मुंबई, ठाणे, KDMC वगळता जिथं भाजपा, शिंदेसेना स्वतंत्र लढले; तिथं एकनाथ शिंदेंनी काय कमावलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 15:15 IST2026-01-17T13:45:24+5:302026-01-17T15:15:52+5:30
मुंबई महापालिकेत भाजपानं शिंदेसेनेसोबत युती करून सत्तापालट केले. त्यात भाजपाला सर्वाधिक ८९ तर शिंदेसेनेला २९ जागांवर विजय मिळाला

मुंबई, ठाणे, KDMC वगळता जिथं भाजपा, शिंदेसेना स्वतंत्र लढले; तिथं एकनाथ शिंदेंनी काय कमावलं?
मुंबई - राज्यातील २९ महापालिका निवडणुकांचा निकाल शुक्रवारी स्पष्ट झाला. बहुतांश महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने वर्चस्व राखले आहे. त्याशिवाय मुंबईसारख्या महापालिकेत २५ वर्षांची ठाकरेंची सत्ता पालटून शिंदेंच्या साथीने पहिल्यांदाच भाजपाचा महापौर मुंबईत बसणार आहे. या २९ महापालिका निवडणुकीत भाजपा आणि शिंदेसेनेची युती मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवलीपुरती मर्यादित राहिली. मात्र नवी मुंबई, वसई-विरार, मीरा भाईंदर यासह इतर प्रमुख महापालिकेत भाजपाने शिंदेसेनेची साथ सोडली. छत्रपती संभाजीनगरमध्येही निवडणुकीपूर्वी भाजपाने शिंदेसेनेची युती तोडली. त्याठिकाणीही खासदार, पालकमंत्री असून शिंदेसेनेला फारसं यश हाती आले नाही. त्यामुळे भाजपाने केवळ मुंबई, ठाणे आणि कल्याण डोंबिवलीपुरतेच शिंदेंना सोबत ठेवले होते का असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.
मुंबई महापालिकेत भाजपानं शिंदेसेनेसोबत युती करून सत्तापालट केले. त्यात भाजपाला सर्वाधिक ८९ तर शिंदेसेनेला २९ जागांवर विजय मिळाला. ठाण्यात भाजपानं २८ आणि शिंदेसेनेने ७५ जागा मिळवल्या. कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदेसेनेच्या ५४ आणि भाजपाच्या ५० जागा आल्या. या तिन्ही महापालिकांमध्ये भाजपा शिंदेसेना एकत्र लढली. परंतु नवी मुंबई महापालिकेत भाजपा आणि शिंदेसेना वेगवेगळी लढली. तिथे भाजपाच्या ६५ आणि शिंदेसेनेच्या ४३ जागा आल्या. नाशिक महापालिकेतही भाजपाने स्वबळावर निवडणूक लढवली. त्याठिकाणी भाजपाच्या ७६ आणि शिंदेसेनेच्या २९ जागा आल्या.
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत भाजपाने स्वबळावर निवडणूक लढवत ५७ जागांवर विजय मिळवला तर शिंदेसेनेला १३ जागा जिंकता आल्या. पिंपरी चिंचवडमध्येही भाजपाने स्वबळावर ८४ जागा मिळवल्या. तिथे शिंदेसेनेला अवघ्या ६ जागांवर समाधान मानावे लागले. पुण्यात भाजपाने स्वबळावर निवडणूक लढवली तिथे ११९ जागा भाजपाने जिंकल्या. तिथे शिंदेसेनेला एकही जागा मिळाली नाही. मीरा भाईंदर महापालिकेतही भाजपा आणि शिंदेसेनेत सातत्याने खडाजंगी पाहायला मिळाली. या महापालिकेत भाजपाला ७८ तर शिंदेसेनेला केवळ ३ जागांवर विजय मिळाला आहे. उल्हासनगर महापालिकेत भाजपाने स्वबळावर निवडणूक लढवली त्याठिकाणी भाजपाला ३७ तर शिंदेसेनेला ३६ जागा मिळाल्या आहेत.