मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात संततधार सुरु असलेल्या पावसाने मंगळवारी चांगलाच जोर पकडला. त्यामुळे पावसाच्या वेगासमोर लोकलचा वेग मंदावला. या पावसाने हार्बर सेवेला दिवसभर दणका दिल्याने हार्बरवासियांचे मात्र हाल झाले. मंगळवारी शहरात तर कधी उपनगरात पावसाचा जोर होता. मात्र दुपारनंतर पावसाने जोर पकडण्यास सुरुवात केली आणि त्याचा पहिला फटका लोकल सेवेला बसला. मशीद आणि सॅन्डहर्स्ट रोड तसेच विद्याविहार स्थानकाजवळ रुळावर पाणी साचल्याने मध्य रेल्वे मार्गावरील मेन लाईन आणि हार्बर मार्गावरील लोकल दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावू लागल्या. पावसामुळे हळूहळू मेन लाईन आणि हार्बर रेल्वेचा बोऱ्या वाजण्यास सुरुवात झाली. संध्याकाळी साडेपाच ते सहा वाजेपर्यंत हार्बरच्या दोन आणि मेन लाईनच्या पाच ट्रेन रद्द करण्यात आल्या. रात्री सातनंतर लोकल तब्बल वीस ते पंचवीस मिनिटे उशिराने धावू लागल्याने लोकलचे वेळापत्रक पूर्णत: बिघडण्यास सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत मध्य रेल्वेवरील १४ लोकल रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यामध्ये हार्बरच्या सहा लोकल होत्या.पश्चिम रेल्वे मार्गावर कुठल्याही स्थानकावर पाणी जरी तुंबले नसले तरी पावसाच्या वेगामुळे लोकलचा वेग मंदावला. बोरीवलीला जाणारी एक धीमी लोकल संध्याकाळी महालक्ष्मी स्थानकात आठ मिनिटे थांबली. या लोकलच्या ब्रेकमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानेची ही घटना घडल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
पावसाच्या माऱ्याने लोकलचा वेग मंदावला
By admin | Updated: July 16, 2014 03:20 IST