अंबाझरी वॉटर पार्कही लवकरच : वाठोडा स्पोर्ट कॉम्प्लेक्सलाही गती नागपूर : महापालिकेच्या रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्यासाठी आता सत्ताधारी सरसावले आहेत. ‘आॅरेंज सिटी स्ट्रीट’, अंबाझरी वॉटर पार्क व वाठोडा स्पोर्ट कॉम्प्लेक्स या तीन मोठ्या प्रकल्पांसाठी येत्या १५ दिवसांत निविदा जारी केल्या जातील, असे स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी स्पष्ट केले आहे. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी गेल्या पाच वर्षांत मोठमोठ्या घोषणा केल्या. प्रत्यक्षात बहुतांश प्रकल्प अर्धवट असून, काही प्रकल्पांना तर सुरुवातच झालेली नाही. लोकमतने ‘नो उल्लू बनाविंग’ या मथळ्याखाली विशेष पान प्रकाशित करीत, या प्रलंबित विषयांकडे सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधले. महापालिकेच्या सभेत विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांनी ‘लोकमत’ झळकावीत सत्ताधाऱ्यांना यावर जाब विचारला. विरोधकांनी सभागृहात कोंडी केल्यामुळे सत्ताधाऱ्यांना सभा १५ मिनिटात गुंडाळावी लागली. या सर्व घटनाक्रमानंतर आता सत्ताधाऱ्यांनी रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कंबर कसली आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, आॅरेंज सिटी स्ट्रीट हा ३२०० कोटींचा प्रकल्प आहे. पीपीपीवर उभारला जाणार आहे. हॉटेल, हॉस्पिटल, क्लब हाऊस, क्रीडा संकुल यासह निवासी संकुलांचा यात समावेश असेल. निविदा काढण्याची तयारी सुरू आहे. १५ दिवसांत निविदा निघतील. वाठोडा येथे प्रस्तावित स्पोर्ट कॉम्प्लेक्ससाठीही १५ दिवसांत निविदा जारी होतील. येथे नाममात्र शुल्कांत नागरिकांसाठी क्रीडाविषयक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. क्लब हाऊस, रेस्टॉरंटचाही समावेश राहील. अंबाझरी उद्यानात वॉटर पार्क उभारण्याची योजना आहे. हा २० कोटींचा प्रकल्प आहे. येथे वॉटर स्पोर्ट, क्लब हाऊस, फूड प्लाझा उभारले जाईल. या कामासाठीही १५ दिवसांत निविदा जारी होतील, असे बोरकर यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)सुरेश भट सभागृहही पूर्ण करणारसुरेश भट सभागृह हा ४ कोटींचा प्रकल्प आहे. प्रत्यक्षात फक्त १३ कोटींचे काम झाले आहे. पीएमसीने तयार केलेल्या आराखड्यानुसार कंत्राटदार काम करीत नव्हते. आता दोघांमधील वाद संपला आहे. व्हीएनआयटीच्या सहकार्याने सभागृहाच्या लोड बेअरिंग टेस्टिंगचे काम सुरू झाले. संबंधित बांधकाम पूर्ण होण्यास दोन ते अडीच महिने लागतील. त्यानंतर लगेच इलेक्ट्रिक व इंटेरियरसाठी निविदा काढल्या जातील, असेही बोरकर यांनी स्पष्ट केले.
‘आॅरेंज सिटी स्ट्रीट’साठी १५ दिवसांत निविदा
By admin | Updated: July 18, 2014 01:12 IST