देहूरोड : देहूरोड कॅन्टोन्मेंट शाळांमध्ये एकीकडे ई-लर्निंगसारखे विविध प्रयोग, तसेच विद्यार्थ्यांची गळती थांबविण्यासाठी विविध संकल्पना राबवून दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शाळांचा विकास आराखडा बनवून एक वर्ष होत आहे. मात्र, असताना दुसरीकडे सामान्य कुटुंबातील विद्यार्थी शिकत असलेल्या विविध शाळांची दुरुस्ती व देखभालीअभावी दुरवस्था झालेली दिसून आहे. दहा दिवसांपूर्वी देहूरोड बाजारपेठेतील महात्मा गांधी प्राथमिक शाळेच्या मागील बाजूची एक भिंत कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर बोर्डाच्या शेलारवाडी, मामुर्डी,देहूरोड, झेंडेमळा आदी प्रभागांतील शाळांची पाहणी केली असता, शाळांच्या इमारतींसह वर्गखोल्या मोडकळीस आल्याने विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शिक्षण घ्यावे लागत आहे. फुटलेले पत्रे, गळके छप्पर असलेले वर्ग, पावसाचे पाणी मुरून ओल्या, फुगलेल्या, भेगा पडलेल्या भिंती, संरक्षक भिंतीचा अभाव, फुटलेल्या फरशा, पिण्याच्या पाण्याची गैरसोय, स्वच्छतागृहांत पाण्याचा अभाव व शाळेपुढे झालेला चिखल, अशा विविध समस्यांच्या गर्तेत विद्यार्थी आणि शिक्षक अडकले आहेत.उर्दू व हिंदी प्राथमिक शाळा प्राथमिक शाळांची पाहणी केली असता, बाजारपेठेतील महात्मा गांधी हिंदी व डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळेच्या इमारतीची मागील बाजूची एक भिंत कोसळली. या वर्गाच्या शेजारील वर्गखोलीच्या भिंतीत पावसाचे पाणी येत आहे. भिंतीला तडेही गेले असल्याने बोर्डाने या वर्गखोलीत प्रवेश करण्यास मनाई असल्याचा फलक लावला आहे. मात्र, या शाळेचे बांधकाम खूप जुने झाले असून, शाळा इमारतीच्या बहुतांश भिंतींत पावसाचे पाणी येत आहे. त्यामुळे अगोदरच अतिशय जीर्ण भिंती कधीही कोसळण्याची शक्यता आहे. या इमारतीच्या बाहेरील बाजूने असलेल्या अनेक खिडक्यांवरील सिमेंट स्लॅब कोसळले आहेत. असे स्लॅब अनेक ठिकाणी पडण्याच्या स्थितीत आहेत. काही वर्गांच्या छताचे पत्रे फुटले आहेत. अनेक वर्ग गळत आहेत. विविध ठिकाणी लाकडी वासे जीर्ण झाले आहेत. शाळेच्या भिंतीलगत भाजी मंडईचे वाहनतळ, तसेच हातगाड्या उभ्या राहत असल्याने विद्यार्थी त्रस्त आहेत. शाळेच्या प्रांगणात पाणी साचून चिखल झाला असून, विद्यार्थ्यांना त्यातूनच वाट काढून वर्गात ये-जा करावी लागत आहे.महात्मा गांधी विद्यालयएमबी कॅम्प येथील महात्मा गाधी विद्यालय व इंग्रजी माध्यम शाळा इमारत पावसाचे पाण्याने विविध भागांत डागाळली असल्याचे दिसून येत आहे. स्लॅबवर टाकलेले पत्रे व्यवस्थित न बसविल्याने पाणी काही ठिकाणी भिंतीत झिरपत आहे. आवारात पावसाचे पाणी साचून चिखल झाला आहे. सीमाभिंत नसल्याने नागरिकांची शाळेसमोरून वर्दळ असते. किन्हई येथील साने गुरुजी प्राथमिक शाळेच्या इमारतीची दुरुस्ती करण्याची गरज असून, भिंतीत येणारे पाणी, खिडक्यांची तावदाने दुरुस्त करण्याची गरज आहे. चिंचोली व एमबी कॅम्प, देहूरोड येथील शाळा इमारती वगळता इतर इमारती खूपच जुन्या झालेल्या असून, मोडकळीस आल्या आहेत. (वार्ताहर) >स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळा, शेलारवाडीशेलारवाडी येथील स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळेच्या इमारतीची दुरवस्था झालेली असून, धोकादायक बनलेल्या इमारतीत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेच्या आवारातील दुसऱ्या एका इमारतीत बालवाडी व अंगणवाडीचे दोन वर्ग भरविले जात असून, या इमारतीच्या स्लॅबमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. वर्गात पाणी साचलेले दिसून आले. येथील स्लॅबला मोठ्या प्रमाणात ओलावा आलेला दिसत आहे. त्यामुळे इमारतीला धोका होण्याची शक्यता आहे. शाळेच्या दुसऱ्या जुन्या इमारतीचीही दुरवस्था झाली असून, फुटलेले सिमेंट पत्रे गेल्या वर्षभरात बदललेले नसल्याने पाऊस सुरू असताना सर्वत्र मोठी गैरसोय होत आहे. भिंतीत पावसाचे पाणी येत असल्याने भिंती ओल्या झाल्या आहेत. शाळेच्या किरकोळ दुरुस्ती-देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.>कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक शाळा, चिंचोली चिंचोली येथील कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक शाळेची इमारत फारशी जुनी नसल्याने मोठ्या समस्या नसल्या, तरी येथील शाळेच्या सभागृहाच्या इमारतींच्या भिंतीना तडे गेले आहेत. गेल्या काही वर्षांत रंगरंगोटी झालेली नाही. स्लॅबला तडे गेले आहेत. मुख्य इमारतीच्या स्लॅबमधून पावसाचे पाणी गळत आहे. इमारत बांधकाम केल्यापासून उत्तरेकडील भिंतीला सिमेंट गिलावाच केलेला दिसत नाही. त्याच भिंतींच्या पायातील दगडांमधील सिमेंट निघाले असून, तो भाग पोखरल्यासारखा दिसत आहे. तीन वर्गांच्या समोरील व्हरांडा खचलेला दिसत असून, त्यामुळे फरशा फुटल्या आहेत. ‘पुढे शाळा आहे’ हा मार्गदर्शक फलक रस्त्यालगत लावणे गरजेचे असताना शाळेच्या सीमाभिंतीजवळ पडलेला दिसून आला. शाळेत पाणीपुरवठ्यासाठी नळ असताना त्याला अनेकदा पाणीच येत नाही.
गरिबांच्या शाळा इमारतींची झाली दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2016 01:30 IST