गेले दहा दिवस भाविकांसोबत असलेल्या गणरायाने भाविकांना सकारात्मक ऊर्जा आणि आनंद दिला. आज गणरायाला निरोप देताना प्रत्येक भाविक हळवा होईल.
आपल्या इष्ट कामासाठी, संकटांचे हरण करण्यासाठी पुन्हा या, असे आवाहन गणरायाला करण्यात येईल. लहानथोरांच्या तोंडी एकच गजर असेल, ‘बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर या.’
बरं झालं बाप्पा जाताना पावसाची शिंपण करून गेला. तहानलेल्या महाराष्ट्रावरील दुष्काळी विघ्न तू थोडं का होईना दूर करून गेलास. गेले दहा दिवस तुझं अस्तित्व पावसाच्या रूपानं बरसत गेलास. तुझ्यावर श्रद्धा असणाऱ्यांनी कोर्टाचा आदेश धुडकावत जल्लोषात उत्सव साजरा केला. कोर्टानं काही मंडळांवर दंडाची कारवाई केली, पण काही फरक पडला नाही.
बाप्पाच्या उत्सवात कोर्टाची आॅर्डर हवेत विरून गेली. १० दिवस बाप्पानं आयुष्यातला तणाव कमी केला. ‘डीजेवाले बाबू मेरा गाना लगा दे’ म्हणत डीजेच्या तालावर तरुणाईही बेधुंद नाचली. तेवढाच त्यांचा शिणवटाही दूर झाला. यंदा बाप्पाच्या उत्सवाची उलाढाल २० हजार कोटींच्या घरात पोहोचल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. दुष्काळाचे ढग घेऊन वावरणाऱ्या आपल्या राज्यात ही उलाढाल थोडी धक्का देणारी ठरली, तरी उत्सवप्रेमी मराठी माणसांनी त्याकडे कानाडोळा करीत उत्सवी रंगाचा कुठेही बेरंग होऊ दिला नाही. बाप्पानेही पावसाच्या रूपाने बरसात करीत श्रद्धेचे पीक अधिक रोवले. मुंबईसारख्या महानगरीत तर अनेक नवे ‘राजा’ जन्माला आले. काही राजांकडे सेलीब्रिटींची ऊठबस झाल्याने कार्यकर्ते जोमात होते. काही मंडळांनी दुष्काळग्रस्तांचे दु:ख वाटून घेतले. अगदी पाच हजारांपासून दीड लाखापर्यंत मदत देऊ केली. यंदाच्या गणेशोत्सवाचे हे सामाजिक भान अधिक उठावदार दिसले.
बाकी पर्यावरण, ध्वनिप्रदूषण यासारख्या क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करीत आम्ही बाप्पाचा जागर सुरू ठेवला होता. स्वाइनची लागण जोरात असूनही गर्दीची मंडळे फुललेलीच होती. भव्यदिव्य बाप्पाच्या पायावर डोकं ठेवण्यासाठी प्रचंड चढाओढ होत होती. दानपेटीही भरभरून वाहत होती. ती मोजण्यासाठी मोठी मनुष्यबळाची यंत्रणाही काम करीत होती. तिकडे नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे ही मंडळी दुष्काळी भागातील आत्महत्यांना लगाम कसा घालता येईल यासाठी जीवतोड प्रयत्न क रीत होती. बाप्पानेच त्यांना ही बुद्धी दिली असणार. त्यांच्या प्रयत्नांना महाराष्ट्रातून चांगला प्रतिसादही मिळतो आहे. ‘नाम फाउंडेशन’ नावाने आत्महत्याग्रस्त कुटुंबासाठी ही मंडळी निधी उभा करीत आहे. अन्य प्रसारमाध्यमांनीही हा उपक्रम उचलून धरला आहे. सोशल मीडियावर बोलबाला झाल्याने संवेदनशील मराठी माणसाचे काळीज हलले. साऱ्यांच्या मनात नाना-मकरंदवरच्या प्रेमाला आणखी पालवी फुटली. हे सत्कर्म करण्याची सुबुद्धी सरकारलाही सुचू दे, अशी काहींनी बाप्पाकडे प्रार्थना केली. मुख्यमंत्र्यांनीही गणेशोत्सवात पाऊस पडू दे, अशी बाप्पाकडे विनवणी केली आणि बाप्पानेही ऐकली. अवर्षणाची छाया घेऊन आलेली गणेशमूर्ती, अनंत चतुर्दशीला मात्र हिरवाई देऊन गेली. बाप्पा तुझी सोंड उजवी असेल तर खूप सोवळं पाळावं लागतं म्हणून सगळीकडे डाव्या सोंडेचा बाप्पा स्थापित होतो. तुझ्या बाबतीत जसा डाव्या-उजव्याचा वाद असतो तसा वाद आमच्या समाजात चिरंतन सुरू आहे. दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गींच्या हत्येच्या अनुषंगाने डाव्या-उजव्याचा वाद टोकाला गेला आहे. अतिउजव्यांकडे संशयांची बोटे दाखवीत अतिडाव्यांनी सरकारलाही धारेवर धरले आहे. या डाव्या-उजव्यांची दरी इतकी वाढली आहे, की मनुष्यधर्मापेक्षा त्यांचा धर्म वरचढ ठरत आहे. टोकाची मतं घेऊन जगणाऱ्या या मर्त्य मानवांना सुबुद्धी देण्याची व्यवस्था आता बाप्पानेच करायला हवी. तसे आम्हा मंडळींना जाती-भेदाच्या, पंथाच्या वादामध्ये जगण्याची सवयच झाली आहे. जातीचा नसेल तर धर्माचा, तोही नसेल तर विचारांचा, नेतृत्व करणाऱ्या किंवा केलेल्या नेत्यांवरून, त्यांच्या स्मारकावरून आम्ही वितंडवाद घालत बसतो. वादाविना आमचा एकही दिवस संपत नाही. वादाची, भांडणाची, विद्वेषाची, त्वेषाची भावना घेऊनच आम्ही जगत असतो आणि तसेच मरतोही. मधल्या जगण्याला आम्ही कदाचित उत्सव म्हणत असू. कारण कुठला तरी वादी (इझम) असल्याशिवाय तुम्ही या जगात जगू शकत नाही, अशी रचनाच तयार झाली आहे. त्यामुळे बाप्पा, कधी कधी आम्ही तुलाही प्रतिवादी करतो. बाप्पा, तू मात्र वेगवेगळ्या रूपात, आकारात, सजावटीत, रोशणाईत मोठ्या दिमाखात दर्शन देत असतो. आम्ही आमचं तणावाचं आयुष्य गृहीत धरीतच तुझ्याचरणी लीन होत असतो. त्या लीनतेतच धन्यता मानतो. त्या समर्पणात भक्तिभावापेक्षा आम्हाला आमचा ताण विसरायचा असतो. तुझ्यासमोर बेधुंद नाचताना, ढोलच्या ठेक्यात आम्हाला स्वत:लाच विसरायचं असतं. म्हणून तू दरवर्षी आम्हाला हवा असतो. दहा दिवस का होईना आमच्यावरचा ताण थोडा हलका होतो. पुढच्या वर्षीची आरोळी देत तू जातोस. आजही निघालास बाप्पा. जाताना मनामनात मनुष्यधर्माचे थोडे शिंतोडे उडवून जा. आमच्या-आमच्यात जरा प्रेमाची, जिव्हाळ्याची, वात्सल्याची, ममत्वाची थोडी भावना निर्माण करून जा. गुड बाय बाप्पा.
-------भाद्रपद शुक्ल चतुर्दशीला अनंत व्रत करतात. सकाळी सूर्योदय लापिनी भाद्रपद शुक्ल चतुर्दशीचा दिवस घेतला जातो. या वर्षी रविवार २७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीचा दिवस आला आहे.अनंत चतुर्दशीच्या दिवशी सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याची प्रथा आहे. खरे म्हटले तर गणेशमूर्ती विसर्जनाचा आणि अनंत चतुर्दशीचा तसा काहीही संबंध नाही. हे दोन्ही स्वतंत्र विषय आहेत. मग अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशमूर्तींचे विसर्जन का केले जाते, असा प्रश्न मनात येणे साहजिकच आहे. याला शास्त्रीय कारण असे आहे की, कधी कधी भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी अपराष्ट्रकाळी प्रतिपदा असेल तर त्या दिवशी प्रतिपदा श्राद्ध येते. भाद्रपद पौर्णिमेच्याच दिवशी ‘महालयारंभ’ येतो. म्हणजेच त्याच दिवशी पितृपक्ष सुरू होतो. पितृपक्षाचे हे दिवस केवळ आपल्या पितरांचे स्मरण करण्यासाठी, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राखून ठेवलेले असतात. म्हणून अनंत चतुर्दशीचा दिवस गणेशोत्सावातील शेवटचा दिवस ठरतो. म्हणूनच या दिवशी सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याची प्रथा आहे.----------अनंत व्रत अनंत व्रत हे भाद्रपद शुक्ल चतुर्दशीला करतात. हे काम्य व्रत असून याचा अवधी चौदा वर्षांचा आहे. गतवैभव परत मिळावे, या हेतूने हे व्रत सांगितलेले आहे. या व्रतामध्ये अनंत म्हणजे विष्णू ही याची मुख्य देवता असून, शेष व यमुना या गौण देवता आहेत.सकाळी स्नान करून कर्दळी लावून सुशोभित असा चौरंग तयार करतात. चौरंगाखाली सर्वतोभद्र मंडल काढून त्यात अष्टदल कमळ काढतात. त्यावर सात पुष्पांचा दर्भांकुरांनी बनविलेला शेष नाग ठेवून त्याच्यापुढे चौदा गाठींचा रेशमी दोरा ठेवताना कुंभाला वस्त्रयुग्माचे वेष्टन करतात. कुंभातील पाण्याला ‘यमुना’ म्हणतात. प्रथम यमुना व शेष यांचे पूजन करायचे. मग त्याच पात्रात अग्त्युतारण करून बसविलेल्या अनंतमूर्तीचे मंत्राने ध्यान करतात. नंतर षोडशोपचारे पूजा केली जाते. या पूजेमध्ये अंगपूजा, आवरण पूजा असतात. पुष्पांजली झाल्यावर अर्ध्य देतात. मग दोऱ्यांची प्रार्थना करून ती चौदा गाठींचा दोरा हातात किंवा गळ््यात बांधतात आणि जुन्या दोऱ्याचे विसर्जन करतात. सांगतेसाठी दंपतीभोजन घालताना हे व्रत चौदा वर्षे करण्याची प्रथा आहे. या व्रतासंबंधी गतवैभव प्राप्त झालेली कथाही सांगितली जाते. या व्रतामध्ये सर्पपूजेला महत्त्व दिले गेले आहे.सध्या गणेशपूजन हे जास्त प्रमाणात केले जाते, तेवढे अनंत चतुर्दशीचे व्रत केले जात नाही. भारतीय संस्कृतीत निसर्गपूजेला बरेच महत्त्व देण्यात आलेले आहे. वनस्पती, जलाशय, प्राणी, नाग यांना विशेष महत्त्व आहे. या निसर्गाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांचे महत्त्व पटवून देण्यासाठीच हे सांगण्यात आलेले आहे.(लेखक लोकमत मुंबई आवृत्तीचे कार्यकारी संपादक आहेत.)