मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या श्रेष्ठींनी अनुमती न दिल्यामुळे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, असे जाहीर केले होते. त्यामुळे मित्र पक्षांसह स्वपक्षतील अनेक इच्छुकांनी गुडघ्याला बांशिंग बांधले होते. अनेकांनी मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांचे उंबरठेही झिजवले, तर काहींनी दिल्लीवारी करून पक्षाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. जाणकारांच्या मते विस्ताराबाबत मुख्यमंत्री फारसे इच्छुक नव्हते. हिवाळी अधिवेशनानंतर विस्तार करावा, असे त्यांचे मत होते. मात्र, मित्रपक्ष आणि स्वपक्षातून दबाव वाढू लागल्यानंतर त्यांनी विस्तार करणार असल्याची भूमिका जाहीर केली. मात्र, निश्चित तारीख शेवटपर्यंत जाहीर केली नाही. आता विस्तारापूर्वी महामंडळांवरील नियुक्ती जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.विस्ताराच्या चर्चा कपोलकल्पित सध्या राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू असल्या तरी त्या कपोलकल्पित असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले़ नांदेड दौऱ्यावर आले असताना त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर प्रतिक्रिया दिली़ते म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यपालांची भेट इतर कारणांसाठी घेतली होती़ मात्र प्रसिद्धिमाध्यमांनी मंत्रिमंडळ विस्ताराच्या बातम्या दिल्या़ मंत्रिमंडळ विस्तार निश्चित होणार आहे़ पण तारीख ठरलेली नाही, ती कळवण्यात येईल. मुख्यमंत्र्यांच्या नावाला विरोध ही चर्चासुद्धा कपोलकल्पित आहे़ (विशेष प्रतिनिधी)विस्तार न होण्याची कारणे...- दिल्लीतील भाजपा श्रेष्ठींची परवानगी नाही.- मंत्रिपद कोणाला द्यायचे याबाबत भाजपात मतभेद.- इच्छुकांच्या गर्दीमुळे सेनेत दोन नावे ठरेनात.- शिवसेनेला दोन्ही कॅबिनेट मंत्रिपदे हवीत.- भाजपा मित्रपक्षांचाही कॅबिनेटचा आग्रह.- मित्रपक्षांपैकी चौघांनाही मंत्रिपद देण्यात भाजपाची असमर्थता.- मित्रपक्षांना मंत्रिपद दिले तरी आमदारकी नसल्याने पंचाईत.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर
By admin | Updated: December 5, 2015 09:08 IST