'सपकाळ यांनी पक्ष भाजपाला विकला', भिवंडीतील काँग्रेस नेत्याचा आरोप, थेट राहुल गांधींकडे तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 10:54 IST2026-02-20T10:39:42+5:302026-02-20T10:54:04+5:30
Bhiwandi Nizampur Municipal Corporation Mayor Election: नारायण चौधरी यांच्या भाजपाचा एक गट काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सेक्युलर फ्रंटमध्ये सहभागी झाल्याने तसेच काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्वाने महापौरपदासाठी त्यांनाच पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र या घडामोडींना भिवंडीतील स्थानिक नेत्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

'सपकाळ यांनी पक्ष भाजपाला विकला', भिवंडीतील काँग्रेस नेत्याचा आरोप, थेट राहुल गांधींकडे तक्रार
महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागून महिना उलटत आला तरी मुंबईजवळच्या भिवंडी महानगरपालिकेमधील सत्तास्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्रिशंकू निकाल लागलेला असल्याने आणि फोडाफोडीच्या राजकारणाला उत आल्याने भिवंडीमध्ये महापौरपदी कोण विराजमान होईल, याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यातच नारायण चौधरी यांच्या भाजपाचा एक गट काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सेक्युलर फ्रंटमध्ये सहभागी झाल्याने तसेच काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्वाने महापौरपदासाठी त्यांनाच पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र या घडामोडींना भिवंडीतील स्थानिक नेत्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तसेच काँग्रेसचे भिवंडी शहराध्यक्ष रशिद ताहिर मोमीन यांनी यावरून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हर्षवर्धन सपकाळ यांना सपाच्या आमदाराला हाताशी धरून काँग्रेस पक्ष भाजपाला विकला, असा आरोप मोमीन यांनी केला आहे.
भिवंडी महानगरपालिकेच्या निवडणुकीत कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळू शकलं नव्हतं. येथे काँग्रेस हा ३० जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र पक्षाला स्पष्ट बहुमत मिळू शकले नव्हते. त्यामुळे काँग्रेसने भिवंडीमध्ये इतर समविचारी पक्षांना घेऊन आघाडी करण्याची तयारी सुरू केली होती. त्यामधून सेक्युलर फ्रंट असा गट स्थाप झाला. उल्लेखनीय बाब म्हणजे भाजपातील ९ नगरसेवकांच्या एका गटानेही काँग्रेससोबत सेक्युलर फ्रंटला पाठिंबा दिला, तसेच काँग्रेसने या गटातील नेते नारायण चौधरी यांना महापौरपदासाठी उमेदवारी दिली. या माध्यमातून काँग्रेसने चंद्रपूरचा वचपा भिवंडीत काढल्याचे बोलले जात आहे.
मात्र काँग्रेसच्या राज्यस्तरावरील नेतृत्वाकडून घेण्यात आलेला हा निर्णय पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाच्या पचनी पडलेला नाही. पक्षाचे शहराध्यक्ष रशिद ताहिर मोमीन यांनी या निर्णयावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणले की, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून भिवंडीमधील परिस्थितीची थेटपणे हाताळणी केली जात आहे. समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांना हाताशी धरून आदेश देत आहेत, व्हीप काढत आहेत. जिल्हाध्यक्षांना कल्पना न देता न कळवता हे काम सुरू आहे. त्यामुळे भिवंडीमधील आमची पूर्ण कार्यकारिणी आणि कार्यकर्ते नाराज आहेत, असे मोमीन म्हणाले.
यावेळी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी काँग्रेस पक्ष हा सपा आमदाराच्या मदतीने भाजपाला विकल्याचाही गंभीर आरोप केला. हा सर्व भाजपाचा डाव असून, त्यात आमचे लोक सहभागी आहेत, असा दावाही मोमीन यांनी केला.