काऱ्हाटी : पावसाने पाठ फिरविल्यााने बारामती तालुक्याच्या जिरायती भागात पाणीटंचाई तीव्र बनली आहे. पाण्याअभावी आता जिवापाड सांभाळ केलेल्या जनावरांना विकण्याची वेळ आली आहे. आता तरी ‘जनाई शिरसाई’ व ‘पुरंदर उपसा’ योजनेतून पाझर तलाव भरण्याची मागणी शेतकरीवर्गातून होत आहे. पावसाळ्यातील दोन महिने उलटले आहेत. हा पाऊस सर्वत्र पडत आहे. मात्र, बारामती तालुक्याच्या जिरायती भागात पावसाने दडी मारल्याने येथील शेतकऱ्यांचे आर्थिक गणित चुकले आहे. पाऊस नसल्याने जनावरांची चारापिके करता आली नाहीत. विहिरींना पाणी नाही, त्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. जिवापाड संभाळलेल्या जनावरांना विकण्याची वेळ आली आहे. मात्र, बाजारात मातीमोल किमतीने जनावरांना किंमत येत आहे. त्यामुळे शेतकरी कमालीचा चिंतातूर बनला आहे. तालुक्यातील देऊळगाव रसाळ, जळगाव सुपे, जळगाव कडेपठार, माळवाडी, फोंडवाडा, काऱ्हाटी आदी भागात मोठा पाऊसच झाला नाही. सलग चार वर्षांपासून हा परिसर दुष्काळाने होरपळला आहे. यंदादेखील पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे, असे येथील ललित वाबळे यांनी सांगितले. (वार्ताहर)>दखल घेतली जात नाही...पावसाळ्यातच पाझर तलाव भरण्याची गरज आहे. त्यातून कमी पडणाऱ्या पावसाच्या जोरावर शेतकरी शेतात पिके घेऊन विहिरींच्या वाढलेल्या पाण्याच्या जोरावर पिके वाचवू शकेल. मात्र, शासन दरबारी मागणी करूनदेखील दखल घेतली जात नाही. त्यामुळे पाण्यासाठी कोणाकडे जायचे, अशी खंत विजय वाबळे व्यक्त केली.
शेतकऱ्यांवर जनावरे विकण्याची वेळ
By admin | Updated: August 2, 2016 01:40 IST