुन्हा हातपाय तर हलवावेच लागणार!
नेपाळच्या बहुतांशी भागात आधी भूकंप, मग सरकारचं गलथान दुर्लक्ष आणि आता रोडावलेलं पर्यटन याचा जनजीवनावर झालेल्या परिणामांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. सरकारने पर्यटनाची एक बाजू दाखविली, दुसरी आम्हाला ‘जाता जाता’ दिसली, काही ठरवून पाहिली.
‘नेपाळ ‘सुरक्षित’ आहे. पर्यटकांनी निर्धास्तपणो आमच्याकडे यावं’ असा प्रचार एकीकडे आणि उद्ध्वस्त झालेल्यांना पुन्हा उभं राहण्यासाठी पुनर्वसनाचं काम दुसरीकडे अशी दोन टोकांमधल्या तारेवरची कसरत नेपाळ सरकार करतं आहे.
सप्टेंबर महिन्यापासून नेपाळमध्ये पर्यटकांचा हंगाम सुरू होईल. त्यासाठी सारी सज्जता नव्याने सुरू आहे. पण या धामधुमीत भूकंपपीडितांचं काय? (अधिकृतरीत्या) दहा हजार नागरिक ठार, पाच लाख बेघर आणि दोन लाख अन्य देशात गेलेले अशा स्थितीत नेपाळ कसा उभा राहणार?. नेपाळी नागरिकांच्या मनातलं शंकांचं हे काहूर आपल्या डोक्यात कोलाहल माजवल्याशिवाय राहत नाही.
- अब कोई नही आता, साहब.
ठिकाण : रिंगरोड, काठमांडू..
संध्याकाळी सात वाजेची वेळ. परिसरातील दुकाने हळूहळू बंद होऊ लागलेली. ‘ठमेली’ या भर बाजारपेठेकडे जाणा:या रस्त्यावरील वाहतूकही रोडावली. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित. एका राष्ट्राच्या राजधानीचं हे शहर इतकं शांत कसं?
दुकान अर्धवट बंद करून उभ्या असलेल्या दुकानदाराला प्रश्न केला, ‘‘पसल (दुकान) इतनी जल्दी बंद कैसे?. गव्हन्र्मेटने रिस्ट्रीक्ट किया क्या.?’’ ‘‘नही साहब’’, तो उत्तरला, ‘‘अर्थक्वेक कभी भी हो सकता हेै. इसलीए अभी कोई जादा देर तक पसल खुली नही रखता. रात के अंधेरेसे पहिले सब लोग घर जाते है.. पहले ऐसा नही था. देरतक टुरिस्ट आते थे. अब कोई नही आता, फिर जादा देर कौन रुकेगा.? सारा काठमांडू आठ बजेतक बंद हो जाता है.’’
- रेटकार्ड पे कौन चलता है.?
शहर काठमांडू.. वेळ पुन्हा रात्रीचीच. ठमेली भागातील वैशाली हॉटेलकडे जाण्यासाठी टॅक्सीवाल्याला हात केला. इंडियन करन्सीत तीनशे रुपये होतील म्हणाला. म्हणून तसाच काही वेळ चालत पुढे गेलो.
दोन टॅक्सीवाले जवळ येऊन थबकले. एकाने दोनशे आणि एकाने शंभर रुपये भाडं सांगितलं. नंतर मात्र दुस:याने लगेचच माघार घेत आपणही शंभरच रुपये घेऊ अशी नवी ऑफर दिली. शेवटी दोघात ज्याने पहिल्यांदा शंभर रुपये भाडं सांगितलं त्यालाच प्राधान्य दिलं. मारुती सुझकी कारवर टॅक्सीचा फलक लागलेल्या त्या मोटारीत बसलो. गप्पा सुरू झाल्या. ‘‘यहॉँ टॅक्सीका रेटकार्ड फिक्स नही है?’’
‘‘रेटकार्ड है, फिरभी रेटकार्ड पे कौन चलता है.. टुरिस्ट बारगेनिंग करता है, उस हिसाबसे लेते है’’ -टॅक्सीवाला सांगत होता. मग त्याने त्याची आणि त्याच्या व्यवसायबंधूंची आपबितीच सांगितली. नेपाळ हा अख्खा देश पर्यटकांवर चालतो. दुकानं, गाडय़ा, गाइड सारेच पर्यटकांवर अवलंबून! बोलीभाषेत टुरिस्ट! भूकंपाच्या धक्क्यानंतर सारं चित्र बदललं. टुरिस्ट येत नाहीत आणि व्यवसाय चालत नाहीत. जे टुरिस्ट येतील त्या सा:यांना एकच रेट सांगता येत नाही. टॅक्सी चालविणारे दोन हजारांहून अधिक लोक आहेत. टॅक्सी भाडय़ाने घेतली की सहाशे रुपये मालकाला द्यावे लागतात. तीनशे रुपयांचं पेट्रोल. त्यामुळे दररोज किमान इतकी मिळकत हाती पडावीच लागते. पैसा जमा होईर्पयत रात्र असो वा दिवस टॅक्सी चालवावीच लागते.
‘‘आज फार पैसे जमले नाहीत, म्हणून शंभर रुपयात तयार झालो’’ - माझा टॅक्सीवाला सांगत होता.
लालबहादूर त्याचं नाव. समशेर त्याचे वडील. ते भारतात जयपूरमध्ये हि:यांच्या कारखान्यात कामाला आहेत. लालबहादूरही तेथे होता. नेपाळमध्ये लगA केले आणि कुटुंबासमवेत काठमांडूत आला. भूकंप होईर्पयत सारं काही ठिकठाक होतं, परंतु आता खाण्याचे वांदे झाले आहेत. पुढच्या महिन्यात पुन्हा भारतात रोजी-रोटीसाठी यावं लागेल, असं लालबहादूर सांगत होता.
- ‘किस्मत’. हिरो से शो डान्सर!
लांब केस वाढवलेला आणि स्लीम शर्ट घातलेला पृथ्वीराज काठमांडू एअरपोर्टवर भेटला. हा नेपाळचा स्ट्रगलर. येथील अनेक नाटकांमध्ये काम करणारा पृथ्वी आता चित्रपटात काम करतोय. पृथ्वीराज उत्तम डान्सर आणि कोरिओग्राफर आहे. डान्स शोदेखील करतो. घरची परिस्थती साधारण. पृथ्वीला अलीकडे काही चित्रपटात छोटी कामं मिळाली. ‘‘नेपाळमध्ये बरीच बडी मंडळी आपल्याकडील पैशांचा वापर करून चित्रपट काढतात आणि स्वत:च हीरोची भूमिका करतात. एक-दोन चित्रपट काढून हीरो बनतात आणि पिक्चर फ्लॉप झाला की घरी बसतात. त्यात आमच्यासारख्यांना संधी मिळत नाही’’ - पृथ्वीराज सांगत होता. ‘किस्मत टू’ आणि ‘साईना’ हे दोन चित्रपट त्याला मिळाले. ‘किस्मत टू’चं शूटिंग काठमांडूत सुरू होतं. नेमकं शूटिंग ज्या दिवशी नव्हतं, त्याच दिवशी म्हणजे 25 एप्रिल रोजी भूकंप झाला. आता तीन महिने पूर्ण झाले अद्याप शूटिंगच सुरू होऊ शकलेलं नाही.
‘‘माझ्यासारख्या अनेक कलावंतांची अवस्था अडचणीची झाली आहे. भारतात जाऊन स्ट्रगल करूनही फार काही हाती लागत नाही. तरी प्रयत्न करावे लागणारच ना! भारतात आणि मलेशियासारख्या ठिकाणी कोरिओग्राफी आणि डान्स शोमधून मी कमवतो.. सध्या तरी हाच पर्याय आहे..’’ - पृथ्वी सांगत होता.
- तो कहीये, की हमे फोन करें.
स्थळ : पशुपतिनाथ मंदिर, काठमांडू
मंदिरात देवदर्शन करताना सोबत असलेला गाइड भूकंपात या मंदिराची हानी झाली नाही, हे आवजरून सांगत होता. चार चौरस किलोमीटर क्षेत्रत मुख्य मंदिरासह अनेक मंदिरं. काही शिवजींची, तर काही अन्य देवी-देवतांची. परंतु मध्येच मंदिरांना चिरा पडल्या आहेत. गाइड सांगतो, ‘‘देखो साहब, सिर्फ इतनाही नुकसान हुआ है.’’
मंदिरात शिरल्यापासूनच त्याच्याबरोबर एक भटजी दिसत होता. ‘‘साब कुछ पूजा करनी है.. हम सब पूजा करते है.’’ त्याचं मार्केटिंग चालू होतं. थोडय़ा वेळाने सहज गप्पा सुरू झाल्या. तर कळलं, त्या गृहस्थांचं नाव बंडोपाध्याय. मूळचे केरळचे. नेपाळच्या राजाने पशुपतिनाथ मंदिरात पूजादि व्यवस्थेसाठी केरळचेच पंडे नेमले होते. त्यात यांचे पूर्वज आले आणि मग हेही इथलेच झाले. बंडोपाध्याय गुरुजी सांगत होते, ‘‘हमेशा हजारो लोग आते हेै. टुरिस्ट की सौ बसे दिनभर में आती है, अब ऐसा नहीं होता. एप्रिल के बादमे टुरिस्ट आनेही बंद हो गये.. अब पुरे दिन में एक या दोही बस आती है..’’
प्रत्येक देवस्थानाची वेगवेगळी पूजा प्रसिद्ध असते. पशुपतिनाथ मंदिरात रुद्राभिषेक करणा:यांची गर्दी असते. हिंदूधर्मीयांचे श्रद्धास्थान असल्याने दिवसाकाठी एक-दीड हजार रुद्राभिषेक करतात. हे गुरुजी स्वत: किमान शंभर जणांना पूजा सांगत. आता भाविकच येत नाहीत, तर कोणाला सांगणार?
‘‘एकेकाच्या मागे फिरावे लागते’’ - हतबल आवाजात ते सांगत होते. मग माङयाही मागे लागले. जाताना हातात मावेल अशा डायरीचे चतकोर पान फाडून आपला मोबाइल क्रमांक दिला. वर सांगितलं, ‘‘कोणी इंडियन टुरिस्ट येणार असेल तर फोन करा म्हणावं, सर्व प्रकारच्या पूजांची व्यवस्था केली जाईल..’’
- कोई तो आया.
स्थळ : भक्तपूर गावाचं प्रवेशद्वार. वेळ दुपारी चार वाजेची.. पारंपरिक पद्धतीने बांधलेल्या चावडीकडून पाच मिनिटांच्या अंतरावर पुढे गेलं की डाव्या हाताला गाव आणि उजव्या हाताला प्रसिद्ध दरबार स्क्वेअरकडे जाणारा रस्ता. तेथेच अनेक दुकानं आणि भक्तपूर नगरपालिकेचे प्रवेश शुल्क भरण्याची सुविधाही आहे. शरद श्रेष्ठ हा आमचा गाइड. तो तिकीटघराकडे जात असताना दुकानदारच धावत त्याच्याकडे गेले आणि नेपाळी भाषेत काही तरी गप्पा सुरू झाल्या. चर्चा भावनिक असावी. कारण अनेकांनी डोळे पुसले. म्हणून काही वेळाने शरदला विचारलं, ‘‘कोण होती ती माणसं? काय म्हणत होती.’’
‘‘काही नाही’’ - शरद म्हणाला, ‘‘हे सारे इथले दुकानदार आणि रहिवासी आहेत. भूकंपामुळे या गावाची मोठी हानी झाली. गावातील अनेक माणसं दगावली. जी जगली ती बेघर झाली. त्यातच पर्यटक येत नसल्याने गावाचं चलनवलन थांबलं. 25 एप्रिलच्या भूकंपानंतर गटाने येणारे पहिले पर्यटक तुम्हीच. म्हणून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आज. म्हणत होते, की कोई तो आया..’’
- पर्यटक तुरळक, गाइड तीनशे!
स्थळ : चितवन अभयारण्य. जंगल रिसॉर्टचा परिसर.
सायंकाळी याठिकाणी असलेल्या नदीच्या काठावरून सूर्यास्त चांगला दिसतो आणि नदीवर पाणी पिण्यासाठी जनावरं येतात, पक्षीही डोकावतात म्हणून फेरफटका मारायला गेलो. बरोबर हॉटेलचा गाइड रामपालही होता.
अभयारण्याजवळचं हे छोटंसं गाव. परंतु गाइडची संख्या तब्बल तीनशेच्या घरात.. रामपाल हा पूर्णवेळ गाइड. नेपाळी-¨हंदी आणि इंग्रजी भाषेत बोलता येणा:या खाकी गणवेशातील रामपालच्या गणवेशावर रिसॉर्टचा लोगोही होता. तो सांगत होता,
‘‘या छोटय़ा गावात तीनशे गाइड आहेत. आम्हाला हॉटेलने नेमले आहे. टुरिस्टला घेऊन जंगल दाखवायचे. गाइड चांगला प्रशिक्षित असेल तर महिन्याकाठी दहा हजार रुपये पगार दिला जातो. मलाही आहे, मात्र भूकंपामुळे यंदाचा टुरिस्टचा हंगाम गेला. टुरिस्ट फिरकलेच नाहीत. आता इथल्या हॉटेल्सने गाइड आणि कर्मचा:यांचे पगार निम्म्याने कमी केले आहेत. माझाही पगार. त्यात गुजराण करणो कठीण होतेय, पण पर्याय नाही. आता सप्टेंबरमध्ये टुरिस्ट वाढतील, त्यावेळी पगार वाढू शकेल. बघू या काय होते ते..’’
(लेखक ‘लोकमत’च्या नाशिक आवृत्तीत मुख्य उपसंपादक आहेत.)