‘बाहुल्यांचा खेळ’ पाहण्यातली मजा काही औरच. सध्याच्या टेक्नोलॉजीच्या काळात ही कला जोपासणारा कलाकार विरळाच. पण सत्यजीत पाध्ये या अवलियाने सीए झाल्यानंतरही आपल्या छंदाशी एकनिष्ठ राहून कुटुंबाची परंपरा पुढे चालवली. त्याच्या टर्निंग पॉइंटची ही कहाणी.लहानपणापासूनच बाबांना (रामदास पाध्ये) बाहुल्यांचे खेळ करताना पाहिलं होतं. अगदी शाळकरी वयातच बाबांसोबत शोसाठी जायचो. बाबा वर्कशॉपमध्ये जेव्हा पपेट्स डिझाइन करायचे त्या वेळी मीसुद्धा ते बघत बसायचो. काही वेळा बाबा मलाही ते करायला द्यायचे. हा माझा छंद कधी बनला, ते मला समजलंच नाही. जसजसा मोठा होत गेलो तसतशी त्यातील रुची वाढत गेली. पण बाबांनी मला शाळेत असतानाच सांगितलं होतं की कोणताही व्यवसाय करण्यासाठी शिक्षण घेणं आवश्यक आहे. शिकलास, तर तुला कधीही कोणतीच अडचण येणार नाही.त्यामुळे मी आवड जोपासत शिक्षण सुरू ठेवलं. मला दहावीत ८२ टक्के, तर बारावीत ८० टक्के गुण मिळाले. एसएससीला १९९९ सालात इतके चांगले गुण मिळवूनही मी कॉमर्सलाच जायचं ठरवलं, जेणेकरून मला अभ्यासाबरोबरच हा छंद जोपासता येईल. यानंतर मी ही कला शिकण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी बाबांकडून सर्व तंत्र शिकू लागलो. वेगळा आवाज कसा काढायचा? घशाला त्रास न होऊ देता हा आवाज काढण्यासाठी कोणतं तंत्र वापरायचं हे सर्व शिकू लागलो. त्यानंतर आर.ए. पोद्दार कॉलेजमध्ये अकरावीत मी माझा पहिला कार्यक्रम केला. विविध स्पर्धा, कार्यक्रमांत सहभागी होत होतो. युथ फेस्टिव्हल, मल्हार फेस्टिव्हलमध्ये भाग घेतला. याच काळात मी सेमी-प्रोफेशनल काम सुरू केलं होतं. अनेक बर्थ डे पार्टीज्मध्ये मी शो करू लागलो.बाबांनी मला एक गोष्ट कायम सांगितली. ती म्हणजे, ‘कार्यक्रम लहान असो वा मोठा, तू तो करत जा. कारण आत्ता सराव होणं फार महत्त्वाचं आहे.’ बाबा म्हणत, ‘तुला यात आवड आहे हे मान्य. पण तू तुझं शिक्षण पूर्ण कर. कारण कलाकाराला शिक्षणाची जोड असेल तर तो ती कला एका वेगळ्या दिशेने घेऊन जाऊ शकतो.’ म्हणूनच मी बी.कॉम. केलं. मी उच्च शिक्षण घ्यावं, अशी आई-बाबांची इच्छा होती. माझे काका सीए आहेत. म्हणून मग मीही सीए व्हायचं ठरवलं. सीए झालो. २००९ साली ‘इंडियाज् गॉट टॅलेंट’मध्ये मी जिंकलो. त्यामुळे थोडीफार प्रसिद्धी मिळाली आणि मी मोठ्या प्रमाणावर प्रोफेशनल शोज् करू लागलो. याआधीही मी बाबांसोबत सहायक म्हणून अनेक वर्षे काम करीत होतो. १९८८ साली ‘हॅट्स आॅफ’ नावाचं नाटक केलं. त्यानंतर १९९४ साली भरत दाभोलकर यांचं ‘गुड नाइट बेबी डायमंड’ केलं होतं.मी दादरच्या मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये सातवीत असताना वार्षिक स्नेहसंमेलनात पहिला पपेट शो केला. त्यासाठी मी ‘पिंक पॅँथर’चं पपेट स्वत:च डिझाइन केलं आणि ५ मिनिटांचे संवाद लिहिले. विशेष म्हणजे माझे आई-बाबाच त्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे होते. माझ्यासाठी तो क्षण अविस्मरणीय आहे.‘पपेटीयन’चं काम फार महत्त्वाचं आहे. यासाठी रियाज आणि सराव फार डेडिकेशनने करावा लागतो. जर मी सीए आणि पपेटीयन दोन्ही होण्याचा खटाटोप केला असता तर मी या बोलक्या बाहुल्यांपासून कायमचा दुरावलो असतो. पूर्णवेळ देणं गरजेचं असतं. तरच याच्या सर्वोच्च शिखरापर्यंत आपण पोहोचू शकतो. नवनवीन प्रयोग करून कलाकार म्हणून तुमची प्रगती तेव्हाच होऊ शकते.मी माझी खास कला सादर करण्याचा प्रयत्न करतो. अनेक कॉर्पोरेट शो किंवा लग्न समारंभाचे असे विशेष शो करताना दरवेळी वेगळेपण आणावे लागते. त्यासाठी वेगवेगळी स्क्रिप्ट तयार करावे लागते. लग्न सोहळ्यासाठी नवरा-नवरीचे बाहुले तयार करून त्याप्रमाणे त्यांची स्क्रिप्ट तयार करणे असे विविध प्रयोग करावे लागतात. आता मी बाबांकडून पपेट डिझायनिंग शिकत आहे. सध्या आमच्या घरात २ हजारहून अधिक बाहुल्या आहेत. सतत काहीतरी नवीन करण्याचा आनंद काही निराळाच आहे.माझी आई एम.ए. लिटरेचर आहे. त्यामुळे तिचीही मला स्क्रिप्ट लिहिण्यामध्ये फार मदत होत असते. प्रत्येक गोष्टीत तिचा सहभाग आणि मार्गदर्शन नेहमीच असते. माझ्या आयुष्याच्या टर्निंग पॉइंटच्या वेळीही तिने मला पाठबळ दिले. माझ्या मनाचे समाधान ज्यात आहे त्यात करियर करण्याचा सल्ला दिला. आता या क्षेत्रात माझी पत्नीसुद्धा माझ्यासोबत आहे. तीसुद्धा ही कला शिकतेय. कुटुंबाच्या सहकार्यानेच माणूस यशाचं शिखर गाठू शकतो असं मला वाटतं.सायली कडू
हा खेळ बाहुल्यांचा
By admin | Updated: January 25, 2015 01:49 IST