मुंबई : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना काँग्रेसच्या कार्यकाळात ‘भारतरत्न’ सन्मान मिळाला असता तर अधिक आनंद झाला असता, अशा शब्दांत उत्तराखंडचे राज्यपाल डॉ. अझिझ कुरेशी यांनी या भावना व्यक्त केल्या.कुरेशी दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. राजभवनात गुरुवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. वाजपेयींना ‘भारतरत्न’ जाहीर झाल्याचा आनंद झाला. काँग्र्रेसचा कार्यकर्ता असल्यापासून आपण तशी मागणी करत होतो. वाजपेयींना ‘भारतरत्न’ दिल्याने या पुरस्काराचा सन्मान वाढला असल्याचे ते म्हणाले.वस्तुत: मोदी सरकारच्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये हा निर्णय व्हायला हवा होता, असेही ते म्हणाले. गेल्या वर्षी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला ‘भारतरत्न’ने सन्मानित केले गेले. यासंदर्भात कुरेशी म्हणाले, सचिनच्या आधी हॉकीपटू ध्यानचंद यांना हा सन्मान मिळायला हवा होता. ढगफुटीने वाताहत झालेल्या उत्तराखंडमध्ये पुनर्विकासाची कामे सुरू आहेत. मात्र केदारनाथला जुने वैभव प्राप्त करून देण्यास पाच वर्षे लागतील, असेही कुरेशी म्हणाले. धर्मांतर वाद अनावश्यकधर्मांतरावरून सुरू असणारा वादंग अनावश्यक आहे. भारतात फक्त गरीब व श्रीमंत हेच दोन धर्म आहेत. ही आर्थिक दरी भरून काढल्याशिवाय देशाची प्रगती होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
‘वाजपेयींना कॉँग्रेसच्या काळात सन्मान मिळायला हवा होता’
By admin | Updated: December 26, 2014 04:22 IST