राजगुरुनगर : हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या विस्तारित स्मारकाचा आराखडा बनविण्याचे काम पूर्ण झाले असून, त्याची प्रथमदर्शनी किंमत ६५ कोटी रुपये झाली आहे. त्यात अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आला असून, त्यातून आता उत्तम दजार्चे स्मारक उभे राहील.निओजेन कन्सल्टंटचे मिलिंद किर्दत यांनी हा आराखडा बनविला आहे. या विस्तारित आराखड्यात पुणे-नाशिक महामार्ग ते राजगुरू वाडा, असा रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे. सध्याच्या गढी आणि कुस्ती आखाड्याजवळून हा रस्ता स्मारकाकडे जाणार आहे. शिवाय, हा रस्ता सुशोभित करण्यात येणार आहे. तसेच, चांडोलीच्या बाजूने कडूस रस्त्यावरून भीमा नदीवर पूलही प्रस्तावित करण्यात आला आहे. हा पूलही आणि जोडरस्ताही सुशोभित करण्यात येणार आहेत. तर, वाड्याबाहेर विश्रामगृह, कँटीन, वाहनतळ, बगिचा या गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. मूळ वाड्यात हुतात्मा राजगुरू, सुखदेव आणि भगतसिंग यांचा एकत्रित पुतळा प्रस्तावित आहे. हुतात्मा राजगुरूंचा जीवनपट दाखविण्यासाठी सभागृह करण्यात येणार आहे. इतिहास संशोधकांसाठी अभ्यासिका व ग्रंथालय बांधण्यात येणार आहे. हुतात्म्यांच्या जीवनावरील भित्तीचित्रे आणि संग्रहालय प्रस्तावित आहे. छोटा खुला रंगमंच (अँफी थिएटर) बनविण्यात येणार आहे. पुरातत्त्व विभागाने सध्या उभारलेल्या थोरल्या वाड्याला समांतर प्रतिकृती इमारत त्यात घेण्यात आली आहे. त्यात हुतात्म्यांची फायबर ग्लासची स्मृतिशिल्पे करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. ऐतिहासिक वास्तूप्रमाणे अंतर्गत सजावटही करण्यात येईल. सध्या पुरातत्त्व विभागाने केलेल्या कामाप्रमाणेच नवीन वाढीव काम करण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी नवीन टिकाऊ साहित्य वापरण्यात येणार आहे. नवीन कामालाही तत्कालीन वास्तूप्रमाणे ऐतिहासिक दृश्यात्मकता देण्यात येणार आहे. एकंदर स्मारक हे जुन्या वाड्याप्रमाणे भासेल, असा प्रयत्न असून ते उत्तम पर्यटनस्थळ होईल, याची काळजी या आराखड्यात घेण्यात आली आहे. निओजेन कंसल्टंटचे मिलिंद किर्दत, खेडचे उपविभागीय अधिकारी हिंमतराव खराडे व नगराध्यक्ष, नगरसेवकांनी आराखड्याचे सादरीकरण केले आणि स्मारक झाल्यानंतर त्याची देखभाल करण्याचे आवाहन केले. (वार्ताहर)>महाराष्ट्र शासनाने ११ जानेवारी २००० रोजी हुतात्मा राजगुरूंचे जन्मस्थान असलेला वाडा संरक्षित स्मारक करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी अनेक वर्षांपासून लोक वेगवेगळ्या माध्यमांतून मागणी करीत होते. त्यानंतर पुरातत्त्व खात्यामार्फत अस्तित्वात असलेल्या वाड्याचे स्मारकात रूपांतर करण्याचे काम सुरू होते. हे काम निकृष्ट झाल्याच्या तक्रारीतून येथे आंदोलने झाली. काही वर्षे काम बंद राहिले. पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांवर कारवाईही झाली. त्यानंतर काम पुन्हा सुरू होऊन पूर्णत्वाला जात आहे. पण, हे काम फक्त राजगुरू वंशजांच्या ताब्यात असलेल्या इमारतीत होत होते. त्याचे बरेचसे काम करण्यात आले आहे.>जन्मखोली, देवघर आणि सुरक्षा भिंतीचे काम करण्यात आले आहे. त्याशिवाय वाड्याचा बराचसा भाग खासगी लोकांच्या ताब्यात होता. त्यामुळे फक्त जागेवर स्मारकाचे काम झाले; पण ते चाहूबाजूंनी घरांनी वेढलेले होते. पुरातत्त्व खात्यामार्फत हे काम सुरू असतानाच मागच्या सरकारने विस्तारित स्मारकाचा आराखड्याला मंजुरी दिली होती; पण प्रत्यक्ष काम रेंगाळले होते.नवीन सरकारने आजूबाजूची घरे संपादित करून आणि मूळच्या कल्पनेत भर घालून विस्तारित स्मारक करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गेली दोन वर्षे शासकीय पातळीवर हालचाली सुरू होत्या. शासकीय स्तरावर मंत्रालयात आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत गेली दोन वर्षे बैठका सुरू होत्या.गेल्या अर्थसंकल्पात संपादनासाठी आणि इतर कामासाठी १० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार आता आराखडा तयार झाला असून, इतरही कामांना लवकरच सुरुवात होईल.
राजगुरूंच्या स्मारकाचा विस्तारित आराखडा तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2016 01:30 IST