सुभाष कदम - चिपळूणकौलालुंपर (मलेशिया) येथे आठ देशांतर्गत झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा मलेशिया योगासन असोसिएशनने आयोजित केली होती. यामध्ये गौरी निनाद डाकवे सहभागी झाली होती. या स्पर्धेत तिने प्रथम क्रमांक पटकावला व भारताची मान जगभरामध्ये उंचावली. या स्पर्धेत चीन, जपान, श्रीलंका, थायलंड, कोरिया, भारत, इंडोनेशिया या देशांतील खेळाडूंचा समावेश होता. गौरीला योग प्रशिक्षक मंगेश खेडेकर व मधुकर पवार यांचे मार्गदर्शन लाभले. जिद्द व कोवॅसच्या अध्यक्षा सुमती जांभेकर यांचे सहकार्य लाभले. गद्रे इंग्लिश मीडियम स्कूल, चिपळूणची गौरी विद्यार्थिनी असून, डीडी असोसिएटचे निनाद डाकवे व प्रीती डाकवे यांची ती कन्या आहे. चिपळूण कोवॅसच्या व्यायाम शाळेत वयाच्या तिसऱ्या वर्षी गौरी दाखल झाली. वयाच्या चौथ्या वर्षी तिने माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक उमेश शेट्ये यांच्या आर्यन स्पोटर्स क्लबने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत तिने पहिल्यांदाच द्वितीय क्रमांक मिळविला आहे. तेथेच गौरीच्या योगासनाच्या करिअरला सुरुवात झाली. खूप लहान असल्याने अनेक राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये तिच्या वयाचा वयोगट नव्हता. तरीसुद्धा केवळ जिद्दीने अनेक स्पर्धांमध्ये ती सहभागी झाली. दि. २० डिसेंबर २०११ रोजी वयाच्या सहाव्या वर्षी मुंबई महापौर चषकाच्या योगासन स्पर्धा २०११मध्ये ८ वर्षांवरील वयोगटामध्ये सहभागी झाली. परंतु, गौरी सहा वर्षांची असल्याने स्पर्धेमध्ये सहभागीचे प्रमाणपत्र मिळाले बक्षीस नाही. तरीसुद्धा न हरता तिने पुन्हा वेगवेगळ्या स्पर्धांमधून सहभागाची तयारी सुरूच ठेवली. २८ जुलै २०१२ रोजी दिवंगत बाबा लागवणकर खुल्या राज्यस्तरीय स्पर्धेत वयाच्या ६ व्या वर्षी ती सहभागी झाली. यामध्ये तिला यश मिळाले नाही. सिध्दी योग केंद्र, मिरज व कर्नाटक तुळनाड संघ यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेमध्ये ८ ते १४ वर्षांच्या वयोगटात ती सातव्या वर्षी सहभागी झाली. दि. १ मे २०१३ रोजी मुंबई महापौर चषकामध्ये वयाच्या सातव्या वर्षी सहभागी झाली. परंतु, वय कमी असल्याने उत्कृष्ट प्रदर्शन करूनही यश मिळाले नाही. तरीही अपयशाने न खचता पुन्हा जोमाने सरावला सुरुवात केली. प्रशिक्षक मंगेश खेडेकर यांनी जिद्द व चिकाटी सोडली नाही. आठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर योगासन चॅम्पियन शीपच्या राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये ती सहभागी झाली. ११ मे २०१४च्या राष्ट्रीय स्तरावरील योगासन स्पर्धेत दुसरी येऊन ती मलेशियासाठी पात्र ठरली. मुलगा असावा, यासाठी आजही आग्रह धरुन आजही समाजात स्त्री भ्रूणहत्या केली जाते. मुलगीला कमी लेखले जाते. परंतु, परदेशातील या स्पर्धेतही जास्तीत जास्त मेडल मुलींनी पटकावली. मुलांपेक्षा मुली पुढेच आहेत. याचे भान राखून मुलगी वाचवा, असा संदेश गौरीचे वडील निनाद डाकवे यांनी दिला. देशाची मान उंचावली.वडिलांच्या प्रोत्साहनामुळे मलेशियात जाऊ शकली गौरी.योगासनामध्ये अलौकिक कामगिरी करणार.जिद्दीने सहभागी झाली अनेक स्पर्धांमध्ये गौरी.अनेक स्पर्धा गाजवल्या.
मूर्ती छोटी, कामगिरी मोठी : भारताची मान उंचावली आहे चिपळूणच्या सुकन्येने!
By admin | Updated: October 6, 2014 22:32 IST