"मुंब्राचं काय बोलता, आम्ही महाराष्ट्रातही चांगला हिरवा रंग पसरवू", इम्तियाज जलीलांचं सोमय्यांना आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 20:51 IST2026-01-24T20:48:12+5:302026-01-24T20:51:30+5:30
'सगळ्या मुंब्राला हिरव करू' असे म्हटलेल्या नगरसेवक सहर शेखची एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी थेट भाजपाचे नेते किरीट सोमय्यांनाविरोधात दंड थोपटले.

"मुंब्राचं काय बोलता, आम्ही महाराष्ट्रातही चांगला हिरवा रंग पसरवू", इम्तियाज जलीलांचं सोमय्यांना आव्हान
"मी पुन्हा एकदा सांगतोय, ऐका. आमची जी मुलगी निवडून आली आहे सहर, तिच्या विधानावर आम्ही अजिबात वेगळी भूमिका घेत नाहीये. अजिबात नाही. आम्ही पूर्णपणे, पूर्ण ताकदीने एमआयएम पुन्हा एकदा सांगतो आहोत, फक्त मुंब्राचं काय बोलत आहात. येणाऱ्या काळात आम्ही महाराष्ट्र चांगल्या प्रकारे हिरवा करू", असे म्हणत इम्तियाज जलील यांनी भाजपाला आव्हान दिले. किरीट सोमय्या यांना तोतरा म्हणत त्यांनी डिवचले.
माजी खासदार आणि एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी नगरसेविका सहर शेख यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "यांचा पक्ष गुंडे आणि मवाल्यांनी भरलेली आहे. पोलीस जर त्यांना नियंत्रित करू शकत नाहीये, तर तुम्ही आमच्यावर दबाव टाकणार का? कोण आहे तो?", असा सवाल जलील यांनी पोलिसांना केला.
आने वाले वक्त के अंदर हम महाराष्ट्र के अंदर अच्छा खासा हरे रंग को फैलाएंगे !!@imtiaz_jaleel sb#imtiazjaleel#Maharashtra#aimim#india#highlight#ViralVideospic.twitter.com/27Atz3o535
— Shams AIMIM (@AimimShams) January 24, 2026
'एमआयएम १२५ जागा कशी जिंकली?'
"या मुलीवर, तिच्या कुटुंबावर ज्या पद्धतीने दबाव आणला गेला. आम्ही आज बैठक घेतली. त्यात आम्ही सांगितलं की, लोकांचे आभार मानले पाहिजे आणि मुंब्राच्या विकासासाठी पुढे जायचे आहे. इथले रस्ते एका समाजाचे लोक वापरत नाही. इथल्या दुर्गंधीचा त्रास फक्त एका समाजाला होत नाही. या सगळ्या गोष्टी आम्ही करणार आहोत. पण, लोकांना या गोष्टीचा त्रास होतोय की, एमआयएम १२५ जागा कशी जिंकली?", अशी टीका जलील यांनी केली.
सहरचे विधान, हे पक्षाचे विधान
"मी आणि आमच्या पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी हा निर्णय घेतला की, सहरने जे विधान केले, ते पक्षाचे विधान आहे. पक्ष तिच्यासोबत पूर्णपणे उभा आहे. पण, जर तुम्ही स्थानिक पातळीवर पोलीस येणार म्हणून दबाव टाकत आहेत. तर आज सहरने केलेले विधान संपले आहे. आता इम्तियाज जलील हे बोलून जात आहे आणि त्या तोतऱ्याला सांगून जातोय की, तुला माझ्या विरोधात काय कारवाई करायची ती कर", असे आव्हान इम्तियाज जलील यांनी किरीट सोमय्या यांना दिले.
जलीलांनी देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख का केला?
"आम्ही सहरला सांगितलं होतं की, कोणत्याही प्रकारे माफी मागायची नाही. हिरवा तुम्हाला इतका झोंबला की जसं काय तो दहशतवादी शब्द आहे. दहशतवादी शब्दाचा वापर केल्या गेल्यासारखं. देवेंद्र फडणवीस होर्डिंग लावून म्हणत असतील की, छत्रपती संभाजीनगर भगवे झाले आहे", असे इम्तियाज जलील म्हणाले.
"एकनाथ शिंदे असे म्हणत असतील की संपूर्ण ठाणे भगवे आहे. ते कायद्याच्या चौकटीत बसते. मग मी जर मुंब्रा हिरवा आहे म्हटलं तर त्यात कायद्याचे उल्लंघन झाले आणि देशात कोणताही गंभीर प्रश्न उरलेला नाहीये. मागील दोन-तीन दिवसांपासून टीव्ही सुरू केला की, मुंब्रा, हिरवा याशिवाय दुसरा मुद्दाच राहिलेला नाही. एकनाथ शिंदेंबद्दल मी जर बोललो तर त्यांनाही त्रास होईल. पण, मी त्यांना सांगू इच्छितो की भाजपा तुम्हाला कधी उचलून फेकणार आहे, याची वाट बघा", अशी टीका जलील यांनी शिंदेंवर केली.