शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
2
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
3
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
4
Stock Market Today: शेअर बाजाराचं फ्लॅट ओपनिंग, १११ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; फार्मा-रियल्टी शेअर्स आपटले
5
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
6
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
7
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
8
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
9
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
10
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
11
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
12
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
13
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
15
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
16
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
17
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
18
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
19
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
20
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा

पश्चिम विदर्भातील राजकारण नव्या वळणावर!

By admin | Updated: October 6, 2014 04:39 IST

पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा आणि वाशिम या तीनही जिल्ह्यांमधील राजकारण विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा नव्या वळणावर येऊन ठेपले आहे

पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा आणि वाशिम या तीनही जिल्ह्यांमधील राजकारण विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा नव्या वळणावर येऊन ठेपले आहे. साधारणत: १९९० पर्यंत हा भाग उर्वरित विदर्भाप्रमाणेच कॉंग्रेसचा बालेकिल्ला गणला जात असे. त्यामुळेच गुलाम नबी आझादसारख्या काश्मिरी नेत्याचा सुरक्षित मतदारसंघाचा शोध त्यांना वाशिमपर्यंत घेऊन आला होता. मंडल-कमंडल वादानंतर मात्र या भागातील चित्र एका झटक्यात बदलले आणि कॉंग्रेसचा गड असलेला हा भाग काही अपवाद वगळता, भगव्या युतीचा बालेकिल्ला बनला. सहा महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीपर्यंत हे चित्र कायम होते. त्या निवडणुकीत मतदारांनी भगव्या युतीला शतप्रतिशत कौल दिला आणि शिवसेनेचे दोन व भारतीय जनता पक्षाचा एक खासदार लोकसभेत धाडून, नरेंद्र मोदींच्या ‘मिशन २७२ +’ला हातभार लावला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भगवी युती आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीमध्ये झालेल्या फाटाफुटीमुळे मात्र मैदान सगळ्यांसाठी खुले झाले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या तारखेपर्यंत एका पक्षातून दुसऱ्या पक्षात मारल्या गेलेल्या उड्या, बंडखोरीला आलेले उधाण हे त्याचेच द्योतक आहे. या भागात विकासाच्या मुद्यावर निवडणुका कधी लढविल्याच गेल्या नाहीत. प्रत्येकच निवडणुकीत मांडली गेली ती निव्वळ धर्म, जाती आणि पोटजातीची अंकगणिते! स्वातंत्र्यापासून दुरंगी किंवा फारच फार तर तिरंगी लढतींचा साक्षीदार राहिलेल्या या भागात, प्रथमच पंचरंगी आणि काही मतदारसंघांमध्ये तर बहुरंगी लढती बघायला मिळत आहेत आणि त्यामुळे जाती-धर्माच्या राजकारणाला अक्षरश: ऊत आला आहे. या तीनही जिल्ह्यांमध्ये जेवढ्या समानता आहेत, तेवढेच भेदही आहेत. त्याचप्रमाणे राजकारणाचा बाजही वेगवेगळा आहे. अकोला जिल्ह्यात भगव्या युतीमध्ये भाजपाचे वर्चस्व होते, तर बुलडाणा व वाशिम जिल्ह्यात शिवसेनेचा वरचष्मा होता. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष अकोला जिल्ह्यात कधी रुजलाच नाही; पण बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये मात्र त्या पक्षाने जम बसविला होता. कॉंग्रेस पक्ष १९९० नंतर अकोला जिल्ह्यात पार ढेपाळला असला तरी, त्यामागे केवळ भगव्या युतीच्याच उदयाचा नव्हे, तर अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांच्या उदयाचाही हात आहे. आता भगवी युती फुटल्यामुळे गड परत मिळविण्याची जरी नव्हे, तरी स्पर्धेत येण्याची चांगली संधी कॉंग्रेसपुढे चालून आली आहे. या भागात राष्ट्रवादी काँग्रेस कधीच फार मजबूत नसल्यामुळे त्या पक्षासोबतच्या आघाडीत बिघाडी निर्माण झाल्याचा कॉंग्रेसला फार फरक पडण्याची अपेक्षा नाही. याउलट भाजपा व शिवसेना तुल्यबळ असल्यामुळे त्या दोन्ही पक्षांना युती फुटण्याचा जबर फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.जिल्हानिहाय विचार कराता अकोला पश्चिम व मूर्तिजापूर भाजपाच्या, अकोला पूर्व व बाळापूर आंबेडकरांच्या भारिप-बहुजन महासंघाच्या, तर आकोट मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात होता. येत्या निवडणुकीत भाजपा व भारिप-बमसं पाचही मतदारसंघांमध्ये स्पर्धेत आहेत. शिवसेना अकोला पश्चिम, अकोला पूर्व व आकोटमध्ये, काँग्रेस अकोला पश्चिम, आकोट व बाळापूरमध्ये, तर राष्ट्रवादी काँग्रेस अकोला पश्चिम व अकोला पूर्वमध्ये लढतीत आहे. जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघांमध्ये पंचरंगी लढती रंगणार असून, अकोला पूर्वमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माजी जिल्हाप्रमुखांनी अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उडी घेतल्याने बहुरंगी सामना रंगणार आहे. सहा प्रमुख उमेदवारांपैकी तिघे जवळचे नातेवाईक असल्याने या मतदारसंघाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सात मतदारसंघांपैकी बुलडाणा व मेहकर शिवसेनेच्या, चिखली व खामगाव कॉंग्रेसच्या, मलकापूर व जळगाव जामोद भाजपाच्या, तर सिंदखेडराजा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यात होता. यावेळी भाजपा आयातीत उमेदवाराच्या बळावर अनपेक्षितरीत्या बुलडाणा मतदारसंघात लढतीमध्ये आला असला तरी मलकापूर व जळगाव जामोदमध्ये त्या पक्षाच्या विद्यमान आमदारांपुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. जळगाव जामोदमध्ये भारिप-बमसंच्या उमेदवाराने, तर मलकापूरमध्ये कॉंग्रेस उमेदवाराने लढतीत रंगत आणली आहे. चिखलीमध्ये राष्ट्रवादी काँगे्रसने कॉंग्रेसमधून उमेदवार आयात केला असून, मराठा मतांचे ध्रुवीकरण आणि लिंगायत वाणी मतांच्या विभाजनामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादीला कौल मिळण्याची शक्यता बळावली आहे. याशिवाय राष्ट्रवादीला सिंदखेडराजामध्येही चांगली संधी आहे. अर्थात त्या मतदारसंघातील बडे प्रस्थ असलेले माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र शिंगणे यांच्यावरच त्या मतदारसंघाचे बरेचसे समीकरण अवलंबून आहे. मेहकरमध्ये शिवसेनेच्या विद्यमान आमदारांपुढे मोठे आव्हानच नाही, तर त्याच पक्षाच्या बुलडाण्यातील विद्यमान आमदाराला मात्र तिरंगी लढतीत परिश्रम घ्यावे लागत आहेत. भरीस भर म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारानेही स्पर्धेत रंगत निर्माण केली आहे. जिल्ह्यातील सर्वात लक्षणीय लढत असलेल्या खामगावमध्ये भाऊसाहेब फुंडकर स्वत: रिंगणात उतरले असते तर कॉंग्रेसच्या विद्यमान आमदारापुढे आव्हान उभे राहू शकले असते; मात्र त्यांनी पुत्राला पुढे केले आहे. त्यातच राष्ट्रवादीने भाजपाच्या माजी आमदारास रिंगणात उतरविले आहे. वाशिम जिल्ह्यातील तीन मतदारसंघांपैकी वाशिम भाजपाच्या, रिसोड कॉंग्रेसच्या, तर कारंजा राष्ट्रवादीच्या ताब्यात होता. वाशिमच्या विद्यमान आमदाराच्या विरोधातील रोषामुळे भाजपा यावेळी उमेदवार बदलेल, अशी दाट शक्यता व्यक्त केली जात होती; मात्र ऐनवेळी आमदारालाच पुन्हा रिंगणात उतरविण्याचा फटका त्या पक्षाला बसण्याची चिन्हे दिसत आहेत. भाजपाच्या उमेदवारीसाठी इच्छुक उमेदवाराला ऐनवेळी प्रवेश देऊन, राष्ट्रवादीनेही लढतीमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. सध्या तरी या मतदारसंघात कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेतच लढत होण्याची चिन्हे आहेत. रिसोडमध्ये कॉंग्रेसच्या विद्यमान आमदारापुढे भाजपाने जुनाच चेहरा रिंगणात आणला आहे, तर निवडणुकीच्या तोंडावर मनसेतून शिवसेनेत दाखल झालेल्या उमेदवारानेही लढतीत रंगत आणली आहे. कारंजामध्ये भाजपाने शिवसेनेतून आयात केलेल्या उमेदवाराच्या बळावर स्पर्धेत स्थान मिळविले आहे. त्या मतदारसंघात सध्या भाजपा व राष्ट्रवादीमध्ये लढत होण्याची चिन्हे दिसत असली तरी, संसाधनांमध्ये समृद्ध असलेल्या भरिप-बमसंच्या उमेदवारानेही स्पर्धेत रंगत आणली आहे. अर्थात राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्याने अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या विद्यमान आमदाराच्या दावेदारीकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. एकूण १५ विधानसभा मतदारसंघ असलेल्या पश्चिम विदर्भातील या तीन जिल्ह्यांमध्ये यावेळी कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट कौल मिळणार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळत असून, नवीन राजकीय समीकरणे उदयास येतील, असा अंदाज आहे.