भ्रष्टाचार : हायकोर्टाचे विभागीय कारवाईचे निर्देशनागपूर : अवघ्या १.३ किलोमीटर रोडच्या दुरुस्तीवर २६ लाख २६ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. एवढा अवाढव्य खर्च केल्यानंतरही केवळ सहा महिन्यांत रोडची दुरवस्था झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल हे प्रकरण चर्चेचा विषय ठरले आहे.अकोला शहरापासून जवळच असलेल्या कानेरी-एरंडा या १३ किलोमीटर रोडपैकी १.३ किलोमीटर रोडची २६ लाख २६ हजार रुपये खर्चून दुरुस्ती करण्यात आली आहे. हा रोड आज पायदळ चालण्यायोग्यही राहिलेला नाही. यामुळे प्रकाश सारप व इतर नागरिकांनी जनहित याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात अकोला जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता व्ही.एल. कुंभारे हे न्यायालयाला खोटी माहिती दिल्यामुळे अडचणीत आले आहेत. २६ नोव्हेंबर रोजी त्यांनी या रोडची अवस्था साधारण चांगली असल्याचे सांगून रोड एकदम खराब असल्याचा आरोप फेटाळला होता. यामुळे न्यायालयाने अकोला येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विजय भाले यांना रोडचे निरीक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार भाले यांनी १.३ किलोमीटरपैकी ०.४ किलोमीटर रोड सोडून इतर रोड खराब असल्याची माहिती दिली. परिणामी कुंभारे यांचा खोटेपणा उघड झाला.न्यायालयाने कुंभारे यांना कारणे दाखवा नोटीस बजावून न्यायालय अवमाननेची कारवाई का करण्यात येऊ नये अशी विचारणा केली आहे. तसेच यावर १४ जानेवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. यादरम्यान अमरावती सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंत्यांनी कुंभारे व कंत्राटदाराविरुद्ध विभागीय कारवाई करावी असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. पुढच्या तारखेला प्रतिज्ञापत्र सादर करून दोघांविरुद्ध काय कारवाई केली याची माहिती देण्याची सूचना करण्यात आली आहे. रोडच्या कामात २६ लाख रुपये योग्य पद्धतीने खर्च झाले नाहीत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. (प्रतिनिधी)
१.३ किलोमीटर रस्ते दुरुस्तीवर २६ लाख खर्च
By admin | Updated: December 21, 2014 00:16 IST