'इस्लाम'ला बहुमतासाठी बिनशर्त पाठिंबा द्या; शिंदेसेनेसह एमआयएमला पाठवला प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 06:21 IST2026-01-19T06:20:59+5:302026-01-19T06:21:17+5:30
शिंदेसेनेसह एमआयएम यांच्याकडे बिनशर्त पाठिंबा देण्यासाठी प्रस्ताव पाठविल्याची माहिती

'इस्लाम'ला बहुमतासाठी बिनशर्त पाठिंबा द्या; शिंदेसेनेसह एमआयएमला पाठवला प्रस्ताव
मालेगाव (नाशिक) : मालेगाव महापालिका निवडणुकीत सर्वाधिक ४० जागांवर विजय मिळविणाऱ्या इस्लाम आणि समाजवादी पार्टी यांच्या मालेगाव सेक्युलर फ्रंटने बहुमतासाठी लागणारी ४३ ही मॅजिक फिगर गाठण्यासाठी राजकीय हालचाली गतिमान केल्या असून, शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर शिंदेसेनेसह एमआयएम यांच्याकडे बिनशर्त पाठिंबा देण्यासाठी प्रस्ताव पाठविल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
निवडणूक निकालानंतर कोणती नवीन राजकीय समीकरणे उदयास येतात याबाबत आता सर्वांची उत्सुकता ताणली गेली आहे. दरम्यान, महापौरपद पूर्वला आणि उपमहापौरपद पश्चिमला हा गेल्यावेळचा फॉर्म्युला यावेळी पुन्हा राबविला जाण्याचीही दाट शक्यता वर्तविली जात आहे. महापालिका निवडणुकीत सर्वाधिक ३५ जागा जिंकून 'इस्लाम' हा सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे.
शिंदेसेनेला इस्लाम व एमआयएम या दोन्ही पक्षांकडून प्रस्ताव आले आहेत, तर दादा भुसे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून कोणासोबत सत्तेत सहभागी व्हायचे हे निश्चित करतील- अॅड. संजय दुसाने, जिल्हाप्रमुख, शिंदेसेना, मालेगाव ग्रामीण
कोणत्याही स्थितीत सांप्रदायिक पक्षांशी युती केली जाणार नाही. 'इस्लाम' सोबत बिनशर्त चर्चा करणे कठीण आहे- मौलाना मुफ्ती मोहम्मद, आमदार, मालेगाव मध्य