मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे हे सोमवारी मंत्रिपदाचा राजीनामा देणार असले तरी ते भाजपात जातील, अशी कोणतीही शक्यता नसल्याचे राजकीय सूत्रांचे म्हणणे आहे. काँग्रेसमध्ये राहूनच ते दबाव वाढवतील, असे मानले जात आहे. राणे यांना भाजपात घेण्याचा प्रश्नच नाही, तसा विषयदेखील नाही, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानेही राणे यांना भाजपात घेण्याबाबत कुठलाही विचार केला जाणार नाही, असे राज्य नेतृत्वाला कळविले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राणे यांना भाजपात घेण्यास मित्र पक्ष शिवसेनेचा प्रचंड विरोध आहे. इतका की त्यांना भाजपाने जवळ केले तर शिवसेनेला युती कायम ठेवायची की नाही याचा विचार करावा लागेल, असे सूचक उद्गार शिवसेनेच्या एका नेत्याने आज लोकमतशी बोलताना काढले. एवढे असूनही राणे समजा उद्या भाजपामध्ये गेलेच तर भाजपा स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट होईल. दुसरीकडे राणे यांना भाजपात घेण्यास कोकणातील भाजपाचे नेते विनोद तावडे यांचाही प्रखर विरोध आहे.मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने आपल्या जिल्'ात व मतदारसंघामध्ये राणे यांच्याबद्दल सहानुभूती राहील आणि त्याचा फायदा त्यांना कोकणात व स्वत:च्या निवडणुकीत होईल, हेही राजीनाम्यामागील एक कारण असल्याचे मानले जाते. सद्यस्थितीत नवा राजकीय पक्ष स्थापन करणे राणे यांना राजकीयदृष्ट्या परवडेल, असे दिसत नाही. राणे यांनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये जाताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केली होती, ही बाब लपून राहिलेली नव्हती. आत्ताच्या राजकीय वळणावर ते पवारांशी चर्चा करतील का, जर पवार यांनी त्यांना राष्ट्रवादीमध्ये येण्याचे आमंत्रण दिले तर राणेंचा प्रतिसाद काय असेल, हे सोमवारनंतरच कळेल. (विशेष प्रतिनिधी)
भाजपाकडून राणेंना ‘नो एन्ट्री!’
By admin | Updated: July 18, 2014 02:29 IST