पुणे : यंदा पावसाने ओढ दिल्याने शेतकर्यांच्या पेरण्या खोळंबल्या. त्यामुळे वारीतील गर्दीही घटली असून वारी सुनी सुनी असल्याचे जाणवत आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकर्यांमध्ये यंदा हाच एक चर्चेचा विषय ठरला आहे. दरवर्षीच्या तुलनेत ही गर्दी ३० ते ४० टक्क्यांनी घटली आहे.दरवर्षी आळंदी आणि देहूतून पंढरपूरकडे पालख्या प्रस्थान करतात. त्यासाठी राज्याच्या विविध भागातून वारकरी आळंदी-देहूत दाखल होतात. त्यापूर्वी पावसाची नुकतीच सुरूवात झालेली असते. शेतकरी पेरण्या उरकून पावसावर निर्धास्त राहून भक्तीभावाने पंढरपूरकडे वाटचाल करतात. अनेकजण आपल्या कुटुंबियांबरोबरच वारीमध्ये सहभागी होतात. त्यामुळे मुलांपासून महिला, वृद्ध यांची संख्या मोठी असते. प्रत्येक गावातून दिंडीत एकत्र येऊन टाळ-मृदंगाच्या गजरात सर्वजण वारीमध्ये महिनाभर सहभागी होण्याच्या निश्चयाने येतात. यंदा, मात्र ही संख्या लक्षणीय घटली आहे. त्यामागे, पावसाने दिलेली ओढ हेच मुख्य कारण आहे.दोन वर्षांपूर्वी वारीवर दुष़्काळाचे सावट होते, त्यापूर्वी म्हणजे चार वर्षांपूर्वी स्वाईन फ्लूचीही भीती होती. त्याचप्रमाणे संभाव्य दहशतवादी हल्लयांची नेहमी भीती असते. मात्र, असे असूनही वारीतील विठुरायाच्या भक्तांची गर्दी कधीही कमी झाली नाही. यंदा, ती काहीशी कमी झाली आहे. कदाचित, येत्या पंधरा दिवसांत पाऊस सुरू होईल आणि वारकर्यांचा मेळा पुढे सरके ल त्याप्रमाणे राज्यातील विविध गांवातून शेतकरी, वारकरी यामध्ये सहभागी होत राहतील. त्यामुळे पंढरपूरपर्यंत ही संख्या वाढेल अशी आशा वारकर्यांनी व्यक्त केली.
पावसाअभावी वारी सुनी सुनी गर्दी घटली : पेरण्या खोळंबल्या
By admin | Updated: June 21, 2014 23:40 IST