फुलंब्री (जि. औरंगाबाद) : पिंपळगाव गांगदेव येथील मच्छिंद्र झाल्टे (४०) या शेतकऱ्याने सिंचन विहिरीचे पैसे मिळत नसल्याने कर्जबाजारीपणातून विष प्राशन करून गुरुवारी आत्महत्या केली.झाल्टे यांच्या नावे एक हेक्टर १५ आर. जमीन आहे. आपल्या कुटुंबासह गट नं. २७१ मधील शेतात ते राहायचे. २०१४ मध्ये सिंचन विहिरीला प्रशासकीय मंजुरी मिळाली. २०१५ मध्ये वर्कआॅर्डर देण्यात आली. विहिरीचे काम पूर्ण केले. या दरम्यान तीन वेळा पैसेही मिळाले, पण शेवटचा हप्ता मिळाला नाही. त्यांनी ३० हजार रुपये उसनवारी करून विहिरीचे काम पूर्ण केले. उर्वरित रक्कम मिळत नसल्याने ७ आॅक्टोबरला त्यांनी विषारी औषध प्राशन केले. घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना गुरुवारी त्यांचा मृत्यृ झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, आई, वडील असा परिवार आहे. त्यांच्यावर स्टेट बँक आॅफ हैदराबादचे ४० हजार, वडील कान्हू झाल्टे यांच्यावर एक लाख, आई कडूबाई यांच्यावर ४० हजार, पत्नी सविता यांच्यावर ४० हजार असे दोन लाख २० हजारांचे कर्ज असल्याचे तहसील कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले. (वार्ताहर)
सिंचन विहिरीचे पैसे न मिळाल्याने आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2016 03:28 IST