पुणे : अग्निशामक दलाच्या मुख्य कार्यालयामध्ये बसविण्यात आलेल्या संविधानाच्या उद्देशिकेचे अनावरण मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. त्यानंतर ठाकरे यांनी महात्मा फुले वाडा आणि लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकांना भेट देऊन अभिवादन केले. या वेळी महापौर प्रशांत जगताप, उपमहापौर मुकारी अलगुडे, स्थानिक नगरसेविका सुशीला नेटके, गटनेते किशोर शिंदे, नगरसेवक बाबू वागस्कर, रवींद्र धंगेकर, नगरसेविका रुपाली पाटील, वनिता वागस्कर, अग्निशामक दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे उपस्थित होत्या. महापौर जगताप यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. अग्निशामक दलाच्या मुख्य कार्यालयामध्ये नगरसेविका सुशीला नेटके यांच्या निधीमधून संविधानाच्या उद्देशिकेची कोनशिला बसवण्यात आली आहे. या वेळी अग्निशामक दलाचे अधिकारी आणि जवान, तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज ठाकरे यांनी फुले पेठ भागात असलेल्या महात्मा फुले यांच्या स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले. तसेच फुले वाडा ठाकरे यांनी फिरून पाहिला. उद्घाटनाला येण्यापूर्वी लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकावरही जाऊन अभिवादन केले. राज ठाकरे कार्यक्रमाला येण्यापूर्वीच मोठ्या संख्येने नागरिक आलेले होते. अनेकांना त्यांच्या भाषणाची उत्सुकता होती. महापौरांनी मनोगत व्यक्त केल्यानंतर ठाकरे बोलायला उभे राहतील, असे वाटत असतानाच त्यांनी कार्यक्रम संपवून निघणे पसंत केले. त्यामुळे कार्यकर्ते आणि नागरिकांचा हिरमोड झाला. (प्रतिनिधी)
संविधान उद्देशिकेच्या कोनशिलेचे अनावरण
By admin | Updated: August 15, 2016 01:07 IST