कोल्हापूर : पूर्ववैमनस्यातून आपटेनगर-निचितेनगर येथे दोन कुटुंबांत झालेल्या हाणामारीमध्ये एकाच कुटुंबातील तिघे गंभीर जखमी झाले. अनिल श्रीकांत पोवार (४८), त्यांची पत्नी अनिता (४८) व सून चैत्राली चेतन पोवार (३०) अशी त्यांची नावे आहेत. जखमींना सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल केले असून, या घटनेमुळे परिसरात तणाव आहे. अनिल पोवार यांच्या शेजारी संजय आमते राहतात. त्यांच्याशी दोन वर्षांपूर्वी हद्दीवरून वाद झाला होता. सोमवारी दुपारी चारच्या सुमारास पोवार यांच्या घरातील लहान मुलगा दारात खेळत होता. त्यावेळी मंगल आमते यांनी शिवीगाळ केली. त्याचा जाब विचारण्यासाठी अनिता पोवार या आमते यांच्या घरी गेल्यानंतर त्यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर काही वेळाने संजय आमते, त्यांची पत्नी मंगल, मुलगा उमेश, उदय व मुलगी उमा व नातेवाईक असे मिळून पोवार यांच्या घरात घुसले. त्यांनी काठ्या, तलवारीने अनिल पोवार यांच्यासह अनिता व चैत्राली यांच्यावर हल्ला केला. रात्री उशिरापर्यंत जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. (प्रतिनिधी)
कोल्हापुरात पूर्ववैमनस्यातून कुटुंबावर तलवार हल्ला
By admin | Updated: October 7, 2014 08:51 IST