दौंड तहसील कार्यालयातील प्रकारदौंड। दि.९(वार्ताहर)दौंड तहसील कार्यालयात जातीच्या प्रमाणपत्रासाठी वडिलांच्या नावाने बोगस शाळेचा दाखला सादर केल्या प्रकरणी मुन्ना खरारे (रा. बंगलासाईड, दौंड) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक दिनेश कुलकर्णी यांनी दिली. या प्रकरणी तहसील कार्यालयाचे लिपिक विनोद धांडोरे यांनी पोलिसांना फिर्याद दिली आहे. मुन्ना खरारे याने २६ मार्च २०१४ रोजी कुटुंबाचा जातीचा दाखला मिळविण्यासाठीचे प्रकरण तहसील कार्यालयातील सेतू येथे दाखल केले. या प्रकरणाला मुन्नाने आपले वडील लक्ष्मण खरारे यांचा शाळा सोडल्याचा दाखला जोडला होता. दरम्यान, सेतू कार्यालयात सदरच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावरील अक्षरात तफावत दिसून येत असल्याने या दाखल्याबाबत साशंकता निर्माण झाली. सदरचे प्रकरण दौंड-पुरंदर विभागाचे उपविभागीय अधिकारी यांना दाखविले. त्यानंतर हा दाखला चौकशीसाठी नेहरूवाडी (ता. श्रीरामपूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पाठविला असता तो खोटा असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, मुन्नाने शाळेचा खोटा दाखला तयार केला, त्यावर बनावट शिक्के मारले आणि मुख्याध्यापकांची खोटी सही करून शासनाची फसवणूक केली. यानुसार पोलिसांनी मुन्ना खरारे याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
दौंडला शाळा सोडल्याचा बनावट दाखला
By admin | Updated: May 9, 2014 21:36 IST