राहुल गायकवाड,
पुणे- स्वातंत्र्यलढ्याची निशाणी म्हणून ओळखली जाणारी खादी, आता फक्त राजकरण्यांपुरती मर्यादित न राहता सर्वसामान्य नागरिकांच्याही पसंतीस उतरत आहे. काळ बदलला तसतसं खादीमध्येही बदल होत गेले. नेतेमंडळींकडून वापरली जाणारी खादी आता तरुणांचाही स्टेट्स सिम्बॉल बनला आहे. काळानुरुप बदल करणे गरजेचे आहे, हे लक्षात आल्यावर खादीच्या कपड्यांचे नवीन प्रकारही येऊ लागले आहेत. कुर्ता, शर्ट यांच्यापर्यंत सीमित असलेल्या खादीमध्ये आता शॉट्स, अनारकली, सलवार, चुडीदार, पलाझो आदी कपड्यांचे प्रकारही आले आहेत. कलमकारी केलेल्या खादीच्या कपड्याला विशेष मागणी आहे. या प्रकारात कारागीर हाताने कापडावर आपली कलाकुसर करतात. त्यामुळे एक प्रकारचा स्वदेशी टच त्याला प्राप्त झाला आहे. खादीच्या वाढत्या मागणीमुळे ग्रामीण भागातील कामगारांनाही मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला आहे.भारतीयांनाच नव्हे, तर परदेशी नागरिकांनाही खादीची भुरळ पडत आहे. विशेषत: योगशास्त्राचा अभ्यास करणारे परदेशी नागरिक आवर्जून खादीची खरेदी करताना दिसत आहेत. खादीमध्ये प्रिंटेड कपडे आल्याने तरुणही खादी वापरू लागले आहेत. खादी वापरणे हे एक स्टेट्स सिंबॉलही झाले आहे. सणांच्या काळात खादीचे कापड आवर्जून खरेदी केले जातात. गणपतीमधील ढोलपथकातील वादक खादीचाच आवर्जून वापर करतात. घरात लागणारे प्रत्येक कापड खादीमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाला केला जाणारा खादीचा वापर आता दैनंदिन आयुष्यातही होऊ लागला आहे.>काळानुरुप खादीमध्येही अनेक बदल झाले आहेत. नाट्य-सिनेक्षेत्रातही खादीची मागणी वाढली आहे. अनेक फॅशन डिझायनरकडून विविध प्रयोग खादीमध्ये केले जात आहेत, त्यामुळे तरुणही खादीकडे आकर्षित होत आहेत. खासकरून परदेशी नागरिक खादीला पसंती देत आहेत.- देविका काळे, फॅशन डिझायनर >खादी आता फक्त कुर्ता किंवा मोदी जॅकेटपुरती मर्यादित राहिली नसून विविध प्रयोग खादीमध्ये होत आहेत. खादीचे शॉट्स, प्रिंटेड शर्टसही बाजारात आले आहेत. निवडणुकीच्या काळातच खादीला मागणी असते, असे नसून आता वर्षभर खादीला मागणी आहे.- श्रीनिवास जन्नू, खादी कापड विक्रेते