एलफिन्स्टनभारतावर ब्रिटिश शासन प्रस्थापित असणे ही अत्यंत आवश्यक असलेली घटना होती, असे मानणार्या एलफिन्स्टनने भारताच्या प्राचीन, मध्ययुगीन पूर्वग्रहदूषित, गैरसमजुतीवर आधारित लिहिलेल्या इतिहासाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला. १७९५ मध्ये तो भारतात आला. मराठी सत्ता नष्ट करण्याच्या प्रयत्नात त्याचे योगदान होते. मुंबई प्रांताचा तो गव्हर्नर होता. सन १८२७ मध्ये स्वेच्छानवृत्ती घेतल्यानंतर त्याने ‘मिल’चा ग्रंथ वाचला. जोन्स आणि प्रिन्सेप यांचे लिखाण अभ्यासले. त्याने भारताचे प्रत्यक्ष ज्ञान मिळविले. ३0 वर्षे भारतात वास्तव्य असलेल्या एलफिन्स्टनला उपलब्ध पुराव्यांचा अभ्यास करून इतिहास लिहिणे शक्य झाले. लिखाणासाठी आवश्यक असणारी सर्व साधनसामग्री गोळा करून तो मायदेशी परत गेला. १८३४ मध्ये भारताचा इतिहास लिहिण्यास सुरुवात केली. १८४१ मध्ये त्याचा ' History of muhammadan India' हा ग्रंथ प्रकाशित झाला. त्याचा राजकीय इतिहासापेक्षा सांस्कृतिक इतिहासावर भर होता. घटनांचे तपशील-वर्णन त्याने केले नसून, महत्त्वाच्या राजवंशांची कालनिश्चिती त्याने पुराणांच्या आधारे केली. कोणताही पूर्वग्रह न ठेवता त्याने भारतातील शासनव्यवस्था, समाजव्यवस्था, चालीरीती, धर्म, साहित्य, तत्त्वज्ञान, कला, व्यापार, परदेशी व्यापार, उद्योग यांची माहिती त्याने दिली.
- प्रा. श्रुती भातखंडे
(लेखिका इतिहासाच्या अभ्यासक आहेत.)