लोणावळा : परिसरातील भुशी धरण, लायन्स पॉइंट, टायगर पॉइंट, गिधाड तलाव, धबधबा ही सर्वच पर्यटनस्थळे रविवारी पर्यटकांनी गजबजली होती. सकाळपासूनच मुंबईकर व पुणेकरांनी लोणावळ्यात गर्दी करण्यास सुरुवात केली होती. पोलिसांनीही पर्यटकांना सहकार्य करत धरणाकडे जाणारा रस्ता खुला ठेवल्याने पर्यटकांनी आनंद व्यक्त केला. चांगला व्यवसाय झाल्याने व्यावसायिकही समाधानी होते.सलग सुटीमुळे शनिवार, रविवार व सोमवारी लोणावळ्यात तुफान गर्दी होण्याची शक्यता होती. पोलीस कारवाईची भीती व द्रुतगती मार्गावर झालेली वाहतूककोंडी यामुळे पर्यटकांनी लोणावळ्याकडे पाठ फिरवल्याने शनिवार हा पर्यटकांअभावी कोरडा गेला होता. मात्र रविवारी सकाळपासून लोणावळ्यात पर्यटकांची चांगली गर्दी असून, राष्ट्रीय महामार्ग व तसेच भुशी धरणाकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूककोंडी झाली होती. सहारा पूल धबधबा व भुशी धरणावर पर्यटकांनी मनमुरादपणे भिजण्याचा आनंद लुटला. लायन्स पॉइंट, टायगर पॉइंट परिसरात सकाळपासून मोठ्या प्रमाणात धुके असल्याने १०-१५ फुटांवरचे देखील नीटसे दिसत नव्हते. भुशी डॅमच्या रस्त्यावर देखील पर्यटकांना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत होते. लायन्स पॉइंटवर सुरक्षेचे वाभाडे काढत सेल्फीलायन्स पॉइंट, टायगर पॉइंट हा परिसर उंच टेकडीवर असून खाली खोल दरी आहे. या दरीच्या तोंडाला सुरक्षेकरिता रेलिंग लावण्यात आलेले असताना पर्यटक धोकादायकरीत्या दरीच्या तोंडाजवळ जाऊन जोखीम पत्करत सेल्फी, तसेच फोटो काढत होते. परिसरात दिवसभर धुके व हवा जोरात होती. पॉइंटवर कोठेही पोलीस दिसत नसल्याने पर्यटक बिनधास्तपणे सेल्फी काढताना दिसत होते.(वार्ताहर)>पर्यटकांना सुविधांची वानवालायन्स पॉइंटवर पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात कर गोळा केला जातो. मात्र, येथे पर्यटकांना कसलीही सुविधा दिली जात नसल्याने परिसराला बकाल स्वरूप आले आहे. सर्वत्र दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पडला आहे. पॉइंटच्या प्रवेशद्वारावर मोठे खड्डे पडले आहेत. या ठिकाणी पर्यटकांसाठी साधे प्रसाधनगृहदेखील नसल्याने पर्यटकांची विशेषत: महिलांची मोठी कुचंबणा होत आहे. असुविधांकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. >सलग दुसऱ्या दिवशी द्रुतगतीवर वाहतूककोंडीलोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर रविवारी पुन्हा वाहनांची संख्या वाढल्याने बोरघाटात अमृतांजन पूल ते आडोशी बोगदा दरम्यान वाहतूककोंडी झाली. त्यातच सकाळी साडेआठच्या सुमारास खंडाळा बोगद्याजवळील बॅटरी हिलच्या चढणीवर दोन अवजड वाहने बंद पडल्याने वाहतूककोंडीत भर पडली होती. खंडाळा महामार्ग पोलीस व आयआरबी कर्मचाऱ्यांनी तातडीने ही वाहने बाजूला करत वाहतूक खुली केली. मात्र, आडोशी बोगदा ते अमृतांजन भागात वाहनांची संख्या वाढल्याने झालेल्या वाहतूककोंडीमुळे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात कोंडी कायम होती. सलग सुटीमुळे शनिवारपासून खंडाळा बोरघाटात वाहतूककोंडी आहे. मुंबई-पुणे हा प्रवास जलदगतीने व्हावा याकरिता निर्माण केलेला द्रुतगती मार्ग वाहनांची संख्या वाढल्याने कासवगती होऊ लागला आहे. >संयुक्त वन समितीकडून पर्यटकांची लूटलायन्स पॉइंटवर येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांकडून वाहनतळासाठी हातवण संयुक्त वन व्यवस्थापन समितीकडून कर गोळा केला जातो व पावती दिली जाते. हा जमा होणारा निधी सदर पर्यटनस्थळाच्या, तसेच गावाच्या विकासासाठी वापरावा असे निर्देश आहेत. लायन्स पॉइंटवर कर गोळा केला जातो, मात्र पावती दिली जात नसल्याचे उघडउघड दिसत होते. >खुलेआम हुक्क्यांचा धूर लायन्स पॉइंट परिसरात रात्रीच्या वेळी हुक्का, चरस, गांजा यांच्या पार्ट्या होत असल्याने बदनाम झाला असताना रविवारी दिवसाढवळ्या खुलेआम पर्यटक हुक्क्याचा धूर काढत होते. आठ दिवसांपूर्वी भुशी धरणावरील हुक्का पार्लरवर लोणावळा पोलिसांनी कारवाई केली होती. तरीही हुक्केबाज धूर काढताना दिसत होते. अनेक पर्यटकांनी याबाबत तक्रार करून देखील पोलिसांकडून दखल घेतली जात नसल्याने पर्यटकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. नशेत असलेल्या तरुणांकडून छेडछाडीचे प्रकार घडत आहेत.
सुट्यांमुळे तोबा गर्दी
By admin | Updated: August 15, 2016 01:28 IST