डॉ. प्रदीप पाटकर
वातावरण जेवढे तापेल तेवढा वैयक्तिक विवेक त्यात जळून जातो. माणसे नुसत्या सूचनांनी पेटून
अविचारी कृत्ये करायला धजावतात. एकटय़ाने जे केले नसते, करता आले नसते ते समूहात जमून जाते. दुष्कृत्याची जबाबदारी विभागली जाते, वातावरणातला उन्माद मनात भिनतो, एकटे पकडले जाण्याची भीती चेपते. अशावेळी पाशवी निर्घृण कृत्य सहज जमून जाते.
-------------------
लोकशाहीतील कायदेकानून आपल्याला हवे असतात ते इतरांच्या रानटीपणापासून आपल्या सुरक्षेची तजवीज असावी म्हणून! समानता हवी असते ती उतरंडीत आपल्यापेक्षा वर असलेल्यांशी. (उतरंडीत खाली असलेल्यांपेक्षा आपण वरचढ असणो आणि राहणोच आपल्याला आवडते, हवे असते.) संपत्तीचे समान वाटप आवडते ते श्रीमंत मंडळींना धडा शिकविण्यासाठी.
जात निमरूलन आपल्या मनात, आपल्या नातेवाइकांबाबत चालते का, याचा शोध घ्यावा लागतो. हिंसाचाराचे बळी आपण असतो, तेव्हा तो अन्याय, अत्याचार असतो. आपण हिंसा केली तर त्याला अनेक न्याय्य कारणो आणि स्पष्टीकरणो त्वरेने हजर होतात.
कायद्याने धडा शिकवायचा तो इतरांना. मी कायदा तोडतो तो मात्र केवळ नाइलाजापोटी!
लोकशाहीतील न्याय्य व्यवस्थेतील दिरंगाई, तपासातील गोंधळ व भ्रष्टाचार, शासनाचा मंद कारभार, अभिजन अपराध्यांना वाचवण्याचे भ्रष्ट प्रकार व अशा अनेक कारणापोटी न्याय मिळेल, आणि मिळालाच तर तो वेळेवर मिळेल असे सामान्य नागरिकाला वाटत नाही. ‘बळी तो कान पिळी’ म्हणून बलिष्ठाचे बळीवर राज्य चालते. मग संधी मिळेल तेव्हा माणसे कायदा हातात घेऊन ताबडतोब आपल्याला वाटेल त्याला/तिला दोषी ठरवून भयानक क्रूर शिक्षा देऊ पाहतात. आपल्याकडे लोकशाहीचे मूळ सिद्धांत, आचार-विचार-भाषण-लेखन-धर्माचरण-स्वातंत्र्य, समता, बंधुत्व अजून नीटसे रुजले नसल्यामुळे मनामनातील पाशवी हुकूमशाही संधी मिळताच डोके वर काढताना दिसते. जमावाने हल्ले करून हत्त्या करणो यात हे पुन:पुन्हा प्रत्ययाला येते.
माणसाच्या मनात पिढय़ान्पिढय़ा सुप्तावस्थेत असलेल्या विवेकाला जागे होण्यास वेळ लागतो. मनाने परिस्थितीचे नीट अवलोकन करून शांत स्थितीत काही गृहीत अशा पूर्व सिद्धांतांच्या आधारे भविष्याविषयी अनुमान काढायचे असते. आजूबाजूच्या वास्तवाचे निरीक्षण करून त्याविषयी चिंतन करून इतर अभ्यासकांशी विचारविनिमय करून मग काय कृती करावी हे ठरवायचे असते. हे सर्व विचारवंतांसाठी अवघड नसते. या प्रकारचा विचार करणा:या समंजस नेत्याला प्रत्यक्ष कृती कार्यक्रम आखणो व तो अनुयायांना समजावून देणोदेखील फार कठीण नसते; पण बेभान अनुयायी तसे त्याला करू देत नाहीत. किंबहुना निर्णायकी व हिंसक होणो झुंडीला आवडते.
बेभान होण्यासाठी जात, धर्म, राजकीय, सामाजिक मुद्दे मोठय़ा प्रमाणात वापरले जातात. अल्पसंख्याकांवर हल्ला चढविला जातो. खालच्या जातीतील मुलाने उतरंड तोडीत वरच्या जातीतील मुलीशी प्रेम/विवाह करण्याचा प्रयत्न केला की ‘उच्च’ जात पिसाळून मुलाची नग्नावस्थेत धिंड काढून तुकडे करते किंवा सार्वजनिक जागी फाशी देते. कधी धार्मिक दंग्यात, कधी जबरदस्तीने केलेल्या धर्मातराचे मुद्दे घेऊन अल्पसंख्याक जाळले, मारले जातात. ट्रेनमधल्या प्रवाशांसहित डबे जाळले जातात. खैरलांजीत दलितांचे भीषण हत्त्याकांड होते. शिया-सुन्नी एकमेकांना जाळतात. चेटूक, करणी करीत असल्याच्या संशयाने चेटकीण, डाकीण ठरवून म्हाता:यांना जगभर जाळले गेले.
राजकीय मुद्दय़ांवरून, जमिनींच्या वादातून कायदा हातात घेऊन असे कितीतरी हिंसक प्रकार जगभर होत असतात.
इतिहास तपासल्यास लक्षात येते की, विचार, चिंतन, विवेक यांचे महत्त्व त्रस्त, पीडित, असुरक्षित आणि उताविळ अशा सामान्य अनुयायाला आजपर्यंत कधीच कळले नव्हते.
- आपल्या अज्ञानाची जाणीव आणि त्याविषयी न्यूनगंड ठेवून हा सामान्य (अनुयायी वृत्तीचा) माणूस आजवर समंजस नेत्यांचे आदेश विनातक्रार पाळीत होता.
प्रतिगामी, संधिसाधू नेत्यांनी लोकप्रियतेच्या हव्यासापोटी सामान्य अनुयायांचे अतिरिक्त कौतुक केले. त्याच्या परिस्थितीचे वस्तुनिष्ठ आकलन न मांडता शत्रूकडे सतत बोट दाखवले. त्यागाचे उदात्तीकरण केले. समूहाला अभ्यास व चिंतनापासून दूर ठेवीत रेडिमेड फास्टफूडसारखी मते आणि विधाने शिकवली. ती सभेत आवेशपूर्ण आवाजात पाठ म्हणून दाखवायचा सराव करून घेतला.
जेव्हा ‘जमावातील बहुसंख्य’ ही एवढीच ओळख अनुयायांना अतिरिक्त महत्त्व मिळवून देते, उथळ विचार पुरेसे वाटू लागतात, अंतिम सत्य सापडल्याचा भास होतो, तेव्हा अनुयायांच्या मनात नेत्याचे महत्त्व कमी होत जाते. अनुयायांना स्वत:चेच मत अंतिम सत्य वाटल्याने मत तयार करण्यासाठी त्यांना क्लिष्ट अभ्यास जरुरीचा वाटत नाही. आता स्वत:ची ओळख विसरलेला प्रत्येक अनुयायी संधी मिळताच बेभान जमावाचा पेटता निखारा बनतो. तीव्र भावना वेग व बहुमताचा आंधळा पाठिंबा उताविळ होण्यासाठी पुरेसा असतो. विवेकाचा शांतपणा, न्यायबुद्धीचा संयम अशा जमावाला परवडत नाही. संयमी नेतृत्व बाजूला फेकले जाते. आग पेटविणारा आवडतो, विझविणारा भेकड वाटतो.
- अविचारी समाज फारसे उलटे प्रश्न विचारीत नाही. तोडफोडीचे, हिंसेला उद्युक्त करणारे आदेश त्वरित शिरोधार्ह मानतो. असे (प्रश्न न विचारता सांगितल्या कृतीला तयार होणारे) अनुयायी ज्यांना हवे असतात ते नेते मग पुढे येतात, मान्यता पावतात. त्यांची असंस्कृत भाषा, उद्धट वर्तन, समाजाविषयी अज्ञान, हिंसेवरील विश्वास सारे मान्यता पावते. अभिरुची लोप पावते.
- जग अधिक सुसंस्कृत, प्रगत होईल अशी काही कृती करणो सुचत व रु चत नाही.
नेता सामान्य व रानटी होत जातो तसतसा सामान्यांचा आत्मविश्वास वाढत जातो. बहुसंख्यांना सामाजिक प्रश्नांमध्ये आपली उत्तरेच योग्य वाटतात. समाजव्यवस्थेला हाताशी घेऊन मग ते आपली मते इतरांवर लादण्यात यशस्वी होतात. ‘असे करू नका, याचा दूरगामी परिणाम लक्षात घ्या’, अशी आवाहने धुडकावली जातात.
कोण्या एका कारणाने संतप्त होऊन एकत्र आलेल्या झुंडीतील मुख्य मंडळी तीन प्रकारच्या भूमिका वठवीत असतात.
काही नेते, काही व्यवस्थापक, तर इतर अनुयायी असतात.
या भूमिका नंतर उन्माद उठावानुसार बदलतही असतात. नेत्यांना प्रक्षोभक विधाने/घोषणा करून, खोटय़ा अस्मिता जागवून लोकांना बेभान, उन्मादी, उतावीळ, क्रोधी बनवायचे असते. वातावरण जेवढे तापेल तेवढा वैयक्तिक विवेक त्यात जळून जातो. माणसे नुसत्या सूचनांनी पेटून अविचारी कृत्ये करायला धजावतात. एकटय़ाने जे केले नसते, करता आले नसते ते समूहात जमून जाते. स्वत:ची ओळख जमावाच्या मनात विरघळून जाते, दुष्कृत्याची जबाबदारी विभागली जाते, वातावरणातला उन्माद मनात भिनतो, एकटे पकडले जाण्याची भीती चेपते, व्यक्तिमत्त्वाचे विघटन होते, झुंडीशी नाते-निष्ठा जोडली जाते व पाशवी निर्घृण कृत्य अशा वेळी सहज जमून जाते.
बळींवर खुनानंतरही हल्ले चालू राहतात, प्रेताची विटंबना केली जाते. समाजविघातक व्यक्तिमत्त्वाच्या नेत्यांना, अनुयायांना तर नंतरही अशा कृत्यांचा ना पश्चात्ताप होतो, ना त्याची शरम वा दु:ख वाटते.
गंमत ही की, कायद्यांविषयी, लोकशाहीविषयी, विचार- विनिमयाविषयी उघड अनादर व्यक्त करणारा हा जमाव कायद्याच्या कचाटय़ातून संधी मिळताच निसटू पाहतो. जमल्यास आपल्या अविचारी कृत्याला शासनाकडून माफी मिळवू पाहतो. हिंसेचे समर्थन करणारा हा तथाकथित शूर जमाव चौकशी सुरू झाली की, (सुरक्षित जागी लपलेल्या दहशतवाद्यांच्या धिटाई(?)नुसार) स्वत:च्या हिंसक कृत्यांची जबाबदारी न स्वीकारता पळ काढतो, अदृश्य होतो.
वर्ण, जातधर्म, प्रतिष्ठा, अस्मिता, उच्चनीचतेच्या, भेदभावाच्या, श्रेष्ठत्व-कनिष्ठत्वाच्या अविवेकी कल्पना उन्माद पसरवून विवेकाचा, माणुसकीचा बळी घेत राहतात.
‘ते’ ही माणसे कोण असतात?
एकत्र कशी येतात?
झुंड कायदेकानून बाजूला फेकून स्वत:च कुणाचा बळी घेते तेव्हा नेमके काय घडते हा प्रश्न सामाजिक अभ्यासाला खूप चिंतनीय वाटतो. त्यातील काही निरीक्षणो विचारात घेऊ.
1. अशा जमावातील/झुंडीतील लोकांचे सर्वसाधारण वय 15 ते 3क् वर्षे असते.
2. यातील बरेचसे धूसर, अनोळखी, स्वत:ला अजून स्वत:ची ओळख न सापडलेले व म्हणून गोंधळलेले आणि इतरांमध्ये स्वत:चा चेहरा शोधणारे असतात.
3. आपण आज इथे नेमके का जमलेले आहोत हे नीटसे माहीत नसलेले अनेक असतात. ज्यासाठी आपण एवढा गोंधळ घालतो आहोत तो विषय नेमका न समजलेले अनेकजण या गर्दीत असतात.
4. या झुंडीतील अनेकांना दुस:या व्यक्तीबाबत, सार्वजनिक मालमत्तेबाबत, कायदा व सुव्यवस्थेबद्दल काहीही देणो घेणो नसते.
5. बरेचजण थ्रिल शोधत, कुणी करमणूक शोधत त्या गर्दीत घुसलेले असतात. त्यांना नंतरच्या गोंधळात लूटमार साधायची असते, स्त्रियांची छेडछाड करायची असते.
‘रस्त्यावरचा न्याय’ जगभरात काय दिसते?
कायद्यावर विश्वासच उरलेला नाही असं समर्थन देत स्वत:च रस्त्यावर उतरून कायदा हातात घेणारे समूह भारतात किंवा अशांत मध्यपूर्वेतच आहेत असं नाही. अमेरिकेसारख्या प्रगत देशात आजही आफ्रिकन-अमेरिकन नागरिकांना अशा प्रकारच्या सामूहिक हल्ल्यांना सामोरं जावं लागतं.
कायद्याने न्याय मिळत नाही, आपण असुरक्षित आहोत, आपल्या जीविताला, वंशाला, रोजीरोटीला आणि प्रतिष्ठेला धोका आहे असे लक्षात आले की, एका स्फोटक क्षणी समूह बेभान होतो. त्यातून अशा हत्त्या घडतात, असे जगभरातले समूह मानसिकता अभ्यासक सांगतात.
डोमेनिक रिपब्लिक नावाच्या कॅरेबियन देशांच्या समूहातल्या राष्ट्रात अलीकडेच हैतीच्या एका नागरिकाला स्थानिक लोकांनी फरफटत नेऊन फासावर लटकवला. कारण तेच, हैती स्थलांतरितांमुळे स्थानिक उद्योगांना स्वस्त मनुष्यबळ उपलब्ध झाले, आणि स्थानिकांचे रोजगार जाऊ लागले.
अमेरिकेत सर्वत्रच चिनी नागरिकांविषयी एकप्रकारचा राग दिसतो. चिनी नववर्षानिमित्त अमेरिकेत झालेल्या शक्तिप्रदर्शनाविषयी स्थानिकांमधे एकप्रकारचा रोष जाणवतो आहे. तो स्फोटक आहे, असा जाणकारांचा होरा आहे.
ङोनोफोबिया हे या अशा हल्ल्यांचे एक प्रमुख कारण हल्ली जगभर दिसते आहे. परदेशी व्यक्ती, संस्कृती, समूह यांच्याविषयी वाटणारा तिरस्कार, त्यांच्यामुळे स्थानिकांच्या रोजीरोटीवर येणारी गदा यातून समदु:खी माणसे एकत्र येऊन असे हल्ले चढवत असल्याचे जगभरातले निरीक्षण आहे.
अमेरिकेतल्या ओक्लाहोमा राज्यात सध्या ‘रेसिस्ट’ म्हणजेच वंशीय हल्ल्यांचा हैदोस सुरू आहे. एका वसाहतीमधल्या तळ्याकाठी बसून एक आफिक्रन-अमेरिकन माणूस तळ्यात कुठले तरी अपरिचित मासे फेकताना दिसले. त्यावरून शंका घेऊन त्याला असंख्य लोकांनी फोन करून धमक्या दिल्याची घटना ताजी आहे.
पूर्वी गर्दी जमवणो सोपे नव्हते. आता मात्र काही हजार लोकांची गर्दी एका मोबाइल मेसेजने, एका व्हायरल व्हिडीओमुळे जमवता येऊ शकते. त्यामुळे समूहांना भडकवायला सोशल मीडिया, इंटरनेट, टेक्नॉलॉजी याचा वापर मोठय़ा प्रमाणात केला जात आहे. नागालॅण्ड, पाकिस्तान इथे घडलेल्या अलीकडच्या समूह-उन्मादात गर्दी जमली होती ती मुख्यत: सोशल मीडियावरच्या प्रचारामुळेच!
(लेखक प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ आहेत.)