मुंबई : तक्रार करण्यासाठी आईसोबत आलेल्या एका अल्पवयीन मुलीने चक्क पोलीस ठाण्यातच महिला पोलीस अधिकार्याच्या कानशिलात लगावल्याची घटना सोमवारी रात्री कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात घडली. पोलिसांनी या प्रकरणी मुलीवर गुन्हा दाखल करून तिला अटक केली. बोरिवली येथील मागाठणे परिसरात ही १७ वर्षीय आरोपी मुलगी तिच्या कुटुंबीयांसोबत राहते. सोमवारी सकाळी तिच्या आईचे शेजार्यांसोबत भांडण झाल्याने शेजार्यांनी तिच्या आईविरोधात कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सायंकाळी पुन्हा तिच्या आईसोबत शेजार्यांचे भांडण झाल्याने तिच्या आईनेही कस्तुरबा पोलीस ठाणे गाठून शेजार्यांविरोधात तक्रार दाखल केली. या वेळी पोलीस ठाण्यात कविता सोनावणे या पोलीस उपनिरीक्षक ड्युटीवर होत्या. जबाब सुरू असताना मुलगी उद्धटपणे बोलत असल्याने सोनावणे यांनी तिला बाहेर जाण्यास सांगितले. मात्र, तिने बाहेर जाण्यास नकार दिला. सोनावणे यांनी तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. या वेळी या तरुणीने हात झटकून सोनावणे यांच्या कानशिलात मारली. या मुलीवर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस ठाण्यातच महिला पोलिसाला मारहाण
By admin | Updated: May 22, 2014 05:08 IST