अतुल कुलकर्णी, नागपूरएरव्ही कधीही स्वत:च्या विषयाव्यतीरिक्त सभागृहात फारसे न दिसणाऱ्या राष्ट्रवादीच्या सगळ्या ज्येष्ठ आमदारांनी सध्या विधानसभेत मुक्काम ठोकल्याचेच चित्र पहावयास मिळत आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत सभागृहातल्या कामकाजात भाग घेत, संधी मिळेल तेथे सत्ताधाऱ्यांची अडचण करत सगळे नेते बसून आहेत.विधीमंडळाचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री छगन भूजबळ आणि जयदत्त क्षीरसागर हे पहिल्या रांगेतल्या बाकांवर सभागृह सुरु झाल्यापासून बसलेले असतात. दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी देखील हेच चित्र पहावयास मिळाले. सकाळी १० वाजताच सभागृहाचे कामकाज सुरु झाले तेव्हा हे सगळे सभागृहात हजर होते. जितेंद्र आव्हाड यांना निलंबीत केल्यामुळे सभागृहाच्या कामकाजावर अधिवेशन संपेपर्यंत बहिष्कार टाकण्याची भूमिका राष्ट्रवादीने जाहीर केली होती. मात्र सोमवारी कामकाज सुरु होताच ‘राज्यात मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली आहे त्यामुळे बहिष्कार न टाकता आम्ही कामकाजात सहभागी होत आहोत’ असे अजित पवारांनी जाहीर केले. त्यावेळी सभागृहात काँग्रेसचा एकही ज्येष्ठ सभासद हजर नव्हता. काँग्रेसचे गट नेते राधाकृष्ण विखे पाटील, पृथ्वीराज चव्हाण आणि नागपुरातच रहाणारे विजय वडेट्टीवार हे अकरा, साडे अकराच्या सुमारास सभागृहात आले.एकीकडे भाजपाला न मागता पाठींबा जाहीर करणाऱ्या राष्ट्रवादीने सभागृहात मात्र छोट्या छोट्या मुद्यावर सरकारला अडचणीत आणणे सुरु केले आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेच्यावेळी मुख्यमंत्री सभागृहात नव्हते. तेव्हा वळसे पाटील यांनी हरकत घेतली. शेवटी मुख्यमंत्री सभागृहात आले. विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे उभे राहून बोलत असताना उद्योगमंत्री सुभाष देसाई सभागृहाबाहेर गेले तेव्हा भूजबळांनी त्यावर तीव्र आक्षेप घेतला. अशा अनेक गोष्टीत राष्ट्रवादीने सरकारला अडचणीत आणणे सुरु केले आहे. त्यामुळेच सभागृहात ज्येष्ठ मंत्र्यांना सतत बसून रहावे लागत आहे.काँग्रेसला मात्र अजूनही सभागृहात सूर सापडलेला नाही. किंबहुना आपण विरोधी बाकावर आलो आहोत हे पचनी पडलेले नाही. राष्ट्रवादीचे मंत्री ज्या पध्दतीने अडचणीचे मुद्दे उपस्थित करतात, सभागृहात काय चालले आहे यावर बारीक लक्ष ठेवून असतात तसे काँग्रेसकडून होताना दिसत नाही. आव्हाड यांच्या निलंबनावरुन बहिष्कार टाकणाऱ्या राष्ट्रवादीने सोमवारी कामकाजात भागही घेतला आणि आव्हाडांचे निलंबनही रद्द करुन घेतले. ही फ्लोअर मॅनेजमेंट काँग्रेसला अजूनही जमलेली नाही. नाही म्हणता विधानपरिषदेत राष्ट्रवादीने विरोधी पक्षनेतेची निवड जाहीर करावी म्हणून राष्ट्रवादीने सभागृह डोक्यावर घेतले पण जोपर्यंत विधानसभेचा विरोधीपक्षनेता जाहीर होत नाही तोपर्यंत परिषदेचा जाहीर करायचा नाही यासाठी काँग्रेसने सभापती शिवाजीराव देशमुख यांच्यावर दबाव आणला. त्यातूनच राष्ट्रवादीने सभापतींच्या विरोधात अविश्वास ठराव आणला. परिषदेत काँग्रेस जेवढी आक्रमक झालेली दिसते तेवढी विधानसभेत मात्र दिसत नाही.
राष्ट्रवादीचा मुक्काम पोस्ट विधानसभा!
By admin | Updated: December 16, 2014 02:31 IST