मुंबई : बेस्ट कर्मचार्यांना प्रत्येक महिन्याच्या १० तारखेआधीच वेतन द्या, असे आदेश औद्योगिक न्यायालयाने बेस्ट प्रशासनाला बुधवारी दिले़ याने बेस्टच्या ४० हजार कर्मचार्यांना दिलासा मिळाला आहे़ औद्योगिक न्यायालयाचे सदस्य डी़एस़ शिंदे यांनी हे आदेश दिले़ महत्त्वाचे म्हणजे वेतन वेळेवर न देण्याचे प्रकार बेस्टने बंद करावेत, असेही न्यायालयाने प्रशासनाला बजावले आहे़ कर्मचार्यांचा भविष्य निर्वाह निधीही प्रशासनाने जमा करावा व यात काही गैर आढळल्यास बेस्ट जागृत कामगार संघटना फौजदारी तक्रारही दाखल करू शकते, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे़ याआधी कर्मचार्यांचे वेतन महिन्याच्या २ तारखेला मिळत होते़ पण, अचानक प्रशासनाने वेळेवर वेतन देता येणार नसल्याचे जाहीर केले़ हे गैर असून नियमाप्रमाणे कर्मचार्यांना वेळेवर वेतन मिळाले पाहिजे, असा दावा तक्रारीमध्ये करण्यात आला़ याची दखल घेत न्यायालयाने या तक्रारीवर अंतिम निर्णय होईपर्यंत कर्मचार्यांना प्रत्येक महिन्याच्या १० तारखेआधी वेतन द्या, असे आदेश प्रशासनाला दिले व पुढील सुनावणी जून महिन्यात ठेवली़
बेस्टचा पगार १० तारखेआधीच द्या
By admin | Updated: May 22, 2014 05:00 IST