सूर्यकांत वाघमारे,
नवी मुंबई- महापालिकेने सक्ती केल्यानंतर शहरातील दुकानदार, उद्योजक यांनी व्यवसाय परवाने घेण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे अग्निशमन दलासह इतर ना हरकत परवाने मिळवण्यासाठी त्यांची लगबग सुरू आहे. परंतु या प्रक्रियेत अधिकृत गाळ्यांमधील व्यावसायिक भरडले जात आहेत. व्यवसाय करण्यासाठी महापालिकेचा व्यवसाय परवाना आवश्यक असतानाही उद्योजक व्यावसायिकांकडून आजतागायत त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. पालिका अधिकाऱ्यांनी देखील ही बाब गांभीर्याने घेतली नव्हती. त्यामुळे लहान - मोठ्या दुकानांसह अनेक उद्योग, कारखाने देखील पालिकेच्या व्यवसाय परवान्याविनाच सुरू होते. यामुळे संबंधित व्यावसायिकाची आर्थिक भरभराट सुरू होती. मात्र प्रशासनाला त्यांच्यापासून कसलाही कर मिळत नव्हता. तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाचा कार्यभार हाती घेताच व्यवसाय परवान्याला सक्ती केली आहे. शिवाय व्यवसाय व साठा परवाना तातडीने मिळावा याकरिता ना हरकत दाखला देण्याची प्रक्रिया देखील जलद केली आहे. त्यामुळे आजवर पालिकेच्या परवानगीविनाच व्यवसाय करणाऱ्यांनी परवाना घेण्याची लगबग चालवली आहे.अग्निशमन दलाकडून ना हरकत दाखला देण्यासाठी त्यांच्याकडून विविध प्रकारच्या कागदपत्रांची मागणी केली जात आहे. त्यामध्ये व्यावसायिक गाळा असलेल्या इमारतीच्या सीसी, ओसी पत्रांचाही समावेश आहे. या कागदपत्रांची जमवाजमव करताना व्यावसायीकांची दमछाक होत आहे. दुसरीकडे मात्र बैठ्या चाळी, रो हाऊस तसेच गावठाणातील गरजेपोटी इमारतींमधील गाळ्यांना सहज परवाने मिळत आहेत. यावरून ना हरकत दाखल्याच्या आडून परवाना प्रक्रियेत सावळागोंधळ सुरू असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.नेरुळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली याठिकाणी सिडकोच्या बैठ्या चाळी तसेच रो हाऊस आहेत. सद्यस्थिती त्याठिकाणच्या चाळीमध्ये घरांच्या जागी चार मजली इमारती उभ्या आहेत. तर रो हाऊसच्या ठिकाणी तळमजल्यावर पार्किंगऐवजी व्यावसायिक गाळे बांधण्यात आलेले आहेत. त्याठिकाणी नियमाचे उल्लंघन झालेले असल्यामुळे अशा बांधकामांना ओसी मिळालेली नाही. यामुळे अशा ठिकाणचे व्यावसायिक गाळे अनधिकृत असतानाही परवाना प्रक्रियेत त्यांच्या सोयीचे धोरण अवलंबले जात असल्याचा काही व्यावसायिकांचा आरोप आहे.>गावठाणामध्ये गरजेपोटी उभारलेल्या बहुतांश इमारतींमध्ये तळमजल्यावर व्यावसायिक गाळे आहेत. त्यापैकी बहुतांश इमारतींना पालिकेची सीसी, ओसी देखील नसल्यामुळे या इमारती अनधिकृत समजल्या जात आहेत. यामुळे त्याठिकाणच्या गाळ्यामधील व्यापाऱ्यांना देखील व्यवसाय परवाना मिळणार का, असा प्रश्न अनेकांना उद्भवला आहे.