ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २२ - लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या दारुण पराभवासाठी राहुल गांधींचे सल्लागार जबाबदार असल्याचा आरोप मुंबईतील काँग्रेसचे नेते व माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी केला आहे. या पराभवासाठी राहुल गांधींना एकटे जबाबदार ठरवणे उचीत ठरणार नाही असे सांगत देवरांनी राहुल गांधींची पाठराखण केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईतील काँग्रेसचे पराभूत उमेदवार मिलिंद देवरा यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखात दिली आहे. 'काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या सल्लागारांमुळेच काँग्रेसचा पराभव झाला. या सल्लागारांना निवडणुकीचा फारसा अनुभवही नव्हता. तळागाळातील कार्यकर्ते व नेत्यांच्या आवाजाकडे या सल्लागारांनी दुर्लक्ष केले असा आरोप देवरा यांनी केला आहे. मात्र या मुलाखातीत देवरा यांनी काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याचे नाव घेणे टाळले आहे.
काँग्रेसच्या पराभवासाठी असंख्य गोष्टी कारणीभूत असून एकट्या राहुल गांधींना जबाबदार ठरवता येणार नाही. राहुल गांधींच्या सल्लागारांनीही याची जबाबदारी स्वीकारायला हवी असे देवरा यांनी स्पष्ट केले. पक्ष व सरकारमध्ये समन्वयाचा अभाव, पक्षातील विसंवाद या गोष्टीही पराभवासाठी कारणीभूत आहेत असे त्यांनी म्हटले आहे.