- उमेश घेवरीकर, शेवगावअपंग सोहेल व अफसरला रोज व्हीलचेअरवरून शाळेत पोहोचविण्याचे व्रत गेल्या चार वर्षांपासून मोईन व अबू यांनी येथे जपले आहे़ त्यांच्या मैत्रीच्या चाकावरच सोहेल व अफसरच्या शिक्षणाचा प्रवास सुरू आहे़सोहेल आणि अफसर जन्मत: अपंग असलेली जुळी भावंड़े आई अफसान चार घरची धुणीभांडी करून कुटुंब सावरणारी, तर वडील राजू पठाण सायकलवर भटकंती करून भंगार गोळा करण्याचा व्यवसाय करणारे. स्वत: अल्पशिक्षित असले, तरी त्यांनी मुलांना उत्तम शिक्षण देण्याचा ध्यास घेतला आहे. व्यवसाय सांभाळून ते दोन्ही मुलांना दररोज चौथीपर्यंत सायकलवरून शाळेत सोडायचे मात्र, माध्यमिक शाळा दीड किलोमीटर अंतरावर असल्याने त्यांना रोज मुलांना सोडण्यास वेळ मिळेना.समाजकल्याण खात्याकडून मोठ्या जिकरीने मुलांसाठी एक व्हीलचेअर मिळाली. येथील बाळासाहेब भारदे हायस्कूलमध्ये त्यांनी मुलांना पाचवीत दाखल केले, पण त्यांना व्हीलचेअरवरून नेण्या-आणण्याचा मोठा प्रश्न होता. तो मोईन व अबु पठाण या दोघा वर्गमित्रांनी सोडवला. व्हीलचेअर ढकलत हे दोघे सोहेल व अफसरशी गप्पा मारत त्यांना शाळेत आणतात व पुन्हा घरी पोहोचवतात.
मैत्रीच्या चाकावर शिक्षण प्रवास
By admin | Updated: April 3, 2016 03:51 IST