मुरलीधर भवार, कल्याणपरिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी नवीन रिक्षाचालकांना परवाने देताना मराठी बोलता, लिहिता व वाचता येणे अनिवार्य केले असले तरी कल्याणमधील अनेक मराठी मुलांना मराठीचा गंध नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.केवळ मराठी बाण्याची गीते गाऊन, मराठीच्या अभिमानापोटी खळ्ळ खट्याक करण्याच्या वल्गना करून मराठी भाषेचा विकास व वापर होत नाही. त्याकरिता, महापालिका शाळांपासून खासगी शाळांपर्यंत उत्तम मराठी शिकवले जाईल, याची काळजी घेणे गरजेचे असते. हे अंजन शिवसेना, मनसे या पक्षांच्या डोळ्यांत या अनुभवाने घातले गेले असेल, असे मत व्यक्त होत आहे.कल्याण उपप्रादेशिक कार्यालयात गेल्या तीन दिवसांपासून रिक्षाचालकांच्या मुलाखती सुरू आहेत. आणखीन दोन दिवस हा कार्यक्रम सुरू राहणार आहे. आतापर्यंत ३ हजार ७२५ पैकी १ हजार ८७३ जणांच्या मुलाखती पार पडल्या आहेत. त्यामध्ये बहुतांशी मराठी भाषिक असूनही त्यांना मराठी भाषेचे ज्ञान नसल्याचे उघड झाले. रिक्षाचालकांची १२ कर्तव्ये मराठीत सांगताना अनेकांची त...त...प...प.. झाली. शहरातील ठळक ठिकाणे व खाणाखुणा, व्यक्ती यांच्याबाबत अनेक मुलांना माहिती नव्हती. अनेक मराठी मुलांना मराठी बोलता आले नाही. काहींनी उत्तरे दिली नाहीत. मराठी न येणाऱ्यांना परवाने द्यायचे किंवा कसे, याचा निर्णय राज्य सरकारच्या हाती असेल. 10,000परवाने झाले होते रद्द कल्याण आरटीओ क्षेत्रात 27,000रिक्षाचालक असून त्यापैकी 10,000परवाने रद्द करण्यात आले होते. त्यानंतर, तीन टप्प्यांत पुन्हा परवाने देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून 3,725परवाने लॉटरी पद्धतीने रिक्षाचालकांना मिळाले. परवान्याची लॉटरी लागल्यावर तीन दिवसांपासून केणी गार्डन हॉलमध्ये मुलाखतीचा कार्यक्रम सुरू आहे. > यावेळी महिलांची नावे लॉटरी लागणाऱ्यांत आल्याने त्याही मुलाखतीला आल्या होत्या. 22 महिलांना रिक्षाचालकाचे परवाने मंजूर झाले. मात्र, त्या स्वत: रिक्षा चालवणार किंवा कसे, याविषयी ठाम नसल्याचे जाणवले. त्या त्यांच्या नवऱ्याला किंवा नातेवाइकांना रिक्षा चालवण्यास देणार आहेत. मात्र, महिलांचा रिक्षा परवाना महिलांनीच वापरायचा, अशी सरकारची सक्ती आहे.१ कोटी ७८ लाख झाले जमागेल्या तीन दिवसांत ३ हजार ७२५ जणांपैकी १ हजार ८७३ जणांची तोंडी परीक्षा घेण्यात आली. त्यापैकी १ हजार ३६७ जण उत्तीर्ण झाले. एक हजार ११४ जणांनी परवान्याचे शुल्क भरले. त्यातून सरकारच्या तिजोरीत एक कोटी ७८ लाख २४ हजार रुपयांचा महसूल जमा झाला आहे. त्यापैकी १०१ जणांना परमिटचे वाटप करण्यात आले आहे.
मराठी मायबोली असणारेच झाले नापास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2016 01:42 IST