मुंबई : कृषी पंपांवर येणारा वीजभार, कृषी पंपांची थकबाकी, कृषी पंपांची तपासणी आणि थकीत वीजबिलांसह कृषी क्षेत्रातील उर्वरित वीज समस्या सोडविण्यासाठी राज्य सरकारच्या ऊर्जा विभागाच्या वतीने नवी समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीमध्ये वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे आणि विश्वास पाठक यांचा समावेश असून वीज समस्यांचा अभ्यास करत यावर ही समिती तोडगा काढणार आहे.महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटना आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात नुकतेच झालेल्या बैठकीदरम्यान नवी समिती स्थापन करण्यात आली आहे. कृषी क्षेत्रातील वीज समस्यांमुळे ‘कृषी संजीवनी’ ही योजना सपशेल फोल ठरल्याचे संघटनेचे म्हणणे असून, नव्याने स्थापन झालेली समिती कृषी पंपांच्या तपासणीसह विजेचे लेखापरीक्षण त्रयस्थ पक्षाकडून करून घेणार आहे. शिवाय यात कृषी पंपांवरील भार आणि बचत यांचाही समावेश असणार आहे. कृषी क्षेत्रातील विजेच्या समस्या सोडविण्यासाठी समिती तपासणी, निरीक्षण आणि विश्लेषण अशा तीन पातळ्यांवर काम करेल. (प्रतिनिधी)
वीज समस्या सोडविण्यासाठी समिती
By admin | Updated: June 11, 2015 01:14 IST