सार्वजनिक उत्सवाची बीजे इथे रुजली !राज्यभरात परंपरेची चळवळ फोफावली !!१८८५ साली शुक्रवार पेठेतील काही मंडळी एकत्र येऊन आजोबा गणपतीची सार्वजनिक स्वरूपात प्रतिष्ठापना केली. त्यानंतर एक-दोन वर्षांनी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने लोकमान्य टिळक सोलापुरात आले. आप्पासाहेब वारदांच्या घरी त्यांचा मुक्काम होता. दुसऱ्या दिवशी ते वारदांबरोबर श्रद्धानंद समाजाच्या आजोबा गणपती मंडळाच्या पानसुपारीस गेले. एकत्र आलेल्या लोकांचा हा गणेशोत्सव पाहून त्यांना सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रेरणा मिळाली आणि पुढे १८९३ सालापासून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. भक्ती व उत्साह यांचा संगम असलेला उत्सव म्हणजे गणेशोत्सव. गणेशोत्सवात बाळगोपाळांपासून ते आबालवृद्ध सामील होताना त्यांच्या एकीचे दर्शन घडते. हीच एकी राष्ट्रीय एकात्मतेला बळ मिळवून देते. सर्व समाजाला एकत्र आणून राष्ट्रीय एकात्मता बळकट करण्याचे एक स्वप्न लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे होते. सोलापुरातील आजोबा गणपतीचा उत्सव पाहिल्यानंतर त्यांनी संपूर्ण राज्यात सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून स्वप्नाला मूर्त स्वरूप देण्याचे निश्चित केले. १८९३ साली त्यांनी पहिल्यांदा सार्वजनिक गणेशोत्सवाचा श्रीगणेशा केला. आजवर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यासह देशभरातील मान्यवरांनी आजोबा गणपतीचे दर्शन घेतले आहे. -----इकोफ्रेंडलीची संकल्पना जुनीच१८८५ सालची गणेशाची मूर्ती जुनी झाली. त्यानंतर १८९३ साली केरळच्या कलाकाराकडून तणस, गूळ, गवत, शाडू, डिंक या साहित्यांचा वापर करून शास्त्रशुद्ध पद्धतीने मूर्ती बनवण्यात आली. इकोफ्रेंडली गणेशोत्सवाचा आजपर्यंत अवलंब करण्याचा आदर्श सार्वजनिक आजोबा गणपती ट्रस्टने इतर गणेशोत्सव मंडळांसमोर ठेवला होता. (लेखक हे लोकमत सोलापूर आवृत्तीचे उपसंपादक आहेत.)
टिळकांना सोलापुरात गणेशोत्सवाची मिळाली प्रेरणा
By admin | Updated: September 27, 2015 06:00 IST