मुंबई : तुम्ही पिझ्झा आॅर्डर केला आहे का..? हा पिझ्झा अवघ्या पाच ते दहा मिनिटांतच तुमच्या दारी आला तर..? अचंबित होऊ नका. वाहतूककोंडीत पिझ्झाची दिलेली आॅर्डर अडकून बसू नये, म्हणून यातून सुटका करण्यासाठी ड्रोनद्वारे पिझ्झा करण्याची शक्कल लढवण्यात आली आहे. ड्रोनद्वारे पिझ्झा घरपोच पोहोचवण्याचा पहिला चाचणी प्रयोग मुंबईत करण्यात आला. हा प्रयोग जरी यशस्वी झाला असला तरी साधारण दोन ते तीन वर्षांचा कालावधी ही सुविधा देण्यास लागणार आहे. ड्रोनद्वारे पिझ्झा घरपोच देण्याचा प्रयोग मध्य मुंबईतील लोअर परेल भागात करण्यात आला. ही चाचणी घेणारे फ्रेन्सिस्को पिझ्झेरियाचे मुख्य कार्यकारी मिखेल रजनी यांनी सांगितले की, हा चाचणी प्रयोग यशस्वीरीत्या पार पडला. ११ मे रोजी घेण्यात आलेल्या या चाचणीत दीड किलोमीटरपर्यंत राहणार्या ग्राहकाला पिझ्झा घरपोच देण्यात आला. लोअर परेल भागातून ड्रोनद्वारे पिझ्झा घेऊन गेल्यानंतर वरळी येथील एका गगनचुंबी इमारतीतील एका ग्राहकाकडे पिझ्झा पोहोचवण्यात आला. देशातील हा पहिलाच प्रयोग असेल, ज्यामध्ये ड्रोनद्वारे पिझ्झा ग्राहकाला देण्यात आला. यात अनेक सुधारणा करण्याबरोबरच काही परवानग्याही लागणार असल्याने साधारण दोन वर्षे तरी अशी सुविधा पुरवण्यास वेळ लागेल, असे रजनी यांनी सांगितले. ड्रोनमुळे पिझ्झा डिलिव्हरी बॉयचा वेळ बराच वाचणार आहे. दुचाकीवरून पिझ्झा घेऊन जाणे आणि वाहतूककोंडीचा सामना केल्यानंतर तो ग्राहकाला देणे यात वेळ जात असल्यानेच आमच्याकडून ड्रोनचा वापर करण्याचा विचार केला जात असल्याचे ते म्हणाले.
मुंबईत ड्रोनद्वारे आता पिझ्झाची डिलिव्हरी
By admin | Updated: May 22, 2014 04:55 IST