बुधवारी सकाळी अनेक लोक रवाना : रेल्वे, विमान हाऊसफुल्ल राजेश पाणूरकर - नागपूरआपला माणूस मुख्यमंत्री झाला याचा नागपूरकरांना प्रचंड आनंद झाला. देवेंद्र यांच्याशी परिचय असणारे लोक देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा होताच थेट त्यांच्या धरमपेठ येथील बंगल्यावर पोहोचले. देवेंद्र मुंबईत असल्याने त्यांच्याशी संवाद साधता आला नाही पण मित्रमंडळींनी फोनवर त्यांचे अभिनंदन केले. देवेंद्र यांच्यावर प्रेम करणारे अनेक सामान्य कार्यकर्ते, नागरिकांनाही देवेंद्र यांच्या मुख्यमंत्री होण्याचा अभिमान वाटतो आहे. त्यांची देवेंद्रशी थेट ओळख नाही पण त्यांच्याविषयी आपुलकी आहे. नागपुरातून हजारो चाहते मुंबईसाठी बुधवारी रवाना झाले तर उर्वरित लोक गुरुवारी सकाळी मुंबईसाठी निघणार आहेत. सर्वांनाच आता शपथविधी सोहळा याची देही याची डोळा पाहण्याची आस आहे. देवेंद्र मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाल्यावर अचानक मुंबईकडे जाणाऱ्यांची संख्या वाढली. प्रत्येकालाच आपल्या देवेंद्रला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना पाहण्याची आणि तो क्षण साठवून ठेवण्याची इच्छा आहे. त्यामुळे मुंबईला जाणाऱ्या रेल्वे आणि विमानेही हाऊसफुल्ल झाली आहेत. पण शपथविधीला जाण्याची इच्छा असणाऱ्यांची संख्या जास्त आणि वाहतुकीची साधने कमी असल्याने अनेक लोक रेल्वे व विमानाची तिकिटे कशी मिळू शकतील याच्या प्रयत्नात आहेत. ट्रॅव्हल एजंटकडे अनेक लोक विनंती करीत आहेत तर अनेकांनी रेल्वेने वेटिंगवरच जाण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी मुंबईकडे जाणाऱ्या सर्व रेल्वे एक्स्ट्रा फुल्ल झाल्या तर गुरुवारीही हीच स्थिती राहण्याची चिन्हे आहेत. पण अनेक सामान्य नागरिक मुंबईला शपथविधीला जाण्याची इच्छा असूनही जाऊ शकत नाहीत. त्यांनाही देवेंद्रच्या मुख्यमंत्री होण्याचा आनंद आहे. जे सामान्य नागरिक मुंबईला जाऊ शकत नाही, त्यांना देवेंद्रचे निवासस्थान पाहण्याची इच्छा होती. हे आता मुख्यमंत्र्याचे घर आहे, याचा त्यांना अभिमान वाटतो. आज दिवसभर सामान्य नागरिक मिठाई घेऊन अभिनंदनासाठी सातत्याने येत होते. देवेंद्र यांची आई आणि स्वीय सहायकांच्या हातात मिठाईचे डबे देऊन त्यांचे अभिनंदन करीत होते. आई सरिता फडणवीस यांनीही प्रेम करणाऱ्या जनतेचे अभिनंदन देवेंद्रच्यावतीने दिवसभर स्वीकारले.सी. एम. देवेंद्रचे निवासस्थान झगमगले नुकतीच दिवाळी साजरी करण्यात आली. दिवाळीच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी साधी रोषणाई करण्यात आली होती. पण देवेंद्र मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाल्यावर आणि शपथविधीची तारीख कळल्यावर साऱ्यांच्याच उत्साहाला उधाण आले. हा आनंद दिवाळीसारखाच होता. त्यामुळे जुन्या रोषणाईसह पुन्हा नव्याने झगमगणारी खास रोषणाई फडणवीस यांच्या निवासस्थानी करण्यात आली आहे. त्यामुळे सी. एम. देवेंद्र यांचे निवासस्थान रोषणाईने झगमगले आहे. सतत अभिनंदनासाठी येणारे नागरिक, पोलिसांचा बंदोबस्त आणि संवादाने भावी मुख्यमंत्र्यांची वास्तू बहरली आहे. येथूनच ते निवडून मुंबईत गेले. ते मुंबईला निघाले तेव्हा आमदार म्हणून गेले पण आता परतून येताना ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊनच येणार आहेत. त्यामुळे नेहमी पाहिलेल्या आ. देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणून होणाऱ्या आगमनासाठी त्यांचे निवासस्थान प्रतीक्षेत आहे.
चाहत्यांचे मिशन मुंबई
By admin | Updated: October 30, 2014 00:48 IST