- सुधीर लंके
जात, गोत्र ओलांडलं तर मुडदे पडणा:या हरियाणातल्या ‘घोडनव:यां’च्या आणि ‘मिसिंग’ मुलींच्या आंतरजातीय, आंतरराज्यीय विवाहाची ऑँखो देखी कहाणी.
हरियाणाच्या रस्त्यांवरून फिरत असताना हायवेच्या कडेला काही घरांच्या भिंतींवर जागोजागी घोषणा नजरेस पडल्या,
‘फांसी हो गऊ हत्त्या करनेवालों को, गाय को राष्ट्रीय पशु बनाओ’.
महाराष्ट्राप्रमाणो हरियाणाच्या विधानसभेनेही गत मार्चमध्ये गोहत्त्या बंदीचा कायदा केला. त्यामुळे काही हिंदुत्ववादी संघटनांनी या घोषणा लिहिलेल्या असाव्यात.
पण हरियाणात जशी गावं जवळ येऊ लागली, तसे दुसरे सरकारी फलक जागोजागी दिसू लागले-
‘बेटी बचाव, बेटी पढाओ’.
‘हमारी बेटियाँ, हमारा गौरव’.
एकीकडे गाय वाचविण्याची हाक, दुसरीकडे मुली!
गायींपेक्षाही इथं मुली वाचविण्याचं आव्हान मोठं आहे, हे या घोषणा सांगत होत्या.
मी झज्जरच्या बसस्थानकावर उतरताक्षणी गावाच्या नावाआधी पहिला फलक दिसला तो हाच. झज्जरचे सरकारी रुग्णालय व इतर सरकारी कार्यालयांत गेलो तर तिथंही पावलागणिक हीच वाक्यं लिहिलेली- बेटी बचाओ. या फलकांवर हरियाणाच्या कल्पना चावला व साईना नेहवालचे फोटो आवजरून छापलेले.
हरियाणा राज्याचं स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तर देशात सर्वात कमी आहे. एक हजार पुरुषांमागं इथं 837 स्त्रिया आहेत. झज्जर जिल्हा तर सर्वात मागे. 2क्11 च्या जणगणनेनुसार तिथं हे प्रमाण 782 वर येऊन ठेपलंय. म्हणून एड्स, क्षयरोग या रोगांच्या निमरूलनापेक्षाही इथं ‘मुली वाचवा’च्या फलकांची गर्दी अधिक दिसते.
- या वर्षीच्या 22 जानेवारीला हरियाणातील पानिपतवरून नरेंद्र मोदींनी ‘बेटी बचाओ’ची देशव्यापी हाक दिली. कुरुक्षेत्र-पानिपतला लागूनच रोहतक, झज्जर हे जिल्हे आहेत. झज्जरला जाण्यापूर्वी मी रात्री रोहतकच्या एका हॉटेलमध्ये उतरलो होतो. या हॉटेलच्या इतर बहुतेक खोल्यांत ‘कपल्स’ होती. हॉटेलच्या रजिस्टरवरील नोंदीवरून ते स्पष्टपणो दिसत होतं. माझी एकमेव खोली होती जेथे मी एकटा होतो. म्हटलं, केवढी ही समता आहे! पण, हॉटेलच्या खोल्यांत दिसणारी ही स्त्री-पुरुषांची समता रात्रीतून गायब झाली. सकाळी मी उठेर्पयत बहुतेक खोल्या रिकाम्या झाल्या होत्या. माङयासमोर एक-दोन जोडय़ा बाहेर पडल्या. त्यात बायकांनी तोंडं बांधलेली. हॉटेलच्या खोल्यांत एकसारखं दिसणारं स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तर पुढे हरियाणाच्या खेडोपाडी जाताना कमी कमी व्हायला सुरुवात झाली. स्त्रियांची संख्या घटताना दिसू लागली अन् त्यांच्या चेह:यांवर ‘ढाटा’ म्हणजे घुंघट दिसू लागले.
मु. पो. लाडपूर
- झज्जर जिल्ह्यातील लाडपूर या गावात यावर्षी स्त्री-पुरुष जन्मदराचं प्रमाण आहे दर हजारी अवघं 29क्. म्हणजे गावात जी चाळीस बालकं जन्माला आली, त्यात 31 मुलगे, तर केवळ नऊ मुली जन्मल्या. म्हणून हे गाव बघायला निघालो होतो. झज्जरपासून दिल्लीच्या दिशेने जाताना हे गाव लागतं. या गावापासून दिल्ली अवघी 5क् किलोमीटरवर. पण या पन्नास किलोमीटरवर मुली अशा जन्मानेच ‘मिसिंग’ आहेत. हरियाणात गुडगाव हे शहर मोठं आयटी सेंटर आहे. इतर जिल्ह्यांत मात्र रोजगाराची फारशी साधनं नाहीत. त्यामुळे शेती आणि वीटभट्टय़ा हा मोठा रोजगार. लाडपूरला जाताना या भट्टय़ा डोकवत होत्या. स्त्रीभ्रूण हत्त्यांच्या विषयांवर हरियाणातील गावांत जाऊन बोलणंही सोपं नाही. कारण इथल्या ऑनर किलिंगच्या अनेक कहाण्या अंगावर शहारे आणतात. महिलांना जेमतेम स्वातंत्र्य आहे. काही स्वयंसेवी संस्था व स्थानिक पत्रकारांनी मला त्याची कल्पना दिली होती. त्यात मी परमुलखातला. त्यामुळे झज्जरपासून जवळ असलेल्या बादली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिका:यांशी गट्टी जमवून जगमालसिंग नावाचे पर्यवेक्षक सोबत घेतले. ते जातीनेही ‘जाट’ या प्रबळ जातीचे होते. त्यामुळे मला एक भक्कम संरक्षणच होतं. हरियाणात घरोघरी हुक्का चालतो. जुन्या हिंदी चित्रपटांत तो हमेशा दिसायचा. गावात शिरताच हुक्का तोंडात घालून तंबाखूचा धूर काढणारी माणसं जागोजागी दिसू लागली. एका ठिकाणी सात-आठ म्हाता:यांचं मोठं टोळकं बसलं होतं. हुक्का पीत अन् पत्ते पिसत. जगमालसिंगांनी मला तेथेच थांबवलं. हे सगळे म्हातारे तरुणपणी पहिलवान असावेत, हे त्यांची शरीरयष्टी सांगत होती. अंगावर पांढरे सदरे अन् पायजमे. हरियानवी पहिलवान. हरियाणाच्या लोकांची शरीरयष्टीच उंचीपुरी व धिप्पाड असते. पहिलवानांसाठी हे राज्य प्रसिद्ध आहे. या गावात दोन-तीन आखाडे असल्याचे जगमालसिंग वाटेतच म्हणाले होते.
त्याची प्रचिती आली. पत्ते खेळणा:यांत गावचे माजी प्रधान नफेसिंगही होते. जगमालसिंगांनी बोलावल्यावर ते बाजेवर बसून हुक्का पीत पीत माङयाशी बोलायला लागले. गावच्या हवा-पाण्याबाबत थोडीफार प्राथमिक चर्चा केल्यावर मी थेट विषयाला हात घातला- ‘‘आपके यहा शादी के लिए बेटिया नही मिलती ऐसा सुना है.’’
हा प्रश्न नफेसिंगांच्या जखमेवर मीठच चोळून गेला. त्यांनी आपली घरचीच कहाणी मांडली. ते सांगू लागले, ‘‘मला सात नातू आहेत अन् दोन नाती. त्यातील तिघांचे वय आहे 19, 21 व 22. पण लगAाला मुली मिळेनात.’’
मी म्हटलं, ‘‘मग आता काय करणार?’’
ते पटकन उत्तरले, ‘‘चुन्नी उडाके ले आयेंगे.’’
मला याचा अर्थच कळेना. मग जगमालसिंगांनी खुलासा केला. ज्या मुलांना लगAासाठी मुली मिळत नाहीत, ती कुटुंबं शेजारच्या उत्तर प्रदेश, बिहार, बंगालमध्ये जाऊन तेथील मुलींशी लगA करून त्यांना आणतात. तिकडे जी गरीब कुटुंबं आहेत, ते लोक थोडाफार हुंडा घेऊन आपल्या मुली देतात. ब:याचदा वीटभट्टय़ांवर बाहेरच्या राज्यातून कामगार येतात. त्यांच्याही मुलींशी लगA केलं जातं. याला म्हणतात ‘चुन्नी उडाना.’
नफेसिंग म्हणाले, ‘‘बरात को खाना हम देवांगे.’’ म्हणजे मुलीच्या व:हाडींचं खाणंपिणंही हेच करणार. साधारण पंधरा घरांमागे एक बाहेरची मुलगी असते. ब:याचदा बाहेर जाऊन चोरून लग्नंकेली जातात. अनेकदा एखाद्या घरात अनोळखी महिला दिसते. तेव्हा सर्वजण ओळखून जातात, यांनी बाहेरून सूनबाई आणली.
हरियाणात लगAात जात-गोत्र पाहिलं जातं. प्रेमविवाहात जात-गोत्र ओलांडलं तर मुडदे पडतात म्हणजे ऑनरकिलिंग घडतं. तेच राज्य आंतरजातीय व आंतरराज्यीय विवाहांना अशा पद्धतीने स्वीकारतं, ही क्रांतीच म्हटली पाहिजे. अर्थात यात पुरोगामीपणापेक्षा मजबुरी व मुलीला खरीदण्याचा भावच अधिक असावा.
पत्ते खेळत बसलेल्या सतपाल यांचं दु:खही हेच होतं. तेही नातवांना मुली शोधताहेत. डोक्यावर टक्कल असलेले पन्नाशीतील राम कौर हुक्का पीत होते. सगळे त्यांच्याकडे बोट करून सांगायला लागले, ‘‘ये देखो इनकी शादीही नही हुई.’’ या चर्चेत रणधीर नावाच्या गृहस्थांचा धीर सुटत चालला होता. न राहून ते शेवटी रागाने माङयावर उसळलेच, ‘‘तने क्या मतलब है, जा भाई.’’ मला माहिती देणा:या इतरांवरही ते चिडून बोलायला लागले. आपली दुखणी अशी वेशीवर टांगणो त्यांना भावले नव्हते. त्यामुळे रागरंग पाहून आम्ही आटोपते घेतले.
जवळच अंगणवाडी होती. तेथे आरोग्य केंद्राच्या ‘एएनएम’ (परिचारिका), आशा वर्कर, अंगणवाडी सेविका बसल्या होत्या. आम्ही येणार असल्याने त्या दुपार्पयत थांबून होत्या. ‘एएनएम’ प्रियंका गुलियाला दिल्ली व चंदीगडहून सतत फोन सुरू होते. स्त्री-पुरुष जन्मदराची आकडेवारी मागणारे. ती वैतागून म्हणाली, ‘‘ये सेक्स रेशिओने परेशान कर रखा है.’’
या गावातील दहा-बारा सुना या परराज्यातून आल्याचे अगोदरच्या चर्चेतून समजले होतेच. त्यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केल्याने सेविकेने दोघींना अंगणवाडीत बोलावून आणले.
त्यातील आरती नावाची एक तरुण महिला. डोक्यावर तिने ओढणीचा पदर घेतला होता; घरातील कुणी आलं की लगेच तोंडावर घुंघट घेण्यासाठी. तिची गरिबी चेह:यावरच दिसत होती. आल्यापासून ती काहीच बोलेना. लसीकरणासाठी आल्यासारखी नुसती बसून होती. केवळ ऐकायची. चौकशीअंती कळले, ती आसामची असल्याने तिला हरियानवी येत नाही. केवळ समजत होती. आसाममधील ती कोस जातीची. त्या चौघी बहिणी. घरची गरिबी असल्याने लगA करून ही हरियाणात आली. जाटांच्या घरात. तिचे आता सहसा माहेरी जाणोही होत नाही. तिला एक मुलगी आहे. दुस:या अपत्याची वाट पाहणो सुरू आहे. आरतीचा कुटुंबात संवाद कसा होत असेल बरे?
दुसरी सून होती मध्य प्रदेशची. तिच्यासोबत तिची सासू शीलादेवीही अंगणवाडीत आली होती. बहुतेक उत्तरे सासूनेच दिली. शीलादेवीचे पती मध्य प्रदेशात नोकरीला आहेत. त्यामुळे दोन्ही सुना त्यांनी तिकडूनच करून आणल्या.
लाडपूरला येण्यापूर्वी मी मातनहील गावात गेलो होतो. तेथेही उत्तर प्रदेशातून आलेली सून रेखा भेटली होती. रेखा व तिच्या बहिणीचे एका मध्यस्थाने पैशाच्या मोबदल्यात हरियाणात लग्न लावून दिल्याचे ती सांगत होती. निदान उत्तर प्रदेश, बिहार व मध्य प्रदेशातील मुलींना हरियाणाची भाषा समजते. भाषेमुळे त्या रुळतात; पण, बंगाल, आसामच्या तरुणी मात्र वर्षानुवर्षे अबोल होऊन जगतात. हीही एक प्रकारे त्यांची हत्त्याच म्हणायची.
लाडपूरहून परतताना जगमालसिंग सांगत होते, की आमच्याकडे गावात जाऊन महिलांना भेटणं एवढं सोपं नसतं. आम्ही सरकारी कर्मचारी असल्याने तुम्हाला ते शक्य झालं. रात्री तुम्हाला एकही महिला घराबाहेर दिसणार नाही.
लाडपूर सोडून शेजारच्या माजरी या गावात गेलो. तेथेही एक हजार मुलांमागे मुलींचं प्रमाण आहे 481. गावचे प्रधान रणवीरसिंग त्यांच्या दरवाजात बसले होते. दरवाजा म्हणजे घरातील मोठा हॉल. शेजारच्या गावातील काही लोक त्यांच्याकडे एका नवरा-बायकोची भांडणो सोडविण्यासाठी आले होते.
रणवीरसिंगांनी हरियाणातील जातव्यवस्थेची वीण उलगडून सांगितली. ते म्हणाले, ‘‘आमच्याकडे मुलगी हा सामाजिक प्रतिष्ठेचा विषय आहे. त्यामुळे तिची इज्जत महत्त्वाची मानली जाते. या सुरक्षिततेपायीही अनेक लोकांना मुली नकोशा असतात. आमच्याकडे लग्नात गोत्रला खूप महत्त्व असतं. स्वत:चे, आईचे व वडिलांच्या आईचे जे गोत्र आहे, त्यात लगA होत नाही. गाव हे गोत्रवरूनच ओळखलं जातं. गावातही लगA होत नाही. आपल्या गोत्रचं गाव ज्या गावाला स्पर्श करत असेल, तेथेही लगA होत नाही. भाईचा:यात जे गोत्र असते तेथेही लगA होत नाही. जाट समाज हरियाणात मोठय़ा संख्येने आहे. जाट शेती करतात. एकटय़ा जाटांमध्ये काद्यान, गहलावत, एहलावत, सैहरावत, महेलावत, धनखड, गुडिया अशी 35क् गोत्रं आहेत. त्यात वरील सगळी नियमावली लावून सोयरिक जुळवायची. त्यामुळे लगA जमविताना मोठय़ा अडचणी येतात. गोत्रंची गावे मिळून ज्या पंचायती बनतात, त्याला ‘खाप’ पंचायती म्हणतात. ‘गुडिया खाप’ ‘मलिक खाप’ अशा पंचायती असतात.’’
रणवीरसिंगांच्या बोलण्यात लगA कसे होईल यापेक्षा कोठे-कोठे होणार नाही, या अटीच जास्त ऐकायला मिळाल्या. विवाह संस्थेत काही गडबडी झाल्या तर खाप पंचायती आक्षेप घेतात. ऑनर किलिंगला खाप पंचायती जबाबदार असल्याचा आरोप होतो; पण हरियाणात कोणी ते मान्य करत नाही. खाप पंचायतींविरोधात सहसा कुणी बोलत नाही, असे निदर्शनास आले. गोत्र पाहणारी माणसं आता मजबुरीने परराज्यातून सुना मात्र आणू लागलेत..
सायंकाळनंतर मुली गायब;
बहिणींपेक्षा भाऊ अधिक!
‘ब्रेक थ्रो’ या संस्थेसह अनेक स्वयंसेवी संस्था सध्या हरियाणात लिंगभाव दूर करण्याबाबत व स्त्रीभ्रूणहत्त्या रोखण्याबाबत काम करतात. ब्रेक थ्रो या संस्थेने वेगवेगळ्या कॉलेजांमध्ये जाऊन दहा हजार मुला-मुलींचे सर्वेक्षण केले. रस्त्यांवरून महिला गायब आहेत का? घरात, बाहेर महिला निर्णय घेतात का? असे प्रश्न या संस्थेने तरुणांना विचारले. या संस्थेला तरुणांनी दिलेली उत्तरं धक्कादायक आहेत. 66 टक्के उत्तरदात्यांनी सांगितलं, की अंधार झाल्यानंतर त्यांना स्त्रिया-मुली सार्वजनिक ठिकाणी दिसत नाहीत. केवळ 11 टक्के महिला संघटित क्षेत्रत काम करतात. घरात व नातेवाईक परिवारात किती महिला आहेत, या प्रश्नावर हे प्रमाण 47 टक्केच असल्याचं आढळलं. अनेक तरुण म्हणाले, की बहिणींपेक्षा आम्हाला भाऊ अधिक आहेत.
‘लाडो’ची सेल्फी
हरियाणात मुलींची संख्या केवळ जन्माच्या रकान्यात कमी आहे असे नव्हे, तर अनेक घरांत मुलींचे फोटोही दिसत नाहीत. त्यामुळे जंग जिल्ह्यातील बिबीपूर गावचे सरपंच सुनील जगलान यांनी या महिन्यात एक स्पर्धाच आयोजित केली होती. आपल्या मुलींसोबत सेल्फी काढण्याची स्पर्धा ! या आवाहनावरून त्यांच्या व्हॉट्स अॅपवर तब्बल 794 सेल्फी आल्या.
या स्पर्धेत जगलान यांना जो अनुभव आला तो खास नमूद करण्यासारखा आहे. स्पर्धा अगदी साधी होती - आपल्या मुलींसोबत फोटो काढून ते पाठवायचे. पण, हरियाणातील अनेक पालकांसमोर मोठा प्रश्न होता, सेल्फीसाठी मुली आणायच्या कोठून? घरात मुलीच नाहीत, सेल्फी काढणार कशी?
जगलान यांना अनेकांनी ही अडचण बोलूनही दाखविली. त्यावर त्यांनी तोडगा सुचवला : ‘मुली नसतील तर बहिणीसोबत फोटो काढा, भावाच्या मुलींसोबत काढा. पण मुली तुमच्या फ्रेममध्ये येऊ द्यात. बेटी बचाओ असं केवळ म्हणू नका, तर दिल की बात चेहरेपे नजर आने दो’. जगलान सांगतात, ‘‘या स्पर्धेच्या निमित्ताने आमच्या गावातील अनेक बुजुर्गाना सेल्फी काय असतं ते तर कळलंच; परंतु अनेकांनी मुलींसोबतचे फोटोही प्रथमच बघितले, काढले. मुलींचं अस्तित्व अधोरेखित झालं.’’ दिल्लीचे अमर डागर, कुरुक्षेत्रतील अमित सिंग व जिंद जिल्ह्यातील भूपसिंह वर्मा यांना या सेल्फी स्पर्धेत बक्षीस मिळालं.
हे गाव केवळ सेल्फी काढून थांबलेलं नाही. बिबीपूरमध्ये एकेकाळी मुलींचा जन्मदर होता दरहजारी 596. सरपंच जगलान यांनी ‘बेटी बचाओ’ची मोहीमच उघडल्याने हे प्रमाण आता बरोबरीत आलंय. या गावाने खास स्त्रीभ्रूण हत्त्या या विषयावर भरवलेल्या ग्रामसभेत भ्रूणहत्त्या झाल्यास 3क्2 कलम लावण्याची मागणी केली. गत लोकसभा व विधानसभा निवडणुकीत गावाने प्रत्येक उमेदवाराकडे मुलींची संख्या वाढविण्यासाठी त्यांच्याकडे काय कार्यक्रम आहे, तो जाहीर करावा, असा आग्रह धरला होता. गावात महिलांसाठी स्वतंत्र ग्रंथालय आहे. त्यात महिला या विषयाशी संबंधितच 9क्क् पुस्तकं आहेत. शिवाय ‘लाडो स्थल’ या नावाचे खेळण्याचे मैदान आहे.
(लेखक ‘लोकमत’च्या पुणे आवृत्तीत मुख्य उपसंपादक आहेत.)