- दत्ता भगत
१५ जुलै हा नरहर कुरुंदकर यांचा जन्मदिवस. आज कुरुंदकर गुरुजी हयात असते तर त्यांच्या चाहत्यांनी त्यांचा 84 वा वाढदिवस अत्यंत आनंदाने साजरा केला असता. त्यांच्या निधनानंतर आता बत्तीस र्वष उलटून गेली आहेत. आज चाळीस वर्षापेक्षा कमी वय असणा:या पिढीला कुरुंदकर फक्त त्यांच्या लेखनातूनच समजून घेता येतात. ज्यांनी कुरुंदकर गुरुजींना कधीच पाहिले नाही अशा आजच्या तरुण मुलांनाही कुरुंदकर गुरुजींचे आकर्षण नेमके कशामुळे वाटते, हा प्रश्न माङो कुतूहल सतत चाळवत ठेवतो.
या प्रश्नाचे उत्तर कुरुंदकर गुरुजींच्या मीमांसा करणाच्या पद्धतीत शोधावे लागते.
‘तोडा, चिरा, दुग्धधाराचि येती
न हे रक्त वाहे शरीरातुनी
माझी मराठी मराठाच मीहि
असे बोल येतील हो त्यातुनी’
- हैदराबाद येथील मराठी विषयाचे व्यासंगी प्राध्यापक कै. डॉ. ना. गो. नांदापूरकर यांच्या या ओळी काही वाचकांना नक्कीच आठवत असतील. हे डॉ. ना. गो. नांदापूरकर कुरुंदकर गुरुजींचे सख्खे मामा होत. ‘मुक्त मयूराची महाभारते’ या विषयावर प्रबंध सादर करणारे नांदापूरकर मराठी वा्मय आणि संस्कृती या विषयांचा अभ्यास असणारे केवढे व्यासंगी पंडित होते याची कल्पना मागच्या पिढीला आहे. हैदराबाद येथे महाविद्यालयीन शिक्षण घेताना कुरुंदकर गुरुजींचे वास्तव्य त्यांच्या याच मामांच्या घरी होते. पण त्यावेळी ते सायन्सचे विद्यार्थी होते. इंटरमध्ये गुरुजी अनेक वेळेला नापास झाले ते याच हैदराबाद शहरात. पुढे ते नांदेडला आल्यानंतर प्रतिभानिकेतन शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले आणि बहिस्थ पद्धतीने परीक्षा देत देत इ.स. 1962 साली मराठी विषयात एम. ए. झाले. पण त्यांच्या या पदवीचा त्यांच्या वैचारिक क्षेत्रतील मान्यतेशी काहीच संबंध नव्हता. एम. ए. परीक्षा उत्तीर्ण होण्याआधीच मुंबई येथील साहित्य संघाच्या वसंत व्याख्यानमालेत इ.स. 1957 साली एक वक्ता म्हणून त्यांना निमंत्रित करण्यात आले होते.
पुणो विद्यापीठातील तत्त्वज्ञान विभागाचे प्रमुख आणि महाराष्ट्र राज्याच्या साहित्यसंस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. सुरेंद्र बारलिंगे इ.स. 1950 ते 1956 या काळात नांदेड येथील पीपल्स कॉलेजचे पहिले प्राचार्य होते. त्या काळात पोरसवदा असलेल्या नरहर कुरुंदकर यांच्याबरोबर भारतीय रसशास्त्रवर आणि सौंदर्यशास्त्रवर ते चर्चा करीत असत. आपल्या आठवणीत स्वत: बारलिंगे यांनीच हे लिहून ठेवले आहे. पदवी ही व्यावहारिक गरजापूर्तीचे साधन आहे, तिचा व्यासंगाशी काही संबंध नसतो अशी ठाम समजूत असणा:या मागच्या पिढीचे कुरुंदकर गुरुजी शेवटचे वारसदार होते.
कुरुंदकर गुरुजींनी गुरू मानले ते मात्र प्रा. भालचंद्र महाराज कहाळेकर यांना. तेही मराठी विषयाचे प्राध्यापक होते. नांदेडपासून वीस- बावीस मैलावर असलेल्या कहाळा येथील मठाचे ते धर्माधिकारी, म्हणून ‘महाराज’ हे संबोधन त्यांच्या नावाला चिकटले होते.
कुरुंदकर गुरुजींच्या व्यक्तिमत्त्वात त्यांचे मामा डॉ. ना. गो. नांदापूरकर आणि गुरू प्रा. भालचंद्र महाराज कहाळेकर या उभयतांचे खोलवर संस्कार झाले होते. माङयापेक्षा अधिकारवाणीने दोघेजण हे सांगू शकतात हे मला माहीत आहे. एक आहेत करुंदकर गुरुजींचे मित्र ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तु. श. कुलकर्णी आणि दुसरे आहेत गुरुजींचे आवडते विद्यार्थी मित्र गुरुवर्य प्रा. भु. द. वाडीकर. पण लेखनाविषयी काहीसे उदासीन आणि वयोमान यामुळे ते लेख लिहिण्याची शक्यता कमी. म्हणून आजच्या तरुण वाचकांसाठी या उभयतांच्या व्यक्तिमत्त्वातले कोणते विशेष एकात्म होऊन गुरुजींनी पचवून घेतले होते त्याचा हा थोडासा परिचय!
कुरुंदकर गुरुजींना कुठल्याही विद्याथ्र्याने कुतूहल म्हणून कुठलाही प्रश्न विचारला की ते समोरच्या विद्याथ्र्याकडे दुर्लक्ष न करता त्याचा वकूब लक्षात घेऊन त्याला समजेल अशा सुबोध भाषेत उत्तर सांगण्याचा प्रयत्न करीत असत. एक तर गुरुजींचे वाचन औरस चौरस होते. आणि दुसरे म्हणजे सोदाहरण विवेचन करण्याची त्यांची विवेचक शक्ती इतकी की समोरच्या विद्याथ्र्याचे सहज समाधान होत असे. त्यात समोरचा विद्यार्थी त्यांच्याविषयी श्रद्धा बाळगणारा असला की तो आनंदी होऊनच उठून जात असे. डॉ. ना. गो. नांदापूरकर यांच्या स्वभावातूनच गुरुजींनी हे वैशिष्टय़ घेतले असावे.
एकदा कुरुंदकर गुरुजींनी डॉ. नांदापूरकरांना हल्ली काव्यशास्त्रत भरपूर चर्चा होणारा प्रश्न विचारला- रस म्हणजे काय? त्यावेळी ते ना इंटर पास होते ना वा्मयाचे अभ्यासक. आणि वय तर किती असेल फार फार तर 17-18 वर्षाचे. त्याउलट नांदापूरकरांना एक अभ्यासक म्हणून सर्वदूर दरारा होता. पण आपल्या भाच्याने एवढा गहन प्रश्न विचारला म्हणून त्यांनी दुर्लक्ष न करता गंभीरपणो उत्तर दिले,
‘अरे आपण आंबा खातो की नाही? आंब्याच्या कोयी आणि साली आपण फेकून देतो आणि रस तेवढा खातो. त्याऐवजी रस फेकून देऊन कोयी आणि साली खातो का? आंब्यात खाण्यायोग्य रस असतो. तद्वत कवितेत आस्वाद घेण्यायोग्य जो महत्त्वाचा भाग असतो त्याला रस म्हणतात.’’
हाच प्रश्न जेव्हा कुरुंदकरांनी जेव्हा कहाळेकरांना विचारला तेव्हा ते म्हणाले, ‘‘रस म्हणजे काय हे तुम्हाला कळले हे बरे झाले. आता तांबे यांची ‘पन्नास वर्षानंतर’ ही कविता वाचून त्यातील साली कोणत्या आणि कोयी कोणत्या त्या बाजूला काढा म्हणजे त्या कवितेतला रस कोणता हे तुम्हाला सहज ओळखता येईल.’’
आता खरोखरच कुरंदकर गुरुजींनी हा प्रश्न त्या महान प्राध्यापकांना विचारला असेल आणि त्यांनी वरीलप्रमाणो कुरुंदकर गुरुजींच्या प्रश्नाचे उत्तर दिले असेल का? कोणास ठाऊक! पण स्वत: कुरुंदकर गुरुजींनी आपल्या लेखात जे नमूद करून ठेवले ते मी वर लिहिले. ते हाडाचे शिक्षक होते. त्यामुळे विद्याथ्र्याना सहज समजेल एवढे सुलभ उत्तर देणो हे त्यांचे सामथ्र्य होते, तर समोरच्या विद्याथ्र्याला कुठलेच उत्तर न देता त्याने स्वत:हून उत्तर देण्यासाठी प्रवृत्त व्हावे एवढी चालना त्याला द्यावी ही कहाळेकर महाराजांची खास लकब होती.
सुबोध उत्तरे बौद्धिक शीण आणत नाहीत. विचारशक्तीस चालना देणारी उत्तरे एक तर तुमचा गोंधळ वाढवतात, फसव्या उत्तरांकडे घेऊन जातात किंवा संशयास्पद उत्तरांकडे घेऊन जातात. या पद्धतीत विद्याथ्र्याच्या प्र™ोचा आणि विचारस्वातंत्र्याचा विकास होऊ शकतो. कुरुंदकर गुरुजींच्या व्यक्तिमत्त्वात ही दोन्ही वैशिष्टय़े एकवटलेली होती. त्यांच्या भाषणात या दोन्ही गोष्टी एकात्म होऊन प्रकट होत. म्हणून ‘हे तर आपणाला आधीच माहीत होतं, मग आपल्याला सुचलं कसं नाही?’ असा एक आनंद श्रोत्यांना मिळत असे.
ते तैलबुद्धीचे होते. विश्लेषकता आणि तर्कनिष्ठ विवेचन शक्ती या दोन्ही गोष्टींचे सामथ्र्य त्यांच्यात एकवटलेले होते आणि या दोन्ही वैशिष्टय़ांना पेलून धरेल असे भाषाभिव्यक्तीचे सामथ्र्यही त्यांच्यात होते.
पण याशिवाय आणखी एक गुण कुरुंदकरांच्या व्यक्तिमत्त्वात होता. त्यांच्या विवेचन, विश्लेषणाचा पाया मार्क्सवादी ऐतिहास भौतिकवादी मीमांसेने मजबूत केलेला होता. ज्याला मार्क्सवाद हा शब्द उच्चारल्याबरोबर ‘वैचारिक ठेच’ लागते त्याला त्यांचे हे तिसरे वैशिष्टय़ कळणो अत्यंत अवघड आहे. त्यासाठी मार्क्सवाद आणि मार्क्सवादी मीमांसा पद्धत यातील फरक नीट माहीत असावा लागतो. या मीमांसा पद्धतीचा अप्रत्यक्ष असा पहिला स्पर्श बहुधा कहाळेकर महाराजांमुळे कुरुंदकरांना घडला असावा. म्हणून ते मार्क्सवादी होते पण ते पोथिनिष्ठ मार्क्सवादी झाले नाहीत याचे श्रेय मात्र त्यांचे त्यांनाच आहे.
त्यांच्या मीमांसा पद्धतीतून त्यांनी केलेले मध्ययुगाचे आकलन कसे होते याचे एक उदाहरण अखेरीस देतो. डॉ. कोसंबी यांच्या लेखावर प्रतिक्रिया व्यक्त करताना खालील उतारा आलेला आहे-
इ.स.च्या दहाव्या- अकराव्या शतकापासून चौदाव्या शतकार्पयत स्मार्त आणि वैष्णव परस्परांशी लढत होते. एकमेकाला लुटत होते. एकमेकांची डोकीही फोडत होते. खरोखर ही सारी मंडळी विवर्तवाद की परिणामवाद, द्वैत की विशिष्टाद्वैत या तात्त्विक मुद्दय़ासाठी लढत होती की काय? तात्त्विक बारकाव्यासाठी हा लढा दिसत नाही. आपापसात दीर्घ द्वेष आणि वैर असणारे, एकमेकांचा घात करणारे शैव-वैष्णव दोघांच्याही देवधर्माचा निर्घृणपणो नाश करणा:या मुसलमानांची सेवा मात्र प्रामाणिकपणो करीत होते! या घटना डोळ्यासमोर ठेवल्या तरीही शंकर -रामानुज यांना गीतेचा आधार घ्यावासा वाटला ज्याची कबीर, चैतन्यांना गरज वाटली नाही. हे पाहिले म्हणजे प्रश्न पडतो की, गीतेचा आधार या तरी मंडळीना का घ्यावासा वाटला? याला माङो उत्तर असे की, ‘जातिव्यवस्था मान्य केल्यानंतर उरलेल्या सर्व प्रश्नांवर गीता अनिश्चित होती हे तिच्या प्रामाण्याचे सर्वात मोठे कारण असावे.’’
- आजही सत्तेत वरिष्ठ वर्णीय विचारसरणीच्या हाती राजकीय सत्तासूत्रे येताच ‘गीता’ हा राष्ट्रीय ग्रंथ मानला जावा, अशी मागणी का पुढे येते या प्रश्नाचे उत्तर देण्याची क्षमता कुरुंदकरांनी सुचवलेल्या या दिशेत आहे असे मला वाटते.
एक नोंद
इसवीसनपूर्व 200 ते इसवीसन 200 या चारशे वर्षाच्या एकाच काळात भारतात सर्वत्र स्मृतिग्रंथ निर्माण होतात, गीता या ग्रंथाची संहिता निर्माण होते आणि समाजात वर्ण व जातिव्यवस्थाही बळकट होते, या तिन्हीचे आंतरिक नाते लक्षात घेऊन नरहर कुरुंदकरांनी ‘मनुस्मृती’ या ग्रंथातल्या दंडसंहितेचा, गीतेतल्या जन्माधिष्ठित वर्णव्यवस्थेचा आणि महाभारतातल्या व्यक्तिरेखांचा जो उलगडा केला आहे त्याचे एक समवायच्छेदे आकलन करून कुरुंदकर गुरुजींचे विचाराच्या क्षेत्रतले योगदान ठरायला हवे.
- ते अजूनही पुरतेपणाने नोंदवले गेले आहे असे मला वाटत नाही.
(लेखक ख्यातनाम नाटककार आहेत.)