मुक्या प्राण्यांचे हाल थांबतील, कल्याण गंगवाल पुणे : बैलगाडा स्पर्धा व बैलांच्या झुंजीवर सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या बंदीचा निर्णय ऐतिहासिक असून, त्यामुळे स्पर्धेच्या वेळी मुक्या प्राण्यांची होणारी छळवणुक व हाल थांबणार असल्याचे प्रतिपादन सर्व जीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, तसेच बैलगाडा विरोधी चळवळीचे मार्गदर्शक डॉ. कल्याण गंगवाल यांनी केले. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राधाकृष्णन व पिनाकी चंद्रघोष यांनी दिलेला निर्णय स्वागतार्ह आहे. पुणे न्यायालयातून २००१ साली अशा स्पर्धेला स्थगिती मिळविण्यात आली होती. मात्र कायद्यातील पळवाटा काढून या स्पर्धा सुरुच होत्या. पुढे हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले. तेथे संघटनेचा विजय झाला. मात्र निकालाला स्थगिती मिळविण्यात बैलगाडा चालक-मालक संघटनेला यश आले. स्पर्धेच्या दरम्यान बैलांवर अत्याचार होत असल्याचे अनेक पुरावे संघटनेने गोळा केले होते. बैलांना उपाशी ठेवणे, स्पर्धेपुर्वी अंधारात ठेवणे, दारु पाजणे, कानात मुंग्या सोडणे, गुदद्वाराजवळ अनुकुचिदार हत्याराने टोचणे असे उद्योग केले जात होते. जनावरांनी स्पर्धेत बेफाम पळावे यासाठीच असे करण्यात येत होते. एखाद्या बैलाचे स्पर्धेत पायाचे हाड मोडल्यास त्याची रवानगी कत्तलखान्यात करण्यात येत होती. तसेच स्पर्धेदरम्यान बैल बेफाम होऊन गर्दीत शिरण्याचे प्रकार घडले होते. त्यामुळे मनुष्यहानी देखील झाली आहे. ग्रामीण क्रीडा संस्कृतीच्या नावाखाली हे कृत्य सुरु होते. न्यायालयाच्या बंदीमुळे मुक्या जनावरांना न्याय मिळेल, असा विश्वास डॉ. गंगवाल यांनी व्यक्त केला.
बैलगाडा शर्यत बंदीचा निर्णय ऐतिहासिक
By admin | Updated: May 9, 2014 22:07 IST