चिंचवड : सर्पमित्रांनी जीवदान देऊन आणलेल्या सापांकडे सर्पोद्यानातील कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले. सापाच्या बरण्या आणि प्लॅस्टिक पिशव्या न खोलता तशाच ठेवल्यामुळे सात साप मृत झाले. ‘लोकमत’ने दिलेल्या या वृत्ताची महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी गंभीर दखल घेतली. सर्पोद्यानाचे अधिकारी डॉ. सतीश गोरे यांना याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. घराच्या आवारात, सार्वजनिक वावर असलेल्या ठिकाणी सर्पमित्रांनी पकडलेले साप संवर्धनासाठी सर्पमित्रांनीसंभाजीनगर, चिंचवड येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी सर्पोद्यानात आणून दिले. तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे ते सर्प मृत झाल्याची घटना ‘लोकमत’ने उघडकीस आणली. सर्पमित्रांच्या मदतीने पकडलेले साप सर्पोद्यानात ठेवले जातात अथवा जवळच्या जंगलात निसर्गात सोडून दिले जातात, असा नागरिकांचा समज या घटनेने फोल ठरला. सर्पमित्रांनी प्लॅस्टिक बरणी आणि प्लॅस्टिक पिशवीत साप आणले. त्या प्लॅस्टिक बरण्या, पिशव्या खोलण्याची तसदीसुद्धा महापालिकेच्या सर्पोद्यानातील कर्मचाऱ्यांनी घेतली नाही. (प्रतिनिधी)
‘त्यांच्या’ पायात मेमोचा साप
By admin | Updated: August 2, 2016 01:46 IST