कमलाकर कांबळे, नवी मुंबईखासगी विकासकांनी छोट्या आकाराची घरे बांधणे बंद केले आहे. त्यामुळे बजेटमधील घरांच्या शोधात असलेल्या सर्वसामान्यांची परवड होत आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात विविध उत्पन्न घटकांसाठी १० हजार घरे बांधण्याचे सिडकोने जाहीर केले आहे. यापैकी पाच हजार घरे नवीन वर्षात बांधण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.सिडकोतर्फे खारघर येथे अल्प व मध्यम उत्पन्न गटांसाठी उभारण्यात येत असलेल्या स्वप्नपूर्ती गृहप्रकल्पाला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रकल्पातील घरांसाठी प्राप्त झालेल्या अर्जावरून बजेटमधील घरांसाठी मोठी मागणी असल्याचे सिडकोच्या निदर्शनास आले आहे. सायबर सिटीत घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. मध्यंतरीच्या काळात खासगी विकासकांनी छोट्या आकाराची घरे बांधणे बंद केले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची परवड होत आहे. या पार्श्वभूमीवर सिडकोने पुन्हा गृहबांधणीच्या मूळ धोरणावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार मागील तीन वर्षांत शहराच्या विविध भागात विविध घटकांसाठी पावणेनऊ हजार घरे बांधली आहेत. त्यापैकी अल्प आणि मध्यम उत्पन्न गटांसाठी साडेचार हजार घरे आहेत. आगामी काळात विविध उत्पन्न घटकांसाठी १० हजार घरे बांधण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. घणसोली, वाशी, खारघर व तळोजा-पाचनंद या ठिकाणी ही घरे बांधण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यापैकी नवीन वर्षात अल्प व मध्यम उत्पन्न घटकांसाठी ५ हजार घरे बांधण्यात येणार आहेत, अशी माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया यांनी दिली. ही घरे स्वस्त दरात उपलब्ध करण्याचा सिडकोचा मानस आहे. यामुळे या प्रस्तावित गृहप्रकल्पांना तीन चटई निर्देशांक मिळावा, यासाठी सिडकोच्या वतीने नगरविकास विभागाकडे पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे.
नव्या वर्षात पाच हजार घरे
By admin | Updated: December 26, 2014 04:23 IST