पुणे : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यात १३ जिल्ह्यांत ज्ञानरचनावादी शाळा आणि तब्बल ११ जिल्ह्यांमध्ये संपूर्णत: डिजिटल शाळा झालेल्या आहेत. राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम जोमाने राबविण्यात येत आहेत. ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धती म्हणजे मुलांना हसत खेळत आनंददायी शिक्षण देणे होय. या पद्धतीत मुलांना शिकण्यासाठी प्रवृत्त करण्यात शिक्षकांची भूमिका मार्गदर्शकांची राहणार आहे. परिसर स्वच्छ, शाळा व वर्गाची रंगरंगोटी, वर्ग सजावट आणि सर्वात म्हणजे प्रात्यक्षिकांतून शिक्षण देणे हेच ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धती आहे. शिक्षण आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या २ वर्षात देशातील शैक्षणिक गुणवत्तेत महाराष्ट्र पहिल्या तीनमध्ये येण्याचा संकल्प केला आहे. मात्र त्यापूर्वीच राज्यातील प्राथमिक शाळा आता डिजिटल शाळा व ज्ञानरचनावादी शाळा होणार आहेत. अहमदनगर, सोलापूर, नंदूरबार, पालघर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी, नांदेड, बुलढाणा, परभणी आणि हिंगोली हे १४ जिल्हे १०० टक्के ज्ञानरचनावादी शाळांचे झाले आहेत. तर नगर, नंदूरबार, पालघर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, बुलढाणा, परभणी या जिल्ह्यांमधील शाळा डिजिटल झाल्या आहेत. अन्य जिल्हे याकडे वाटचाल करीत आहेत.मोठी शहरे मागे राज्यातील पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर, औरंगाबादसह अन्य शहरे डिजिटल स्कूलमध्ये फारच मागे पडली आहेत. त्यातुलनेत पूर्व महाराष्ट्रातील मागास समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यांतील शंभर टक्के शाळा डिजीटल झाल्या आहेत.
राज्यातील ११ जिल्ह्यांत डिजिटल शाळा
By admin | Updated: April 3, 2016 03:51 IST